असे का? हे खरे आहे का?

ही बातमी वाचा - लोकसत्ता, ग्राफिटी वॉल- कविता महाजन

गौरी देशपांडे, मेघना पेठे  किवा कविता महाजन असे बोटावर मोजण्याइतके मराठी लेखिकांचे काही अपवाद सोडले तर स्त्री साहित्यिकांचे लेखन विषय निसर्ग, प्रेमकविता, चाकोरीबद्ध अशा कथा आणि तसेच चौकटीतले ललित लेखन अशाप्रकारचे राहीले आहेत.

नाच ग घुमा, कळ्यांचे नि: श्वास, आहे मनोहर तरी ही आणखी काही वेगळी उदाहरणे, जी चटकन आठवली. 

पण एकंदरीत स्त्रियांनी त्यांच्या अनुभवातून अथवा कल्पनेच्या बळाने त्यांनी पुरुषांची स्वभाववैशिष्ट्ये एका मर्यादेत रंगविली आहेत.  हिंदी किंवा उर्दू साहित्यात अशी उदाहरणे आहेत मग मराठीच मागे का ? समाजाचे जिवंत चित्रण, राजकारण,क्रिडा,हिसाचार,दंगली, महायुद्धे असे विषय त्यांच्या लेखनात मला तरी कमी वाचायला मिळाले.  आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीत भारतात व भारताबाहेरही नोकरी/ व्यवसाय करतात मग त्यांचे लेखन विशेषतः कविता

  • कौटुंबिक किंवा निसर्गाचे रूपकही टाळून , जागतिकीकरण, ग्लोबल वॉर्मिंग ,इराणचे युद्ध, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, घुसखोरी, जातपात, भ्रष्टाचार, माणसाचे वर्तन अशा विषयांवर का होत नाही? होत असले तर अशी उदाहरणे नावासहीत देता येतील का? मनोगतावर मानिनी, मृण्मयी यांच्या काही कविता वेगळ्या वाटल्या. त्याशिवाय एखादेच उदाहरण चाकोरीबाहेरचा प्रयत्न आहे.
  • लेखक लेखिका अथवा लिहिणारी व्यक्ती तिचे स्वतःचे अनुभवच लिहीते असे इथे वाचकांना अथवा लिहिणाऱ्या सदस्यांना वाटते का?
  • स्त्री आणि पुरूष यांना लेखनातून दिसणारी नैतिकता दर्शवण्यास वेगळे नियम आहेत का? हा प्रश्न मनोगतापुरता नाही सर्व साहित्याबद्दल आहे. वाचकांचे मत काय आहे?
  • हा  प्रश्न फक्त मनोगतापुरता मर्यादित नाही. एक पुरूष जेवढा नि:संकोचपणे प्रेमाच्या विविध रूपांचे आणि स्त्रीचे वर्णन करतो तसे स्त्रिया का करत नाहीत ? ह्या सर्व भावना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान असतात असे मला वाटते.
  • पौराणिक संदर्भ देऊन पुरूषाच्या वागण्याचे,समर्थनाचे चित्रण इथे दिसते. असेच संदर्भ आपले मत मांडण्यासाठी स्त्रिया का करत नाहीत?  करत असतील तर अशा स्त्रियांची उदाहरणे कोणती? मनोगताच्या प्रशासनाचे नियम सांभाळून काही प्रकारचे लेखन करण्याला मर्यादा आहे असे वाटते. पण ती मर्यादा तरी नक्की कोणती आहे?  विडंबनाच्या नावाखाली चालू असणारा धुमाकूळ पाहता मर्यादा नक्की कोणत्या ते स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्तामधील कविता महाजन यांचा आजचा लेख वाचून मनात असणाऱ्या विचारांना आज शब्द मिळाले आहेत. मनोगतावर लेखन करणाऱ्यांची व वाचकांचीही याविषयी मते जाणून घेण्यास आवडेल. उत्तरे जाहीर द्यावीत, ती सर्वांनी वाचावी हीच इच्छा आहे.