कर्माझिरी

"आई ,१५ ता. काय करायचं?"

"तू जे ठरवशील ते."

"बाबा, आपण एका छानशा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ."

" बड्या हॉटेलमध्ये जायचं आणि तेच तेच पदार्थ खायचे आणि आवडले नाही की पैसे गेल्याचं दु:ख करत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही दोघजणं कर्माझिरीलाच जा."

"हो. ही छान आयडिया आहे, म्हणजे मला घरी काही करत बसायला नको. काही जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईक शुभेच्छा द्यायला येणारच".

"आपण आपल्या संसाराची सुरुवात जंगलात सुरू केली आणि आता लग्नाचा २५वा वाढदिवस जंगलात मस्त कल्पना!"

"जरा इथल्यापेक्षा तिथे उकाडाही नसेल नाही का? ( माहेरी २० दिवस राहून आल्यामुळे नेहमी सामान्य वाटणारं ४३ डिग्री अती वाटतं होतं)"

मध्यप्रदेश पर्यटन विकास  महामंडळाला दूरध्वनी केला. एक दिवस एका रात्रीचे भाडे ३६०० रु. हे जरा जास्तच वाटले.  कर्माझिरीच्या कार्यालयात फोन लावला. सध्या मोसम नसल्यामुळे २००० रु (जेवण व राहणं)प्रमाणे सवलतीत सेवा देत आहे.  लगेच विचार न करता तिथे आरक्षण करून टाकले.

सध्या तिथे फार गर्दी नसेल तर दोघांनीच जंगलात राहायचं जीवावर आलं. मुलं  कितीही आग्रह केला तरी यायला तयार नव्हती. लहान होती तेव्हा बरं होतं.( लहान असताना वाटायचं कधी एकदा मोठी होतील) १० दिवसांपूर्वीच सरिता प्रवीण मस्कतहून आली आहे दोघांनाही फिरायची आवड आहे. त्यांना विचारलं तर ते एका पायावर तयार झाले. त्यांचा ८ वर्षाचा आदित्य येतोय म्हटल्यावर लेक यायला तयार झाली.

कर्माझिरी हे आरक्षित वन नागपूर पासून १०५ कि.मी. अंतरावर जबलपूरच्या रस्त्यावर आहे. सकाळी न्याहारी करून ९ वाजता निघालो अन ११.३० पोचलो. वाटेत 'बाज़' लागलं. हे विश्रामगृह कसं आहे, काय दर आहेत ते पाहू आणि मग पुढे जाऊ असा विचार केला. ते रिसॉर्ट आम्हा सगळ्यांनाच आवडलं. तिथे  घासाघीस करून कमी (मप्र एवढ्याच)दरात मिळवलं. ११ ते ३ ह्या वेळात पार्क बंद ठेवतात. जेवून, तयार होऊन निघायचीच वेळ झाली.आपल्या गाडीने पार्कात  फिरता येतं पण आम्ही भाड्याने मिळणारी उघडी  जिप्सी घेतली. गेटवर आत जायचा परवाना व गाईड घेणं अनिवार्य आहे  तो घेऊन जंगल सफारीला निघालो.

