ह्यासोबत
" लय भारी, एकदम झक्कास आयडिया, यार!" पोप्या ओरडला. पोप्या जणु काही सगळ्यांच्याच मनातले बोलला होता. तळ्यापासून दूर, पण गाडीपासून जवळ असलेला तो निर्मनुष्य वाडा- मुबलक चंद्रप्रकाश असलेली दुसऱ्या मजल्यावरची गच्ची- सगळ्यांना एकदम पसंत पडली. "मान गये, शिऱ्या! पण..." स्वप्नीलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
"पण? पण काय? आता उगाच खो घालु नकोस!" दिप्या म्हणाला. त्याला केव्हा एकदा बाटली उघडतोय असे झाले होते.
"अरे, तसे नव्हे. पण एक तर आपल्याला इथले काही माहीत नाही, आणि आपण कुठल्या वाड्याच्या गच्चीवर ३१ डिसेंबर करायचा असेही काही ठरले नव्हते. कशाला भलतीकडे विनाकाऱण रिस्क घ्यायची आणि नसत्या फ़ंदात पडायचे?" स्वप्नीलच्या तोंडातून जणु काळच बोलला होता.
" ए ss, गप ना यार! समजवा रे त्याला" पोप्याला फ़ुल्टु मूड आला होता. परागने त्याच्या हातातली हॉकी स्टिक स्वप्नीलच्या हातात दिली आणि स्वप्नीलच्या हातातली बॅटरी स्व:ताच्या हातात घेतली. त्यामुळे स्वप्नीललाही थोडे बरे वाटले. पराग अगदी शाळेपासून कॉलेजात हॉकी टीममध्ये असल्यामुळे त्याच्याकडे बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात हॉकी स्टिक असत, आणि त्यापैकी एक-दोन तरी तो अशा पिकनिक वगैरे दौऱ्याच्या वेळी बरोबर बाळगत असे.
"कर्र..र्र.." वाड्याभोवती असलेल्या कुंपणाचे गेट अतिशय गंजलेले होते. त्यामुळे जरा काळजी घेतच शिऱ्याने ते आतल्या बाजुला ढकलले. पण ते जरास्सं उघडलं. तरीही त्यातून आत शिरणे अशक्य होते. " ढ्ढाम.." - पोप्याने त्यावर ताकदीनिशी लाथ मारली. तसं ते जरा हलल्यासारखं झालं, पण मागच्या बाजुला काहीतरी होते कदाचित, जे दार उघडु देत नव्हते. शिऱ्याने, साखळीने वगैरे दार बांधलं गेलेलं नाहीये ना, याची खात्री करुन ते पुन्हा ढकलण्यासाठी पवित्रा घेतला, आणि... आणि, तो वेगाने दाराला स्पर्श करणार - इतक्यात..! दार बाहेरच्या बाजूला तुटून पडले. बाहीला घासून गेल्यामुळे पोप्याला थोडे खरचटले. " च्या मारी, पनवती!" रक्त आलेले पाहून पोप्या स्वप्नीलवर वसकन ओरडला.
कुंपणाच्या आतील जमिनीवर गवतच गवत दिसत होते. अगदी छातीएवढे उंच गवत आणि एक अरुंद पायवाट वाड्याकडे गेलेली. हाताने आणि हॉकी स्टिकने गवत बाजुला सारत आम्ही वाड्याच्या मुख्य दाराकडे निघालो. तिरक्या पायऱ्यांच्या तुटलेल्या कोपऱ्यात बऱ्यापैकी मोठे वारुळ दिसले. परागने त्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. वारुळाचा वरचा भाग खचल्यासारखा वाटत होता. बीळाच्या तोंडापाशी एका छोट्या पक्ष्याचा अर्धवट उरलेला सांगाडा आणि त्याभोवती मुंग्या..पाहुन माझ्या छातीत धस्स झालं. " मुंग्या ऍण्ड साप कभी साथ साथ एक वारुळमें नही रह सकतें, और यहांपे सिर्फ़ मुंगी है तो डरनेका नाय", बायो-त सगळ्यांत चांगले मार्क्स मिळवलेला दिप्या म्हणाला. त्यामुळे जरा हायसं वाटून आम्ही पायऱ्या चढू लागलो.
" आअ..ss क्ष s.." स्वप्नील वाडयाच्या मुख्य दारापाशी शिंकला. सवयीप्रमाणे आणखी दोनदा शिंकणार असे वाटुन मी स्वप्नीलच्या पुढून बाजुला झालो. पोप्याने स्वप्नीलवर जळजळीत नजर रोखली . सगळे स्तब्ध. पण चक्क पुढच्या दोन शिंका गायब. स्वप्नीललाही आश्चर्य लपवता आले नाही. अर्धवट मोडक्या अवस्थेत असलेले मुख्य दार स्वप्नीलने स्टिक लावताक्षणी उघडले. स्वप्नील पाठोपाठ आम्ही आत पाऊल टाकले, आणि...समोरच्या भिंतीवरची एक मोडकी फ़्रेम खाली पडली. पायात काचाच काचा झाल्या. दचकून सगळे एक पाऊल मागे झालो.
वाड्याच्या आत सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते. दोन-तीन खोल्या असाव्यात पुढच्या खोलीला लागून. डाव्या बाजुला असलेल्या भिंतीवर चार खुंट्या आणि दोन खिडक्या होत्या. खुंट्या आणि कोनाडे कोळीष्टकांनी भरलेले होते. तो कदाचित कुठल्यातरी सावकाराचा टिपिकल दिवाणखाना भासत होता. उजव्या बाजुची भिंत बऱ्यापैकी सुस्थितीत दिसत होती. त्या भिंतीला लागुनच वरच्या मजल्यावर नेणारा जिना होता.
जिना प्रशस्त दिसत असला तरी मोडलेल्या पायऱ्यांवरुन वरच्या मजल्यावर जायला दिव्य करावं लागणार हे कळून चुकलं होतं. परागने पायऱ्यांवरून बॅटरीचा झोत वर सरकवला तसे आम्हां सर्वांचे लक्ष भिंतीवरल्या रोमन घड्याळाकडे गेलं. काही आकडे गायब झलेल्या त्या घड्याळाचे काटे बारावर स्थिरावले होते...