लग्नाआधी.....नन्तर...दुसरी बाजू...

लग्नाआधी रूप वेगळे,
नंतर दिसती रंग वेगळे...

आधी... लांब रेशमी केस मोकळे

जीव सखे मम ज्यात गुंतला।

नंतर...सखी म्हणे हा त्रास फार मज

करून येते बॉब कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देई

तुझ्या अंगीचा गंध आगळा

नंतर... सेंट प्रियकरासाठीच होते

नवरा मासा लावण्या गळा।

आधी...तू बोलावे, मी ऐकावे,

अंगावरुनी पीस फिरावे।

नंतर...तू बोलावे, तू बोलावे

तू बोलावे, तू बोलावे।

आधी...साखरेविनाही चहास गोडी

तुझ्या हातची अन्‌ अधरांची

नंतर...अगोड चहाही परवडला पण

मिठास यावी कैसी गोडी?।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,

तारुण्य तुझे घे नजर खेचुनी।

नंतर...असे बाळसे तू धरले की

कपडे सारे गेले उसवुनी।

आधी...कोमल, हळवी प्रिया तू सुंदर

फुलासारखी जपण्याजोगी।

नंतर...किती जिवाचे कौतुक केलेस

एक असूनही भासे दोघी।

आधी...दमला असशील, थकला असशील

सख्या, पाय मी चुरुनी देते।

नंतर...पुरेत नखरे, स्वप्ने आवर

अस्तन्या दुमड, झाडलोट कर।

आधी...गृहिणी, सचिव मी, सखी एकांती

राजा माझा तूच खरोखर।

नंतर...सम्राज्ञी मी माझ्या घरची

गुलाम तू तर, माझा नोकर।