शाळा; शाळेतून आल्यावर गृहपाठ, सतराशे साठ क्लासेस, यांमुळे मुलांचा जीव अगदी हैराण होऊन जातो. मनसोक्त खेळावे म्हटले, तर त्यासाठी मैदान नाही, त्यामुळे खेळणेही बंदिस्त, चार भिंतींच्या आत. अशा परिस्थितीत मनसोक्त हुंदडायला एखाद्या सुबकशा गावातील आजोळच हवे. झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावी जायला हवे. फुलपाखरांच्या मागे धावण्यातली मजा अनुभवायला हवी.
वेळेचे कोणतेही बंधन न पाळता मनसोक्त खेळायलाही हवे. छोट्या मुलांना मामाच्या गावाला जाण्याची मजा अनुभवता यावी यासाठीच कोकणातील तुरळ गावात करकरे आणि पित्रे कुटुंबीय आजोळचा आनंद देत आहेत. शहरांमधील लोकांकडून या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. या गावात सुट्टी घालविण्यासाठी येणारी सगळी छोटी मुले करकरे आणि पित्रे यांची भाचेमंडळी असतात. त्यामुळे त्यांच्या लाडकोडांबरोबरच त्यांना निसर्गातील गोष्टींची ओळख करून देण्याचे कामही ते करत आहेत.
या अनोख्या संकल्पनेबद्दल मदन पित्रे म्हणतात, ""अलीकडील शहरांत राहणाऱ्या छोट्या मुलांना आमच्या वेळेसारखी मजा अनुभवायला मिळत नाही. आमच्या काळातील खेळांचीही त्यांना माहिती नसते. एकत्र कुटुंब, रात्रीच्या चांदण्यांत आजी किंवा आजोबांकडून सर्वांनी मिळून गोष्टी ऐकण्याचा कार्यक्रमही तसा दुर्मिळच झाला आहे. या सर्वांचा आस्वाद छोट्या मुलांना घेता यावा, यासाठी चार वर्षांपासून आम्ही आमच्या शहरी भाचेलोकांना तुरळ गावात बोलवत आहोत.
इथे या मुलांसाठी कोणतेही कृत्रिम शिबिर नसते, तर त्यांची सुट्टी चांगली जावी यासाठी आम्ही इथे सगळी व्यवस्था केली आहे. आमचेही एकत्र कुटुंब होते, काळाच्या ओघात आम्हीही नंतर विभक्त झालो; पण त्याची कसर आम्ही एप्रिल आणि मे महिन्यात भरून काढतो. तुरळ इथे करकरे आणि पित्रे कुटुंबीयांचा मोठा वाडा आहे. या वाड्यात येणाऱ्या भाच्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. 8 ते 15 वयोगटातील मुलांकरिता पाच दिवसांसाठी 2900 रुपये फी म्हणून आकारले जातात. दोन वेळचे जेवण, नाष्टा याबरोबरच छोट्या मंडळींना भूक लागेल तेव्हा खाऊ दिला जातो.
या मुलांची व्यवस्था पाहण्यासाठी इथे गडी नाहीत किंवा स्वतंत्र व्यवस्थापकही नाहीत. घरची सर्व मंडळी त्यांची व्यवस्था अगदी पाहुण्याप्रमाणे स्वतः ठेवतात. तुरळ गावातील घरी आल्यावर त्यांचे स्वागत गूळ आणि पाणी देऊन केले जाते. इथे त्यांना गावाकडच्या पाहुणचाराची पहिली झलक पाहायला मिळते. गावाकडच्या पाहुणचाराबरोबरच या मुलांनी निसर्गाशी समरस व्हावे या दृष्टीनेही इथे प्रयत्न केले जातात. समुद्रसपाटीपासून 400 फूट उंच असलेले हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सुमारे 100 एकर जमिनीवर करकरे आणि पित्रे यांच्या काजू, आंबा, कोकमच्या बागा आहेत.
शिवाय तिथे जांभूळ आणि करवंदांची झाडेही भरपूर आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत ही मुले मामाच्या गावाला जात असल्याने खास उन्हाळी पिकांचा त्यांना मनसोक्त आस्वाद घ्यायला मिळतो. इथे 60 ते 70 प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत. त्यांची माहिती या बाळगोपाळांना करून दिली जाते. बरेचदा टीव्ही, सिनेमा याव्यतिरिक्त मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्थित माहिती नसलेल्या आणि पिझ्झा, बर्गर याव्यतिरिक्त गावरान मेजवानीचा आस्वाद घेतला नसलेल्या या मुलांना या गावातील सहल ही एक पर्वणीच असते.
इथे आट्यापाट्या, लगोरी यांसारखे खेळ शिकवले जातातच; पण बेसबॉल, डॉजबॉलही उपलब्ध करून दिला जातो. झाडावर चढून कैऱ्या तोडणे, त्या कराकरा खाणे, मे महिना असेल तर हापूस आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेणे या गोष्टींमुळे मुले हरखून जातात. डोंगरावरील फेरफटका, पतंग उडवणे, हौदात डुंबणे, चांदण्यांत फिरणे, बैलगाडीत बसणे, गावाकडच्या लाल मातीतून अनवाणी पायांनी फिरणे, मुलींना बांगड्या भरणे या गोष्टी हे छोटे दोस्त तिथे अनुभवतात. त्यामुळे शहरी विश्वाच्या पलीकडे एक खूप वेगळे आणि सुंदर विश्व आहे याची जाणीव मुलांना तिथे गेल्यावर होते.
या गावात वेगवेगळ्या जातींचे पक्षीही भरपूर येतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची मजा इथे अनुभवता येते. शिवाय प्रत्येक पक्ष्याची व्यवस्थित माहिती सांगण्यासाठी पक्षिनिरीक्षक तज्ज्ञ इथे येतातच. आपली परंपरा मुलांना समजावी, प्रार्थनेचे मोल समजावे यासाठी इथे येणाऱ्या मुलांना दोन गोष्टी मात्र सक्तीने कराव्या लागतात. सकाळी 15 ते 20 मिनिटे व्यायाम आणि संध्याकाळची प्रार्थना सर्वांसाठी सक्तीची असते. या पाच दिवसांच्या शिबिरातून ही मुले ज्ञानाचे भांडार घेऊन घरी परततात, ही पुंजी त्यांना आयुष्यभर पुरणारी असते.
केवळ मनोरंजन नाही, तर समज येण्याच्या, परिपक्व होण्याच्या दृष्टीनेही अशा सहली त्यांना उपयुक्त ठरतात. आपल्याकडे असलेल्या जागेचा अतिशय चांगला वापर पित्रे आणि करकरे कुटुंबीय करत आहेत. कृषी पर्यटनाचाच पण लहान मुलांसाठी असलेला हा उपक्रम नक्कीच अनोखा आहे.