बीज

मराठी दुसरी - तिसरीत असताना आम्हाला एक फार छान कविता होती. त्या कवीचे नांव आठवत नाही. कविता मात्र आठवते.

चिमणे इवलाले बीज
रम्य त्यास होती शेज
दीड वितीचे कुणी रोप
घेत तिथे होते झोप
ऊन म्हणाले उठ गड्या
पाऊस वदला मार उड्या
जगांत येरे या उघड्या
करी जळाच्या पायघड्या
वायु बोलला उठ की रे
माझ्याशी धर फेर बरे
हंसले जर आम्हा कोणी
दावु वाकुल्या नाचोनी
भूमी म्हणाली चल बाळा
वाजव पाण्याचा वाळा
अंगी हिरवी सोनसळा
घालुन दावी ही सकळा
झोप झटकुनी ते उठले
नंदबाळ जणु अवतरले
पाऊसवारा ऊन तसे
जमले भवती गोप जसे
अदभुत त्यांचा खेळ अहा
जरा येऊनी पहापहा
उगवे चमके पहा तरी
मोरपिसांचा तुरा शिरी