असे असावे जगणे माझे
अळवावरचे जरी हे पाणी
झगझगीत अन लख्ख असावे
चांदीसारखा वर्ख असावा
सदा स्फ़ुर्तीने बागडणारे
सळसळते चैतन्य असावे.
अळवाचा तो देठ जसा की
कोमल असुनी ताठ असावे
ओतप्रोत रसरशीत असावे
चिखली राहुन स्वच्छ रहावे
जीवन शक्ती माझ्यामधली
पाऊस पडता जोम धरावी
तरारून जमिनीवर यावी
अळवाचे ते पान जसे की
जमिनीलगत पण भव्य असावे
नजर असावी आकाशावर
देठ जमिनीशी घट्ट जडावे
"वृक्ष बनावे" नाही इच्छा
परंतु कधीही रुक्ष नसावे
अळवावरचा थेंब जसा की
निसटुन जातो कधी अचानक
असेच सहजी मरण असावे
एकच इच्छा अळवा जैसे
ऋषींच्या भाजीत स्थान असावे