बसल्या बसल्या सुचलेली बेसुमार सुमार अशी ही कविता आहे. पण कविता करण्याचा माझा पिंड नसल्याने, अशी सुमार कविताच प्रकाशित करण्यावाचून काही गत्यंतर नाही. तरी वाचकांनी ती हलकेच घ्यावी आणि सोडून द्यावी.
शांततेच्या सोहळ्याला धुंद काळी रात आहे रातराणीच्या फुलांचा गंध थोडा गात आहे
अंबरीच्या चांदण्यांचे तेजही ते क्षीण झाले गौरकांती अप्सरेची थेट त्याला मात आहे
विसरुनी गेलो स्वतःला पाहुनी त्या अप्सरेला स्वर्गिचा मी देव नाही हे परी ध्यानात आहे
पाहुनी मजला समोरी लाजुनी ती चूर झाली भरारी मम कल्पनेची सातव्या गगनात आहे
स्वर्गिची ती अप्सरा परी घाबरोनी पळून गेली बायकोच्या घोरण्याचा काय मेला वात आहे
उमजले मजला आता लाजली का अप्सरा ती सुंदरी असली तरी ती माझीया स्वप्नात आहे