स्त्रीमुक्तीची गरज... पण कुणाला?

स्त्रीमुक्तीची गरज... पण कुणाला?


                                             "आधी तिन्ही मुलीच ना? वा वा! आता मुलगा झाला, किती छान!" 
प्रत्येकाच्या - स्त्री असो वा पुरुष - एकदा तरी कानावर पडलेलं हे वाक्य, त्या क्षणी किमान मुलींच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया उमटवून जात असतंच. त्याकडं तितक्या बारकाईनं मुली पहात नसतीलही; पण त्याचा त्यांच्या भावविश्वावर परिणाम होत असतोच. मुलगा आणि मुलगी यातील  भेद लहानपणापासूनच समाजातील विविध व्यक्तींकडून आणि पालकांकडूनही केला जातो. त्याची तीव्रता विकसित आणि विकसनशील भागात वेगवेगळी असते एवढंच.  मुलीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव टोकदारपणे होऊ लागते ती पौंगडावस्थेत आणि महाविद्यालयीन कुमारावस्थेत.आजुबाजूला  घडणाऱ्या विविध घटनांमधून आणि अनुभवातूनही.  महाविद्यालयीन वय म्हणजेच आयुष्यातील संवेदनशील आणि कोवळे वय. या वयात अनेक गोष्टींकडं बघण्याचा दृष्टीकोन बहुतांशी थोडा टोकाचाच असतो याचं कारण म्हणजे अनेक बदलांबरोबर होऊ लागलेली `आपलं व्यक्तीमत्त्व वेगळं आहे' ही जाणीव! मुलगा किंवा मुलगी म्हणून विशिष्ट भिन्न वर्तन अपेक्षित आहे या समजाविरुद्ध याच वयात मन बंड करून उठतं ते या जाणिवेतूनच. याच प्रक्रियेतून पुढं मुलगी असणं, एक स्त्री असणं ही बाब मुलींच्या अस्मितेचा भाग बनते. वय वाढत जातं तसं स्वतंत्रपणे, पुरूषांच्या बरोबरीनं आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याकरता प्रत्येक स्त्रीची स्त्रीमुक्तीची स्वतःची वेगळी व्याख्या तयार होऊ लागते.  

                    पण स्त्रीमुक्ती म्हणजे नेमके काय? माझ्या मते स्त्री पुरुष समानता हा स्त्रीमुक्तीचा आधार आहे! तरीसुद्धा                    विकसित भागातील स्त्री, विकसनशील भागातील स्त्री आणि परदेशात वास्तव्य करणारी स्त्री अशा तीनही स्तरांवर स्त्रीमुक्तीच्या संकल्पना कमीअधिक प्रमाणात वेगळ्या आहेत.   अन्यायकारक रूढींतून स्त्रीची मुक्तता करणं, स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणं, स्त्रीगर्भाची हत्या थांबवणं, स्त्रियांचे सर्व प्रकारचं शोषण थांबवणं आणि समाजात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीला मानाचे स्थान मिळवून देणं ही झाली ढोबळमानाने स्त्री आणि पुरुष समानतेवर आधारीत स्त्रीमुक्तीची व्याख्येची कलमं. पण आज स्त्रीमुक्तीची व्याप्ती वाढली आहे. काही क्षुल्लक वाटणारे पण स्त्रियांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असे विचार पुढं आले आहेत. ते जाणून घेणं  महत्त्वाचं आहे. स्त्रीमुक्तीचा ध्यास घेणाऱ्यांनी या नव्या व्याख्येची मांडणी आणि त्यावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे.  

                                       ग्रामीण भागातल्या अथवा हातावर पोट असणाऱ्या स्त्रीचे उदाहरण घेऊ. काबाडकष्ट केल्यानंतर पोटाला दोन घास तरी नियमानं मिळावेत अशी तिची किमान अपेक्षा असते. ते पोटभर अन्न मिळवतांना तिला जे सोसावं लागतं त्यापासून मुक्ती ही बाब तिच्या स्त्रीमुक्तीच्या व्याख्येत असू शकते. दारू पिऊन मारणाऱ्या नवऱ्यापासून सुटका हे तिच्या स्त्रीमुक्तीच्या व्याख्येत असणारं एक कलम होईल. पण झोपडीला अमूक ठिकाणी खिडकी नाही किंवा  भिंतीवर अमक्या चित्रकाराचे चित्र तिच्या इच्छेनुसार लावता येत नाही म्हणून तिच्या अस्मितेला धक्का वगैरे बसणार नाही किंवा ती लगेच स्त्रीमुक्ती संघटनेचा दरवाजा ठोठावणार नाही. कारण त्या अस्मितेचा विकास करण्याएवढ सौख्य तिच्या नशिबी नाही.  परंतू प्राथमिक गरजा  पूर्ण झालेल्या स्त्रीसाठी मात्र अशा निवडीचं स्वातंत्र्य असा स्त्रीमुक्तीचा एक  अर्थपदर आहे.  म्हणूनच अशी घटना घडली तर त्यासाठी ती  आकाशपाताळही एक करेल.

