राम नाम सत्य है

राम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुणीकडं वाट चुकलात जणू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पाणी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल राव उगा. पण गुडघापण डुबणार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली होती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुम्ही? किती वार सांगू पानी न्हाई इथं.

हां पण एक येळ व्हती जेव्हा ही हिर पाण्याने तुडुंब भरायची. माझा बाप मोट मारायचा आणि मी पाणी चारायचो ऊसाला. दुपारच्याला सगळे लोक इस्वाटयाला पडले मी हळूच हिरीत उतरायचा. पवायला. ह्या हिरीनंच आपल्याला पवायला शिकिवलं. बाहेर रणरणतं ऊन असलं तरी आत गारेगार वाटायचं. इथंच अख्खा दिवस पडून राहावंसं वाटायचं. पण पुन्हा ऊनं उतरली की परत पाण्याला लागायचं. बाप पुन्हा मोटंला भिडायचा, मी माझ्या हीरीचं थंडगार पाणी ऊसाला चारायचा.

मंग? काय सोपं हुतं का राव? जरा हाताबुडी आलो, तसा मोट माराया शिकिवली बापानं. पयल्यांदा लै मजा यायची. वाटायचं, आता आपण बापया मानूस झालो. मोट माराया लागलो. हळुहळू त्याचाही कट्टाळा यायला लागला. पण बामनाला पोट अन मळेकऱ्याला मोट कधी चुकलेय का? न्हाई न वं? मग मोट मारता मारताच मी माझ्या हीरीवर पंप बसवून घ्यायची सपान बघायचो. घरात बिजली, हीरीवर बिजली, आताच्या डबल टेपल रान. बराचसा ऊस, थोडी पालेभाजी, कधी रानं फिरवायला टमाटं. एकदम पाटलाच्या रानावानी सगळं फुलल्यालं दिसायचं. बैलं हिसडा द्याया लागली की माजी तार मोडायची.

मंग एक दिवस ह्या हीरीसमोरच्या खोपीत बसल्यालं असताना माय म्हणाली, लगीन ठरावलंय माजं. काय सांगू पाव्हणं? गुदगुल्याच झाल्या जणू. शेताच्या बांधाव पाय सोडून बसल्यावर पायाशी एकदम मांजराचं पिलू बिलगावं तशा गुदगुल्या. गावंदरीजवळचं रान करणाऱ्या महादू जाधवाची लेक, चंद्राक्का. काय लाजाया झालं मला? तसाच उठून हिरीकडे आलो. आपल्याला कुठलं जीवलग दोस्तं? ही हिर आणि दोन बैलं हीच आमची दोस्तं. त्यांनाच पहिली सांगिटली ही बातमी. मी न्हवरा अन चंद्री नव्हरी. पुढं चंद्राशी भांडाण झालं की हिरीलाच सांगायचो की मी. मग माझी चूक असंल, तर दुपारची भाकरी चंद्री कोणाबरोबर तरी लावून द्यायची रानाकडं. तिची चूक असंल तर मात्र सवता याची रानाकडं बुट्टी घेऊन. ती रांड, शाळंत शिकलेली. विंग्रजीत सोरी म्हणायची. मग मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकरी ग्वाड ध्वाड लागायची. वर मी माझ्या हिरीचं पाणी गटागटा प्यायचा.

अशीच एकदा नांगरणीची धावपळ चालली होती. आभाळ उतराया झालं होतं. बरंच काम अडून राहिलेलं. दुपारच्याला खोपीत मी भाकरी खाऊन इस्वाट्याला पडलेला. पाण्याला म्हणून हीरीकडं आलो. माय तेव्हा शेवंतीकडं गेली होती शेवगावाला. शेवंती म्हणजे थोरली बहीण माझी. तर चंद्री हीरीपाशी आली नि म्हणाली मायला बलवून घ्या, अन येताना चिच्चा, बोरं घेऊन या. मी धाडलं बलवणं. हे चिच्चा, बोरं काय मला समजेनात. मग एकदम डोक्यात बिजली चमकली. कालपर्यंत पोरया असलेला मी आता बाप व्हणार होतो.

मोट मारता मारता परत इचार सुरू व्हायचे. मुलगा झाला तर बरं हुईल. त्याला मी शाळंत घालेन आमच्या चंद्रीवाणी. मग तो हाताबुडी येईल. शिकून सायब हुईल. हां, पण तो रान करायचा सोडणार नाही. शेतीपण करेल. हिरीवर पंप बसवेल. मंग मला मोट नाही माराया लागणार. मग पंप पाणी खेचेल, मी शेताला पाणी पाजेन आणि तो गावाची सगळी कामं बघेल. नांगरणी, पेरणीला आम्ही दोघं झटक्यात रान उरकून टाकू. सोबतीनं कुळव हाणू, बैलांना पाला कापू, शेणं भरू. जीवाला थोडा इस्वाटा पडेल. पण कसचं काय राव? झाली पहिली बेटीच. पण फुलासारखी नाजूक, मोगरीच्या फुलासारखी. आणि मधावानी ग्वाड लेक. पण हिच्या आईला काय धाड भरली जणू. रांडेनं दगडू नाव ठिवलं पोरीचं. नजर लागाया नगं म्हणून.

