वारस

एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या, असं होतं. खरं तर याविषयी काहीतरी लिहावं हे बऱ्याच दिवसांपासून मनात होतं. आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननं त्याला एक नवी जाग दिली.

पित्याची शाल अन मातेची उब घेऊन येणारं हे अर्भक. या चिमुकल्या जिवाला आपण किती स्वरूपांत पाहत असतो! एकमेकांच्या असीम समर्पणाची पावती, घराण्याचा वारस, वंशाचा दिवा, आई- वडिलांच्या म्हातारपणाची काठी, सक्षम पालक म्हणवून घेण्यासाठीची पात्रता की अजून काही? की फक्त निसर्गाचा नियम म्हणून झालेलं प्रजनन? या सगळ्याचं स्वरूप कालानुसार, प्रसंगानुसार आपण ठरवणार असतो. ज्या ज्या घरात हा जीवरूपी प्रकाश पडत नाही, ती सगळीच घरे अंधाराने भरलेली आहेत असं समजायचं का? काही कारणांमुळे जिथे हा अंकुर फुटत नाही, तिथे समर्पणच नाही? का जिथे हा वारस नाही त्या घराणेशाहीचा लौकिक केवळ तो नसल्यानेच वृद्धिंगत होणार नाही?

आपल्या जिवासारखा दुसरा जीव निर्माण होणं, हा अनुभव लग्नरूपी बंधनातून आलेल्या दोन जिवांचे बंध अजून घट्ट करतो. पण काही कारणांमुळे असा जीव जन्म घेत नसेल, तर तो बंध अजून घट्ट व्हावा, हीच तर काळाची अपेक्षा नसते?

हे इवलेसे रोप रुजविण्याच्या आधीच त्याचे भांडवल करून किती जीव नागविले जातात? मूल होणार नाही हे कळल्यावरसुद्धा किती कुटुंबांतले लोक आपल्या सुनेविषयी, ती मांडवात होती त्या वेळेइतकेच प्रेम, आदर किंवा कौतुक बाळगतात! शिक्षणाने संपन्न झालेले आम्ही, केवळ या एका गोष्टीला फ्लॉ समजून "नवीन आई' या पर्यायी व्यवस्थेपर्यंत जातो.

"तू त्याला मूल देऊ शकत नाही म्हणून तो असा वागत असावा'

असे सांगणारी सासू जर एखाद्या सासुरवाशिणीची आई असती, तर इतक्‍या सहज आपल्या मुलाच्या या भावी पराक्रमाचे समर्थन करू शकली असती काय? मुलगा, सून, अन्‌ नातवंडांचे वर्षो न्‌ वर्षे तोंड न पाहिलेली, एकाच गावात असून मुलेसुनांची वेगवेगळी घरे असणारी जाणकार, बुजुर्ग माणसेदेखील

"अजून नाही का काही?''

हे असले वयस्कर प्रश्‍न विचारून त्या जोडप्याबद्दलची हिणवणूकवजा काळजी चारचौघांत व्यक्त करतात. हे प्रश्‍न आणि मानवी मनाच्या अपेक्षा इथेच संपत नाहीत. अनेक वर्षं अपत्यासाठी प्रतीक्षा करत असलेलं कुटुंब किंवा त्या कुटुंबाचे सो कोल्ड हितचिंतक आपले जाहीर अन्‌ निरागस मत मांडतात...

"काही असो बाबा, लहान मूल घरात आलं, पाळणा हलला म्हणजे भरून पावलं...''

मग हाच नियम अंतिम व कायम का जोपासला जात नाही. काल पर्यंत काहीही व्हावं अशी दैवाकडे माफक अपेक्षा करणारे आम्ही... "आता तरी ह्या खेपेला तुम्हाला मुलगा होईल बरं का..." अशी सदिछचा व्यक्त करतो. दुसरयाने सांगण्याचे सोडा काही घरात तर चार चार मुली केवळ मुलगा होत नाही ह्या कारणाने केवळ प्रतीक्षा यादी म्हणून येतात. ’सरस्वती’ विद्येचे आणि ’लक्ष्मी’ हे संपत्तीचे मुख्य दैवत माणणारया देशात ४८ टक्के मुलींना आपण मुलगा असायला हवे होते असे वाटायला लावणारी कसली ही पालनशैली? याला काही हौशि किंवा सुज्ञ कुटुंबप्रमुख अपवाद असतीलही पण आज हा प्रश्न नको तेवढा बिकट आणि भयानक होतोय. गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारी गर्दी पाहून या दोघांच्याही दुटप्पीपणाची चिड येते.

नुकत्याच झालेल्या आरोग्यविभागाच्या पुरस्कार कार्यक्रमात स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी आणि जाणकारांनी यांवर चिंता व्यक्त करुन आता कठोर पावले उचलण्याची वेळ आल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ उदरभरणाचे साधन नसून त्याच्या साह्याने योग्य अणि अयोग्य यांतील भेद ओळखन्याची नवी द्रुष्टी प्राप्त होत असते. आजही आपल्या समाजात डॉक्‍टर हा शिक्षणातील राजा मानला जातो. दवाखान्यांबाबत सामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. स्वतः पालकांच्या सहभागाशिवाय असे प्रकार घडणे शक्‍य नाही; पण तरीही एक जबाबदार घटक म्हणून डॉक्‍टरने आपली खरी भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे. आपल्या पांढऱ्या शुभ्र कोटावर केवळ दोन पैसे जास्त मिळवता येतील म्हणून एवढा मोठा डाग लावून घेणे, ही या प्रतिष्ठित व्यवसायासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. सुदैवाने, कानावर बंदूक टेकवून "करता की नाही हे काम?' अशी परिस्थिती या शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात डॉक्‍टरांवर अजून तरी आलेली नाही.

यासाठी कायदा जरी असला तरी खरा संबंध आहे तो भावनेशी. कायद्याने फार तर भीती वा जरब निर्माण होईल; पण त्याने अंतरीच्या जाणिवा जागृत होतीलच याची शाश्‍वती नाही. तसे झाले तर बंटी काय किंवा बबली काय... सारखेच! अगदी नशिबाने किंवा नियतीने दोघांनाही नाकारले तरीही उभयतांमधले नाते हे मात्र राजा-राणीचेच राहावे, ही अपेक्षा.

सुनील चोरे - पुणे, (बेल्हे)
sunilchore@rediffmail.com 

(मूळ प्रकाशन ’सकाळ’-२८ एप्रिल, ’लोकमत’-२६ एप्रिल, ’सामना’-७ मे २००७)