                               तर अशा विकसित भागात राहणाऱ्या स्वावलंबी स्त्रीची स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय यावर विचार करू.  प्रामुख्याने शहरातील स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, स्वायत्त झाली तसा तिचा आत्मविश्वास वाढला. पण त्याचबरोबर 'माझंच खरं, दुसऱ्या व्यक्तीनं दिलेलं मत चुकीचं, मी सर्वज्ञ' असा अहंकारही जन्माला आला. 'मी वंशाचा दिवा, मी घरातील कर्ता पुरूष, माझ्यामुळं घर चालतं' हा पुरूषाचा अहंकार जोपासला गेला होताच; तशीच ही वृत्ती आता स्त्रियांमध्येही दिसू लागली. साधारण वयाच्या अठरा-वीस वर्षापासून मुला-मुलींमध्ये असं स्वतःविषयीच्या 'अभिमानाचं' चित्र दिसून येतं. स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाची अशी जाणीव दोघांनाही आधीच्या पिढ्यातही होत होतीच; फक्त सामाजिक दडपणाखाली मुलींना गप्प केलं जात असे. ते आता बंद झालं आणि त्याचे परिणामही निष्प्रभ झाले आहेत.  स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कनिष्ठ लेखणं हा पूर्वापार चालत आलेला सोपा मार्ग. पुरूषांनी हेच केले.  त्याचाच कित्ता स्त्रियाही गिरवू लागल्या आहेत       समानतेची जाणीव आता कित्येक सुशिक्षित मध्यमवर्गीय घरातून मुलीला असते. पण त्याचा टोकाचा परिणाम असा झाला आहे की `जराही विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जमेल त्या सर्व मार्गांनी उपमर्द करणे  आणि आपले श्रेष्ठत्त्व सिद्ध करणे अशी नवी धारणा जन्माला आली.  तशी धारणा असणाऱ्या स्त्रियांची, मुलींची संख्या वाढते आहे! 

आता माझ्यासारख्या भारताबाहेर राहणाऱ्या स्त्रियांचे उदाहरण पाहू या.  बहुतांशी सर्वजणींना आपली आणि आपल्या मुलींची अहोरात्र तुलना पंचवीस वर्षापूर्वीच्या किंवा अगदी सद्यपरिस्थितीतल्या भारतीय स्त्रीशी अथवा भारतीय समाजाशी होऊ नये असे वाटत असते. म्हणूनच सतत होणाऱ्या 'आमच्याकडे आणि तुमच्याकडे'च्या तुलनेतून सुटका व्हावी, असे परदेशातील स्त्रीला वाटते.  आपल्या मुलीनं पुरुषांसारखं स्वतंत्रपणे, समानतेनं आणि जबाबदारीनं तिचं आयुष्य जगावं अशीच तिची इच्छा असते. तिच्या डोळ्यासमोर जो भारतीय समाज आहे तो मात्र झपाट्याने बदलतो आहे त्याची जाणीव तिला दिवसागणिक होत जाते.
                                  भारतातील प्रगत आणि सुशिक्षित स्त्रियांची स्त्रीमुक्तीची व्याख्या बदलते आहे.  या स्त्रियांच्या मूलभूत गरजा भागल्या आहेत. त्या विविध क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत.  शहरात राहणाऱ्ऱ्या काही स्त्रियांना, स्वतःकरता आणि घरातील सदस्यांकरता स्वयंपाक करणे, मुलांचं संगोपन करणे, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची काळजी घेणं या बाबी व्यक्तीमत्त्वविकासात आणि महत्त्वाकांक्षा गाठण्यातील आडकाठी आहे, असं वाटू लागलं आहे. हाही एक वेगळा गट आहे. या बाबी अनेक सुशिक्षीत स्त्रियांच्या मते अन्यायकारक बंधनं आहेत. अशा कित्येक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांची स्त्रीमुक्तीची कल्पना म्हणजे या साऱ्या जबाबदाऱ्यांच्या बंधनातून मुक्त होणे. कित्येक घरात पुरूष आपली जबाबदारी ओळखून पत्नीला सहकार्य करत आहेत. यशाच्या पायऱ्या चढतांना आज काही स्त्रिया स्वतःची कौटुंबिक जबाबदारी आपल्या शिरावरून दुसऱ्यावर देऊन मोकळ्या होत आहेत. तर काहींना ही जबाबदारीच नको आहे.  साधारणपणे स्वतःच्या पायावर उभी असलेली शहरातील एखादी स्त्री अशा बंधनातून मुक्त होणाऱ्या गटाची प्रतिनिधी मानता येईल.   पण असलेली जबाबदारी आपल्या नवऱ्याच्या किंवा दुसऱ्याच्या डोक्यावर टाकल्याने या स्त्रियांनी स्त्रीमुक्ती किती प्रमाणात साधली? त्यांच्यातील कित्येक जणींची स्त्रीमुक्तीची व्याप्ती कौटुंबीक जबाबदाऱ्या टाळण्यापर्यंतच न थांबता वाढतेच आहे. इथंच दुसऱ्या स्त्रीचा या विषयात प्रवेश होतो. ही दुसरी स्त्री म्हणजे या `मुक्त' स्त्रीच्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी स्त्री. अशा मुक्त स्त्रीच्या घरचा स्वयंपाक वगैरेंसारख्या जबाबदाऱ्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सांभाळणाऱ्या स्त्रीच्या मुलाबाळांची आणि इतर कौटुंबिक जबाबदारी कोण घेतं?  त्यांना हवी असणारी स्त्रीमुक्ती केवळ चार पैसे गाठीला बांधून साध्य होते का?

