भावचिंतन
पुंडलिके तुज प्रेमाने आणिले
भीवरेच्या काठी पांडुरंगा
युगे अठ्ठावीस उभा तू गा तेथे
शीणवीत काया, भक्तांसाठी ....
ज्ञानेशाची ओवी तुकयाची वाणी
स्तवूनी येथ झाली, अमर तुज...
ओवीओवीतून ओसंडे जे प्रेम
मनामनातून स्रवते ते...
भांबावल्या भोळ्या, भक्तां तू आधार
बोलती ऐसे जन विश्वामाजी...
विश्वास हा माझा असे दृढ तेथे
प्रचीती तयाची क्षणोक्षणी...
बुद्धी माझी होई जव म्लान तव
तुझे रूप देवा स्वप्नी येई...
रूप ते पाहता होई ओले मन
आनंद दाटतो अंतरंगी...
नाही मला माळ नाही मला टाळ
नाही टिळा माझ्या कपाळासी...
भावनांची माळ, भक्तिचा तो टिळा
शब्द मात्र तथे फुलावले...
भावांची ती फुले करी घेऊनीया
बांधियेली पूजा शब्दांची मी...
भक्तीभावनांची करूनिया वीणा
चिंतनात दंग
तुझिया मी...
( ही कविता माझी नाही. माझे आदरणीय वडील, कै. रा. वा. गुणे यांच्या हस्तलिखित संग्रहाचे दोन वर्षांपूर्वी खाजगी वितरणासाठी कौटुंबिक पातळीवर प्रकाशन झाले. त्यातील ही पहिलीच कविता... मला भावलेली, आणि, विठ्ठलभक्तांच्या चिंतनासाठी द्यावीशी वाटलेली...- सौ. सुबोधिनी वाटवे.)