एका चैत्राच्या दुपारी

चैत्राच्या दुपारी
अंगणात
वाळवण घालून बसलोय
तुळशीला टेकून
जास्वंदीच्या सावलीत
हातात
काठी घेऊन बसलोय
चोच मारायला टपलेल्या
कावळ्यांना हाकलायला बसलोय

चैत्राच्या दुपारी
अंगणात वाळवण घालून बसलोय
चैत्राच्या दुपारी
अंगणात वाळवण घालून बसलोय

आमराईतून कैरी अन मोहराचा
घमघमाट हेलावतोय
गुलमोहराला केशरी उधाण आलंय
वारा उधळून टाकतोय वाळवण
म्हणून तर
बसलोय चैत्राच्या दुपारी
अंगणात वाळवण घालून

कुरडया, सांडगे, पापड...
सोबत कडू गोड
आठवणी वाळत घातल्यात

अजून ओल्याच आहेत
इतके उन्हाळे तापले तरी
अजून बाहेर येतात
किती झाकून ठेवले तरी

कधीकाळी उंबरठ्यावर लागलेली ठेच
अजूनही जीव कळवळतो
कधी काळचा मायेचा स्पर्श
अजूनही सुरकुतलेला नसतो
आज वाळल्या स्मृतींसाठी
दुसरा डबा शोधावा
घट्ट झाकणाचा
आणि वर मणभर वजन ठेवावं
पाटा वरवंटा असं काही
(नाहीतरी तेही कोनाड्यातच आहेत)

कुंपणापाशी स्वप्नं वाळताहेत
इवलाली कुरडयांसारखी
कढईत घातली तर
फ़ुलून आकाश होतील
पण चटके नको होते ना...
वाळून कोळ झालीत
रंग उडालाय
किंचित धुगधुगी असेल नसेल
थोडी बुरशी, काजळी, वास...
काही टिकावू
काही टाकावू
पण हात धजावत नाहीत
(वाळल्या कडधान्याला मोड येतात ना
आशा वाटते रे...)

उन्हं कलतात
संध्याकाळ जवळ येतेय
आता आवराआवर करावी
चार सांडगे
कावळ्यांसाठी ठेवून जावे
दोन चार आठवणी चिमण्यांसाठी
आणि उरली सुरली स्वप्नं...

आता उठावं
निघावं रात्रीच्या भॆटीला
रात्रीच्या भॆटीला निघावं आता.