                                   सांस्कृतिक वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील पुण्यासारख्या शहरातील  सुशिक्षित  स्त्रियांची स्त्रीमुक्ती आजच्या घडीला  दुटप्पी आहे.  बऱ्याच वेळा कित्येक वेळा हितसंबधानुसार ह्यांची स्त्रीमुक्तीची धोरणे लगेच बदलतात.  'माझी आई खरी आणि सासूच नेहमी छळते' असाच पूर्वग्रह असणाऱ्या तरुणींची संख्याही इतर  शहरातूनही वाढते आहे.  त्याचवेळी मुलीकरता एक धोरण आणि सुनेकरता दुसरे असा वारसा  स्त्रिया  खेड्यातच काय शहरातूनही अभिमानाने चालवत आहेत.  थोडक्यात  स्त्रीमुक्तीचा डमरू  आपल्या फायद्याकरता वापरायचा एवढेच तत्त्व  एका गटाने स्वीकारले आहे.

                                स्त्रियांना कित्येक वेळा पुरूषांपेक्षा कमी दर्जा दिला जातो.  स्त्रियांना मिळणारे अधिकार, मानधन, प्रसिद्धी सर्व पुरूषांच्या बरोबरीनं असायला हवं पण ते  असतंच असं नाही. ते समान व्हावं म्हणून प्रयत्न करणे म्हणजे स्त्रीमुक्ती असे मानणारा एक गट आहे.  प्रगत आणि प्रामुख्यानं शहरातील स्वावलंबी स्त्रीगटात आढळणारी आणखी एक सुधारीत आवृत्ती म्हणजे 'जी प्रत्येक गोष्ट पुरूष करतो ती महिलांनी का करू नये' असा स्पर्धेचा विचार असणाऱ्या स्त्रिया.  ही समानता साधतांना काही स्त्रिया पुरुषांचे अंधानुकरण करत आहेत. कारण ती समानता साधतांना सर्व पातळीवर पुरुषांशी स्पर्धा करणे हा स्त्रीमुक्तीचा अविभाज्य भाग झाला आहे.   एकत्र कुटुंबातून प्रथम विभक्त कुटुंबे  तयार झाली.  त्यानंतर अशा बंधनातून मुक्त होणाऱ्या स्त्रियांचा कल, 'नवरा नको आणि मुलेही नको' असा होऊ लागला आहे.  याच गटात मोडणाऱ्या, स्वत:च्या पायावर उभ्या असणाऱ्या विशी ते पस्तीशीतील कित्येक स्त्रियांना आज कित्येक कारणांमुळे लग्न करण्याची गरज वाटत नाही.  आपल्या आयुष्याचं नियोजन त्यांनी कधीचच केलं आहे, त्यात `पायातील बेडी' ठरणाऱ्या नवऱ्याला, मुलांना स्थान नाही.  ममतेचा दाखला देऊन पुरूषांनी स्त्रियांना नेहमीच मागं टाकलं आहे, त्याचीच ही विरुद्ध टोकाची प्रतिक्रिया म्हणावी का?

