आव्हान

आयुष्यात काही वेळा आव्हाने पुढे उभी रहातात. अश्याच एका आव्हानाची कथा:

"हे ड्रॉइंग घ्या आणि काम सुरु करा. प्रायोगिक तत्त्वावर हे स्ट्रक्चर (सांगाडा) बनवुन पाठवायचे आहे. कामाचा अंदाज घेउन मला पुर्णत्वाची तारीख सांगा, जी २ महीन्याच्या आतील असली पाहीजे, काय ?" वरीष्ठ साहेब .

"ड्रॉइंग अभ्यासून तुम्हाला एका तासात कळवतो" असे म्हणून केबीन बाहेर पडलो. ज्याअर्थी वरीष्ठ साहेबांनी स्वतः बोलावून मला २ महीन्याची मुदत दिली त्याअर्थी काम जरा हातघाईवर आले आहे ह्याची कल्पना केबीनमधे जायच्या आधीच आली होती.

ड्रॉइंग चा अभ्यास करुन साहेबाना अंदाजे तारीख कळवली व या कामास प्राधान्य देउन सुरुवात केली. काम करताना काही डिझाइन मधे शंका विचारण्यासाठी डिझाइन अभियंत्या कडे जावे लागत असे. सर्व मटेरियल मागवुन  फ़ेब्रीकेशनच्या कामास सुरुवात झाली. काम भरपुर असल्याने ज्या सप्लायर कडे काम चालू होते तिथे २ शिफ़्ट मधे काम चालु ठेवले. आठवड्याची सुट्टी न घेता सलग काम चालु होते. (१०-१२ वर्षापुर्वी लोड-शेडींग चे एवढे नाटक नव्हते).

दुसऱ्या महीन्यात युरोपमधील एक साहेब आमच्या कामावर देखरेख करण्यासाठी येणार असे कळाले. त्याच्या यादीत आमचे स्ट्रक्चरचे काम होते. त्याचे समोर काम पुर्ण करण्यासाठी साहेबांनी आमच्यावर प्रचंड दबाव आणला.त्याने संपुर्ण आढावा घेवुन काम व्यवस्थित चालु असल्याचा निर्वाळा साहेबांना दिला व हे काम घाई न करता व्यवस्थित पुर्ण करण्याचा आदेश दिला. आता हा गोरा साहेब ,याला आमचा व.साहेब काही अडवु शकत नव्हता पण त्याना स्ट्रक्चर पाठवायची घाई होती.

इकडे काम पुर्ण करुन स्ट्रक्चर कारखान्यात आणण्यात आले. आता रंगकाम आणि शेवटची तपासणी झाली की हुश्श्य !!. दुसऱ्या दिवशी सकाळी गोरा साहेब माझ्या टेबलपाशी येउन मला म्हणाला, "हे स्ट्रक्चर माझी पुढची सुचना मिळेस्तोवर डिस्पॅच करायचे नाही" असा आदेश देउन तो निघून गेला. तसा बोर्ड ही त्याने स्वतः स्ट्रक्चरवर लावून ठेवला. हा निरोप ताबडतोब साहेबांना स्वतः फ़ोनवर देउन मी दुसऱ्या कामाला लागलो.

महीन्याची शेवटची तारीख, संध्याकाळी व.साहेबांचा नेहमीप्रमाणे किती डिस्पॅच झाले त्यासाठी फ़ोन. त्यात स्ट्रक्चर तयार असून न गेल्याने त्यांचा पारा वर !! मला काही न बोलू देता त्यांनी झापडमपट्टी चालु ठेवली. त्यांना गोऱ्या साहेबाचा निरोप दिल्याची आठवण देउन सुद्धा ते बडबडत राहीले. आणि त्यानी डिस्पॅचची ऑर्डर दिली. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था. गोऱ्या साहेबाला फ़ोनवर कल्पना देताच पठ्ठ्या संध्याकाळी हॉटेल वरुन माझ्यासमोर हजर. "गेलेच तर हे स्ट्र्क्चर माझ्या डेड बॉडी वरुन जाइल". एव्हाना त्याचे बरोबर काम करून वैयक्तिक ओळख झाल्याने मी त्याला चहा प्यायला घेउन् गेलो आणि काय भानग़ड आहे ते विचारले. तर या डिझाइनच्या काही फ़्रेम्स चे फ़ेल्युअर रिपोर्ट आले असल्याने डिझाइन रिव्ह्यू होइस्तर पाठवायचे नव्हते. त्याच दिवशी डिझाइन सदोष आहे असा निरोप मिळाल्याने तो अस्वस्थ होताच. हे स्ट्रक्चर वापरणे सुरक्षित आहे असा रिपोर्ट येइस्तर त्याने डिस्पॅचला मनाइ केली होती.

साहेबांनी स्ट्रक्चर डिस्पॅच न झाल्यास तुझी नोकरी जाइल असे बजावले. त्यावेळी गोऱ्या साहेबाने आमच्या व.साहेबाना सांगून एक महीना थांबवले. पुन्हा पुढच्या महीन्यात शेवटच्या दिवशी तोच प्रसंग, तीच धमकी. यावेळी तुला नविन नोकरी शोधावी लागेल अशी पुस्ती जोडायला ते कचरले नाहीत.

तिसऱ्या महीन्यातही स्ट्रक्चर संबधी निर्णय येणे बाकी होते. शेवटच्या दिवशी साहेबांनी संध्याकाळी डिस्पॅचचा आढावा घेण्याचा फ़ोन केला. अजुनही स्ट्रक्चर जाउ शकत नाही असे कळल्यावर ते म्हणाले, "आता तुला आणि मला दोघांनाही नवीन नोकरी शोधावी लागणार आहे".

मी धीर एकवटून उत्तरलो "साहेब, तुम्ही शोधा हवे तर"

"म्हणजे, तुला काय म्हणायचे आहे ?" साहेब

"साहेब माझा राजीनामा मी लगेचच्या साहेबाला (इमिजियेट बॉस) मागील आठवड्यात सुपुर्द केला आहे. तो तुमच्या पर्यंत पोचलेला दिसत नाही, मला नवीन नोकरी मिळाली आहे"

टेलीफ़ोनवर एक क्षण सुन्नता पसरली. "लगेच केबीन मधे ये".

नंतर व‌. साहेबांचा सुर किती नम्र झाला हे सांगणे नकोच. माझ्या हातातल्या ड्रॉइंग प्रमाणे काम वेळेत पुर्ण केले आहे. आता पुढचा निर्णय डिझाइन विभागाचा आहे. त्यांना विचारा.दिवसरात्र मेहनत करुन वर तुमच्या हाकलुन द्यायच्या गप्पा ऐकणे शक्य नाही असे ठामपणे सांगुन टाकले.

शेवटच्या दिवशी त्यानी मला "इथे काय सुधारणा व्हावी" असे विचारले. "साहेब , आपल्या कनीष्ठ अभियंत्यावर नुसता दबाव टाकून उपयोग नाही, वेळप्रसंगी तुम्ही त्यांच्यामागे ठाम उभे राहीले पाहीजे."

पुढे ते स्ट्रक्चर स्क्रॅप करण्यात आल्याचे कळले.

विनम्र