प्रवेश करताच गाइडची टेप सुरू झाली. पेंच टाईगर रिझर्व व आजूबाजूचा परिसर रुदियार्ड किपलिंगचे प्रसिद्ध द जंगल बुकचे वास्तविक कथा क्षेत्र आहे. पेंच टाईगर रिझर्व, इंदिरा प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच मोगली अभयारण्य व इतर आरक्षित वनाचे एकूण क्षेत्रफळ ७५७ वर्ग कि.मी. आहे. हे उद्यान सातपुडा पर्वत रांगाच्या दक्षिणेस आहे. पेंच नदीमुळे हे उद्यान उत्तर व दक्षिण भागात विभागल्या गेलं आहे. उत्तर भाग महाराष्ट्रात येतो तर दक्षिण म.प्र. मध्ये. इथे वाघ, बिबटे, हरीण, मोर, सांभर, नीलगाय, सोनकुत्रे, डुक्कर, मांजर कोल्हे लांडगे असे अनेक प्रकारचे प्राणी व ३२५ प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.  सावधानी म्हणून वाघ दिसल्यावर काय करायचे? सरिताने गाईडला विचारले. आपण काहीच नाही करायचे जे काय करायचे ते वाघच करेल, गाइड उत्तरला. हानबिल,इगल,बजार्ड असे एका नंतर एक  गाईड पक्षी दाखवत होता. गाईड अशिक्षित होता पन पक्ष्यांची नावे अंग्रेजीतूनच सांगत होता. थोड्या-थोड्या अंतरावर हरण व मधूनच वाळलेल्या गवताच्या पार्श्वभूमीवर मोर  उठून दिसत होते.  खरंतर काळा-काळा कापूस पिंजलाही होता पण मोर काही फुलवून पिसारा नाचत नव्हता. आम्ही त्याची आळवणी करू लागलो मोगलीच्या वनात नाच रे मोरा नाच. मोर आमच्या गाण्याला घाबरून तर पळून गेलाच आणि वर गाइडने दटावलं.  आवाज ऐकून प्राणी तर पळून  जातातच आणि पक्ष्यांचे काल (कॉल)ही ऐकायला येत नाहीत. जवळपास जर वाघ/बिबट्या असतील तर पक्षी व माकडे आपल्या हालचाली व आवाजातून ते इतर प्राण्यांना सावध करत असतात. जी भरके मोर आणि हरणं पाहून झाली होती. आता फक्त वाघ/बिबट्या बघितले की जंगल यात्रा सफल झाली. जंगल-झाडीत वाघोबा कुठे लपले होते माहीत नाही मला पाहून खुदकन हसायला ते काही बाहेर येत नव्हते.सगळे पाणवठे  पालथे घालून झाले होते. झलक दिखलाजा, बाहर आ जा ,एक बार आ जा आ जा आम्ही गाणं पुटपुटायला लागलो. वाटेत भेटणारे एकमेकांना काही पाहिलं का म्हणून विचारत होते. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. सकाळच्या फेरीत वनखात्याचे लोकं वाघाला  हत्तीच्या मदतीने बंदिस्त करून ठेवतात व हत्तीवरून पर्यटकांना दाखवायला घेऊन जातात. आम्हाला  मात्र नैसर्गिक अवस्थेतच बघायची इच्छा होती.ही पहा घोष्ट ट्री. अरे बाबा खूप घोष्ट (भूत) ट्री बघितल्या. आता फक्त वाघ दाखव. त्या झाडाला वाघानी ओरबाडल्याच्या ताज्या खुणा होत्या. ह्या भुताच्या झाडांच वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाचे दिवसातून तीनदा रंग बदलतात ,एका फांदीला एकच पान असतं आणि दगडावर उगवल्यासारखे वाटतात. आम्ही वाघ दिसण्याची आशा सोडून दिली तेवढ्यात आमच्या समोरच्या गाडीत असलेल्या  गाइडने तोंडावर बोट ठेवून  समोर बघा अशी खूण केली. समोर पाहतो तर काय डोळे विस्फारून पाहतंच राहिलो. दस्तूरखुद्द आमच्या समोर बिबट्या! फोटो काढायचं भानच राहिलं नाही. लक्षात येऊन कॅमेरे लावी-लावी पर्यंत झुडुपात गायब झाला. बऱ्याच वेळ आम्ही बाहेर यायची वाट पाहत बसलो.  परवानगी नसल्यामुळे ह्यांना खाली उतरून पाहायची खुमखुमी आवरावी लागली. गाडीच्या खाली उतरल्यास १००० रु दंड. तुम्ही लकी आहात बिबट्या क्वचितच पाहायला मिळतो. वाघ तर काय सगळ्यांनाच दिसतो असे म्हणून चालकाने व गाइडने आम्हाला खूश केलं.चालकाची आणि गाइडची मेहनत सार्थकी लागली.

आभाळ भरून आलं होतं. आता परतायची घाई झाली होती. पाऊस पडायच्या आत  विश्रामगृह ते पार्क हे  १२ कि.मी.च अंतर पार करायचं होतं. आदित्याची आणि चालकाची इच्छाशक्ती  फळली. धो धो पाऊस आणि जोराचा वारा त्यामुळे आडोशाला थांबून काही उपयोग नव्हता.पहली बारिशमें भीगने का मजाही कुछ ओऊर है असे म्हणत जे गाडी दामटली ते रिसॉर्ट आल्यावरच गाडी थांबवली.  नखशिखान्त भिजण्याचा अनुभव व आनंद केव्हा घेतला होता ते आठवत बसलो नाही.