बार्सिलोना

१९९२ चे बार्सिलोना ऑलिंपिक आणि स्पेनमधील सुप्रसिद्ध केशर एवढीच 'बहुमूल्य' माहिती मला स्पेनबद्दल होती.पुढे स्पॅनिश मंडळींशी दोस्ती झाल्यावर त्यांचा साधारण आपल्या पुलावासारखा असलेला pyella rice आणि टॉर्टिला नव्हे टॉर्टियाशी ओळख झाली.स्पेनमधील कातालोनिया,जर्मनीतील बायर्न, आणि महाराष्ट्रातील पुणे यांच्यातील सारखेपण एकच, इतरांपेक्षा आपले वेगळेपण, आपली वैशिष्ट्ये जपत राहणे!अगदी भाषेपासून ते विमानसेवेपर्यंत कातालोयनांचे इतर स्पेनपासून वेगळेपण दिसते,स्पेनमध्ये आयबेरियन एअर लाइन्स आणि कातालोनियन एअर लाइन्स अशा दोन मुख्य विमानसेवा आहेत.(तशी बायरिश डॉइश आणि पुणेरी मराठीही आपले वेगळे अस्तित्व दाखवतेच म्हणा!)तर एवढ्या 'ज्ञाना'वर आम्ही बार्सिलोनाला जाणाऱ्या विमानात बसलो.
उण्यापुऱ्या दोन तासाचा तर विमानप्रवास!हवा चांगली असल्याने खिडकीतून आधी मेडेटेरेयन समुद्र आणि किनाऱ्यावर वसलेले बार्सिलोना दिसू लागले‌.सारे सोपस्कार आटोपून बाहेर आलो तर नुसती जत्रा भरल्यासारखे दिसत होते.भरपूर गजबजाट होता.फ्रांकफुर्ट सारख्या अतिव्यस्त विमानतळाबाहेरही असा गजबजाट नाही.टॅक्सीवाल्याला मोडके का होईना इंग्रजी येत असल्याने हॉटेलपर्यंत सरळ आलो‌. स्वागतकक्षात ठेवलेले नकाशे,माहितीपत्रके घेऊन खोली गाठली.
बार्सिलोनातील मुख्य चौक 'प्लासा दे कातालोनिया'! ही इथली 'हॅपनिंग प्लेस'! शहरदर्शनाच्या दुमजली उघड्या टपाच्या बस इथूनच सुटतात.युरोपात बऱ्याच ठिकाणी अशा बस आहेत.(आपल्या हिंदी चित्रपटांमधून अशा बसचेही दर्शन युरोपदर्शनाबरोबर कधी कधी घडते.)त्याचबरोबर मेट्रो रेल्वेचे चांगले जाळे बार्सिलोनात आहे.आम्ही मेट्रो आणि उघड्या टपाची शहरदर्शन बस दोन्हीचा वापर करायचे ठरवले.
फ्रांकफुर्ट मध्ये आठवडी पास मिळतो जो बस,ट्राम,मेट्रो आणि लोकल रेल्वे असा सगळीकडे चालतो.इथे १ वेळ,१० वेळा,३० वेळांसाठी तिकिट असते,आणि ते ही फ्रांकफुर्ट सारखेच सगळीकडे चालते,फक्त इथे मात्र प्रत्येकवेळी तिकिट पंच करावे लागते.म्हणजेच '१० वेळा' वाले तिकिट फक्त १०च वेळा वापरता येते आणि ३० वेळा वाले ३० च वेळा.आपल्या पासासारखे नाही.