                                 सर्व प्रकारे पुरूषांशी स्पर्धा करणे हे यांच्या स्त्रीमुक्तीच्या यादीमधील पहिले कलम आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की समता आणि आंधळी स्पर्धा यातील भेदच उरलेला नाही. त्यामुळं मग पुरूषांप्रमाणं आपल्या गरजा कोणत्याही बंधनात न अडकता भागवण्यात या गटातील काही स्त्रिया मागं नाहीत. असं करताना पुरुषाच्या तशा वागण्याचं समर्थनच होतं याचं भानही त्यांना नाही. नैतिक, अनैतिक, प्रकृती, संस्कृती हे शब्द तर मग दूरच रहातात. तसेही असल्या शब्दांच्या कचाट्यात न अडकता, या स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यातील पुरूषांचं स्थान कधीचे पक्के केले आहे. आज्ञा पाळणाऱ्या रोबोचे असते तेच! त्यांना मर्जीनुसार वागणारा पुरुष हवा आहे, गरज भागली की एखादी वस्तू टाकण्याइतके सहज दूर फेकता येईल असा. 

                            पण मुख्य प्रश्न असा आहे की  या गदारोळात जगभरातली खरी स्त्रीमुक्ती हवी असणारी स्त्री कुठं आहे? अगदी आरंभी वर्णन केलं ती स्त्री; दारिद्र्य, व्यसनं, रोगराई अशा समस्यांशी झगडणारी स्त्री या चित्रात कुठं बसते? त्यातील कित्येकींची आयुष्य दोन वेळच्या भाकरीतच सामावले आहे.   कित्येक स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क आणि प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास शक्ती हवी आहे. एका टोकाच्या विशिष्ट विचारसरणीच्या अन्यायकारक बंधनात त्यांचे जीवन अडकले आहे. ते अथडळे दूर करून समाजातील विविध थरातील महिलांना मुक्त करण्याची आज खरी गरज आहे.   जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे स्त्री गर्भाची, नवजात मुलींची हत्या केली जाते त्या समाजव्यवस्थेपासून कायमची मुक्ती मिळवण्याची गरज आहे. दुर्दैवाने अशा ठिकाणी 'स्त्रीमुक्ती' या शब्दाचा अर्थही बिचाऱ्या स्त्रियांना माहिती नाही. 

देशादेशांमध्ये असणाऱ्या स्त्रीमुक्तीची व्याप्ती जरा भिन्न असेल पण त्यांच्यात समान फ्रिक्वेसीचे  स्त्रीमुक्तीसंदेशाचे जाळं कधीच विणलं गेलं आहे . असे असूनही जगभरातले  तळागाळातल्या स्त्रीचे शोषण थांबलेले नाही. म्हणूनच  मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आणि समाजात मानाचे स्थान मिळालेल्या स्त्रियांनी विचार करायचा आहे की त्यांची  स्त्रीमुक्तीची व्याख्या विस्तारणे हे या गरजू स्त्रियांची मुक्तता करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे का? स्त्रीमुक्ती एवढी उथळ  आणि स्वार्थी आहे का?
समाजातील कोणत्याही घटकाकडून होणारं स्त्रियांचं शोषण थांबवणं, स्वकेंद्रित, संकुचित लोकांच्या विचारसरणीपासून स्त्रियांची मुक्तता करणे ही आहे खरी स्त्रीमुक्ती. यात स्त्रीच दुसऱ्या स्त्रीकडून होणारे शोषणही आलेच. 

  स्त्रीमुक्तीवादी प्रसिद्ध लेखिका जर्मेन ग्रीर म्हणते,
"All societies on the verge of death are masculine. A society can survive with only one man; no society will survive a shortage of women."

 थोडक्यात म्हणजे स्त्रियांजवळ असणारी सृजनाची क्षमता ही त्यांची शक्ती आहे, अथडळा नाही.  म्हणूनच समाजाचे आणि पुरुषांचे अस्तित्त्व स्त्रियांवर अवलंबून आहे.   हे पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही लक्षात ठेवावे. स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात आणणं ही फक्त स्त्रियांची जबाबदारी नसून ती  स्त्री आणि पुरूष दोघांचीही आहे. तारतम्य ठेऊन स्त्रीमुक्तीची ऊर्जा आता जपून आणि योग्य ठिकाणीच  वापरायला हवी. 

-पूर्वप्रसिद्धी सावली दिवाळी अंक २००७
या लेखाकरता ज्या स्नेही मंडळींनी सुधारणा सुचवल्या, मदत केली त्या सर्वांची मी ऋणी आहे.