मराठी गेले उडत!

माफ करा बर का लोक हो. मला मराठी भाषा किंवा मराठी लोक ह्यांची हेटाळणी करायची नसून, अनेक मराठी लोक एअर इंडियाच्या नव्या विमानांच्या संबंधात कार्यरत कसे होते त्याची ई सकाळ मधील बातमी वाचून ती तुम्हाला सांगावीशी वाटली. सर्वांना वाचता यावी आणि विचारांची देवाणघेवाण करणे सुलभ जावे ह्यासाठी ती मी येथे उतरवून ठेवत आहे.

ईसकाळातली मूळ बातमी :

मराठी हातांवर तरले बोईंग!

पद्मभूषण देशपांडे/सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ - भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात होत असलेली क्रांती मराठी हातांनी होत आहे.
या हवाई क्रांतीचा निर्णय घेण्यापासून बोईंगची अत्याधुनिक विमाने वेळेवर भारताला पुरविण्यापर्यंत आणि ती बोईंगच्या कारखान्यातून भारतात आणण्यात "मराठी हात' गुंतले आहेत. महाराष्ट्रासाठी ही निश्‍चितच अभिमानाची गोष्ट आहे.

गेल्या दहा वर्षांपासून उत्तरोत्तर रया गेलेल्या भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला नवसंजीवनी देणारे हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल हे गोंदियाचे आणि "बोईंग'ला सुवर्णकाळात पोहोचविणारे दिनेश केसकर अमरावतीचे.

भारत-अमेरिका या विनाथांबा विमानसेवेसाठी असलेल्या पहिल्या विमानाचे सारथ्य करणारे सायरस एडेकर हे मराठीच आणि त्यांना दिशादिग्दर्शन करणारे विंग कमांडर बाबासाहेब जाधव तर खुद्द कराडचे! बोईंगच्या सीएटल येथील कारखान्यातून दुसरे विमान घेऊन येण्याचा मान मिळाला नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील परित्याग रुपवते या पायलटला.

पहिल्या उड्डाणाच्या विशेष पाहुण्यांची सरबराई करण्याची जबाबदारी देवरुखच्या नंदकुमार हेगिष्टे यांच्याकडे होती. त्यांना साह्य करण्यासाठी पैठणच्या भूषण पैठणकरची, पुण्याच्या संदीप उडुपाची, गोव्याच्या विनोद मडकईकरांची आणि सोलापूरच्या स्वप्ना लिंगरकरची निवड करण्यात आली होती. डॉ. श्रीमती नाखवा या पहिल्याच उड्डाणात वैमानिकांची काळजी घेण्यासाठी सज्ज होत्या, तर बी. पी. येलवे हे अभियंते पहिल्या उड्डाणाची तांत्रिक काळजी घेण्यासाठी तेथे होते. बोईंगच्या सीएटल येथील कारखान्यात सुमारे ६५ हजार अधिकारी आणि कर्मचारी असून, त्यातील ४०० ते ४५० मराठी आहेत!

सुमारे १५ तासांच्या या विमानप्रवासात प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. जुने आणि नवे मराठी चित्रपट, शास्त्रीय संगीत, मराठी भक्तीसंगीत, भावगीते आदी गोष्टीही तेथे उपलब्ध आहेत. पहिल्याच उड्डाणात सहभागी झालेल्या केसकरांनी "मुन्नाभाई एसएससी' हा चित्रपट पाहिला, तर अनेकांनी पंडित जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी यांच्या गायनाचा आणि "ध्यासपर्व', "उत्तरायण' आदी चित्रपटांचा आस्वाद घेतला.