तर ते १० वेळांचे तिकिट काढून आम्ही मेट्रोतून आणि पायी भटकायचे ठरवले‌. शहराचा नकाशा आणि रेल्वेचे जाळे दाखविणारा नकाशा हातात असला की भाषा येत नसली तरी फारसे अडत नाही.'सांट इस्टासिओ' ह्या 'बार्सिलोना मेन स्टेशन' जवळील मेट्रोने आम्ही 'डायगोनल'ला गेलो.इथल्या इमारतींवरचे कोरीव काम  आणि रस्ते पाहणे हाच एक अनुभव आहे.सांट इस्टासिओच्या स्टेशनात जातानाही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुबक,भव्य इमारती त्यांच्या मधील मोकळ्या जागांत अंतराअंतरावर असलेले  छोटे बागिचे,तिथे खेळत असलेली छोटी मुले,बाकांवर क्षणभर विसावलेले लोकं दिसत होते.
   डायगोनलच्या रस्त्यांवरील चौकांत मोठेमोठे स्तंभ उभारलेले आहेत,त्यावरील कोरीवकामही लक्षणीय आहे.तेथून चालत चालत खाली ग्राशिया आणि तिथून पुढे फाँटेनाला आलो.सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र म्हणून ग्राशिया ते फाँटेना हा पट्टा गणला जातो.(बापरे,एकदम सरकारी प्रवासीपुस्तकातली भाषा झाली की ही!) या भागात अनेक squares आहेत. चौक म्हटले की वेगळेच चित्र डोळ्यापुढे येते.हे स्क्वेअर अगदी आखीव आणि बांधीव आहेत त्यांना जोडणाऱ्या गल्ल्याही फुलझाडांच्या आणि शोभेच्या झाडांच्या कुंड्यांनी सुशोभित केलेल्या आहेत.मोठी वाहने तेथे आणताच येत नाहीत असे रस्ते अरुंद आहेत.प्रत्येक स्क्वेअरमध्ये ५,६ तरी उपाहारगृहे आणि 'रसवंती'गृहे आहेतच.मोकळ्या अंगणात खुर्च्या टेबले टाकून,छत्र्या लावून मंडळींचे पुलावसदृश्य पायला भात,टॉर्टियामध्ये कसले कसले पुरण भरून खाणे चाललेले असते.मोठमोठ्या कढयांमध्ये हा भात शिजल्याचा दरवळ येत असतो.हे squares सजवण्याची दरवर्षी ऑगस्ट महिन्यात स्पर्धा असते,आजूबाजूच्या घरांमधून राहणारे लोक उस्फुर्तपणे त्या स्पर्धेत सहभागी होतात. चारही बाजूच्या गल्ल्या सजवण्याची चढाओढ लागते. स्पॅनिश मंडळी उशीरा रात्री ९ नंतर जेवणारी, मित्रमंडळ बरोबर असेल तर १०,११ सुद्धा ! हसत खिदळत,गाण्यांवर डोलत उशीरापर्यंत जेवणे चालू असतात.जर्मन लोक मात्र रात्रीचे जेवण संध्याकाळी ६ च्या सुमाराला घेतात.(ते 'आबेंड एसन' = 'संध्याकाळचे जेवण' असाच शब्दप्रयोग वापरतात.)त्या सुप्रसिद्ध स्क्वेअरमधील स्पॅनिश जेवणाचा आस्वाद घेऊन बऱ्याच उशिरा आम्ही खोलीवर परतलो‌‌.

