भाव चिंतन -२

तहानलेलं पाणी

एकदा पाण्यालाच तहान लागली
सोबत भूकही बोट धरून आली...

आकाशातले काळेकुट्ट ढगही धावत धावत आले...
रोज शीतल वाहणारा वारा म्हणाला,
मीच का मागे राहू?
... आणि तिघांचे जमले मेतकूट...

‘आज दाखवूच आपला भीषण पराक्रम,
जिभा सैल सोडलेल्या, क्षुद्र, मर्त्य मानवाला'...

लगेच सुटले सुसाट
आकाशातले प्रचंड हत्ती
आपल्या काळ्याकुट्ट सोंडेतून
ओतू लागले पाण्याचे घोंघावते डोह...

वाऱ्याच्या झोतांनी अवाक होत
झाडे धरणीवर विसावली, आणि धरणी जमीन विसरली...

पाण्याने जमिनीचा कब्जा केला
पृथ्वीच्या आसऱ्यानं उभी राहिलेली घरं
पाण्यानंच पिऊन टाकली, अन
बापुडवाणी होऊन घरपण विसरली...

घर नावाची एक वस्तू,
आठवणींच्या कपाटात जाऊन बसली.

- रा. वा. गुणे

(दोन वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या निमित्ताने, सुमारे २० वर्षांपूर्वीची ही कविता आज पुन्हा जिवंत झाली.- सुबोधिनी.)