मग एकापाठोपाठ एक पाच पोरं झाली. चार लेकी आणि योक ल्योक. घरचं रान कमी पडाया लागलं मंग शेजारचं रान फाळ्यावर घेतलं. तरीपण पैसं कमी पडाया लागलं. वाटलं पोरांची शाळा काही हुईत नाही. पण हिमतीनं पोरींना चवथी केलं. मंग काय करायची त्यांना शाळा. दुसऱ्याचं धन ते. पोराला मात्र फूडच्या शाळंत घातलं. येगळं मास्तर लावलं शिकवणीला. पोरगा शिकिवला पायजे. मग तो हीरीवर पंप आणेल. माझं कंबरडं तर पार मोडून गेलं की हो जलमभर मोट मारून मारून.

हळूहळू साठवणीचं पैसं संपाया लागलं. घरच्या रानातबी काही राम राहिला नाही. त्येच्या आईला त्येच्या, पूर्वीसारखं पीक देईना झालं. शेजारच्या रानाच्या मालकाने रानाचा फाळाबी वाढावला. त्या रानाच्या पिकात वरीसाचा फाळाबी निघेना झाला. मंग करावं तरी काय? बरं पावासाचं पण पूर्वीसारखं राहिलं नाही. खतं, चांगलं बी बियाणं आणाया पैसं नाहीत. आलेलं पीक शेरातला दलाल म्हणेल त्या भावाला इकायचं. शेवटी हातात काही उरायचंच नाही.

फार घोर लागून राहिला बघा जीवाला. घर ढांकंला लागलं जणू. अन हा घोर सांगणार तरी कोणाला? हल्ली मी माझं घोर या हिरीला सांगायचं बी बंद केलाय. ती बिचारी काय करनार? तेव्हा शेजारच्या रानातला शिरपा तिथं आला हुता. म्हणाला मायबाप सरकार कर्ज देणार आहे मळेकऱ्यांना. निविडणुका आल्या हुत्या ना तेव्हा. ईजबी फुकाट मिळणार म्हणून सांगत होता. पाटलाला म्हणे तेव्हा फुकाट रकमेचं बिल मायबाप सरकारनं पाठिवलं होतं. कितीबी ईज वापरा पैसं द्याया लागनार न्हाई. त्येच्या आयला त्येच्या ह्या शिरप्याच्या बेणं नको त्या वाटंनं घिवून गेलं मला. आणि सुक्कळीचं हे मायबाप सरकार, निविडणुका सरल्याव फुकाट इजबी बंद करून टाकली.

मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो. कर्ज मिळिवलं. एक सपान पुरं झालं. मी पंप घातला हिरीवर. इजेची लाईनबी घीतली. फुकाट इज म्हणून खोपीत, हीरीवर पण झगमाग दिवं लावलं. बरे दिवस आले. जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला. ल्योकबी हाताबुडी आला. त्याची शाळा तर बंद झालीच हुती. त्येच्या आयला त्येच्या, बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई. पळून जायचं उकिरडा फुकायला. त्यालाबी रानात घेतला. त्या वरसी पीकपण चांगलं झालं. पंपाचं पाणी पिऊन पिऊन ऊस तरारला. वाटलं जीवन रांकेला लागलं.

पुढच्या सालापासनं पावसाने दडीच मारली जणू. त्यात एकापाठोपाठ एक पाच पोरींची लग्न. खर्चाचा मेळ जुळविता जुळविता कंबर खचली. त्यात मायबाप सरकारनं इज फुकाट द्येणार न्हाई म्हणून सांगिटलं. आता झाली का पंचाईत. इथून तिथून, सावकाराकडून कर्ज काढून बिलं भरली. पण हितं आभाळंच फाटलं तिथं ठिगळंतरी किती मारायची अन कशी?

त्यात मागल्या महिन्यात चंद्री आजारी पडली. दवाखाने झाले. भगत झाले. सगळं झालं. इथं दातावर माराया पैसा उरला नाही, औशिदासाठी पैसं आणणार कुठून? मुलगा इथं तिथं रोजावर काम करून पैसं मिळवित होता. गांड खंजाळायला बी कुणाला सवड हुईत न्हवती, तिथं हिच्याकडं बघायचं तरी कोनी? पिकाचा सगळा पैसा तर कर्जाचे हप्ते देण्यात जात होता. आणि ल्योकाची बेगारी हिच्या औशिदात. शेवटी गेल्या हफ्त्यात रान इकायचं ठरिवलं. निदान चंद्रीला शेरात चांगल्या डागदर ला दाखिवता येईल. परवाच रानाचं पैसं मिळालं. पोराला अन चंद्रीला शेराकडे लावून दिलं. त्याना म्हटलं तुम्ही हे पैसे घेवा आन तिथेच ऱ्हावा. मी मागचं सगळं आवरून येतो.

अहो पाटील मघाधरनं एवढं बोलून राहिलोय तुम्ही लक्षच देईना झालाय? सकाळधरनं पाहतोय जे बेणं येतंय ते सुक्कळीचं पहिलं हिरीत बघतंय चुक चुक करतंय अन वाटेला लागतंय. मी एवढं बोलतंय तर बोला की वाईस.....

............हे कोणाचं मढं निघालं आणिक. अरे, ही चंद्री का रडून राहिल्येय तिथं. रांड मी मेल्याव रडावं तशी रडतिय.....................

राम नाम सत्य है. राम नाम सत्य है...................