बार्सिलोना मध्ये येणारे प्रवासी बरेचसे अमेरिकन,मेक्सिकन आणि जर्मन आढळले‌.भारतीय लोक दिसले पण भारतीय 'प्रवासी' मात्र एखादाच दिसला, पण भारतीय उपाहारगृहे मात्र एका गल्लीत ३,४ आहेत हे पाहून आश्चर्य वाटले.भाषा मुखत्वे स्पॅनिश आणि कातालोनियन!(म्हणजे अगदी मराठी आणि कोंकणी किवा होख डॉइश आणि बायरिश च्या चालीवर!  )टीव्ही वर सुद्धा स्पॅनिश आणि कातालोनियन भाषेतले कार्यक्रम! इंग्रजी बातम्यांचे चॅनेल आणि ३,४ जर्मन चॅनेलेही आहेत.

बार्सिलोना शहराचे ३ प्रमुख विभाग करता येतील.उत्तर विभाग,दक्षिण विभाग आणि फोरम विभाग. उघड्या टपाच्या बसने फिरताना निळा रुट म्हणजे दक्षिण विभाग,लाल रुट म्हणजे उत्तर विभाग आणि हिरवा रुट हा फोरम विभाग पाहण्यासाठी ठरविला आहे. ला रिबेरा येथले पिकासोचे म्युझियम प्रेक्षणीय आहे.पिकासोची१८९५ ते १९०४ या काळातील ३००० च्या वर चित्रे येथे आहेत.(मला त्यातील फारसे काही कळत नाही, ते सोडा!) पालाव दे म्युझिका कातालाना या संग्रहालयात टाइल्स,विटा,शिल्पांसाठीचे विशिष्ट दगड,स्टेंड ग्लास इ. चा सुंदर संग्रह आहे.एम एन ए सी म्हणजेच मुझेउ नॅशनल दे आर्ट मॉडर्न दे कातालोनिया ह्या प्रसिद्ध संग्रहालयात १९ आणि २० व्या शतकातील कातालोनियन कलेच्या अनेकोत्तम नमुन्यांचा संग्रह आहे. ही महत्त्वाची आणि अशी अनेक वस्तुसंग्रहालये पाहायची तर दिवसचे दिवस अपुरे पडतील.(हीच गोष्ट पॅरिस ,ऍमस्टरडॅम आणि अशा अनेक ठिकाणी जाणवते.)बर,शाळेत असताना दिलेल्या चित्रकलेच्या २ परीक्षा याच्यावर आमची गाडी नाही,त्यामुळे त्यातील जाणकारी नाही.मात्र डोळ्याला छान दिसते आणि मनाला चांगले वाटते.
९२चे ऑलिंपिक जिथे झाले तो भाग अलेना ऑलिंपिया म्हणून ओळखला जातो,आणि अगदी कौतुकाने तो भाग आपल्याला दाखविला जातो.तारागोना ( र चा उच्चार अगदी अर्र मधल्या र सारखा- तार्रागोना!) ही रोमन स्पेनची राजधानी होती.तिथे असलेली रोमन स्ट्रकचर्स ,आणि कथीड्रल आजही मुख्य आकर्षण आहेत.तिबिडाबो येथे असलेली फुनिक्युलार रेल्वे आपल्याला चर्च च्या टेकडीवर घेऊन जाते, त्या छोट्याशा रेल्वेतून  चर्चपर्यंत जायला गंमत वाटते.बॅरी ग्यॉटीक इथे असलेले कथीड्रल सुद्धा पाहण्यासारखे आहे.

ला रंबाला कडे प्लासा दे कातलोनिया कडून चालत गेले की कातलोनियनांची जवळून ओळख होते.दोन बाजूंना रस्ता आणि मध्ये पादचारी मार्ग आहे,तेथे  फुले,खेळणी,रंगीत फुगे ,भिरभिरवाले असे छोटे गाळे आहेत,सुविनियरची दुकाने आहेत. उपाहारगृहे आणि पिझ्झेरिया तर आहेतच‌. सदा चहेलपहेल असते तिथे.तिथेच एखाद दोन मॉल आहेत आणि चक्क आपली वाटावी अशी भाजीमंडई आहे.आणि त्यात मंडईला साजेल असा कोलाहलही आहे! भाजी,फळे,सुकामेवा आणि मासे सगळेच तिथे मिळते. 'ऑलिव, ऑलिवचे तेल  आणि केशर'  सुका मेवा,चॉकलेटे यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात.तिथेच मी चक्क 'काळा भात' पाहिला.पाकिटावर चक्क black rice  लिहिले होते  त्यावरील चित्रातही भाताचा रंग काळा दिसत होता,म्हणून उत्सुकतेने त्यात असलेले पदार्थ वाचले तर केशर,कोलंबी आणि काळा तांदूळ असे त्यावर लिहिलेले आढळले‍. जरा  गंमतच वाटली मला त्याची.ह्या रस्त्याने पुढे चालत गेले समुद्रकिनारी जाता येते आणि  सारा ओघ तिकडेच चालला होता.परदेशात समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ आणि शांत असतात.तिथे जाऊन वाळूत बसायला,पाण्यात पायांवर लाटा घ्यायला किवा जिथे परवानगी असेल तिथे समुद्राच्या कुशीत शिरायला मजा येते.(परवानगी अशासाठी की जेथे जेथे समुद्रात शिरणे धोकादायक असते तेथे आत शिरायला परवानगी नसते)

 बार्सिलोना-कातालोनियाशी ओळख करून घेऊन केशरी सुगंध आणि ऑलिवची आंबट चव घोळवत ,अनेक सुंदर आठवणींना बरोबर घेऊन आम्ही परतलो. "DSC02508


"DSC02499

"DSC02481