प्रेम लाभे प्रेमळाला : मानसशास्त्रज्ञ सांगताहेत!

पूर्वी एक कविता वाचली होती "प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी"

आता नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या आणि एमआयटीच्या सामाजिक मानसाशास्त्रज्ञांनी नेमके हेच सांगितले आहे असे वाटते. ते म्हणतात. सगळ्यांवर सारखेच प्रेम करण्याने, सर्वजण सारखेच आवडण्याने इतरांना आपण आवडू असे वाटणे तितकेसे बरोबर नाही. नेमक्या एका व्यक्तीविषयीच इतरांहून जास्त ओढ वाटण्याने त्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल तशी ओढ वाटण्याची संभाव्यता अधिक आहे.

म्हणजे प्रेम लाभे प्रेमळाला हेही बरोबर आणि (इतर आवडत्या व्यक्तींचा?) त्याग ही त्याची कसोटी हे ही बरोबर असेच असावे नाही का?

मी हे सगळे सायन्स ब्लॉगच्या ह्या पानावर वाचले.

अभ्यासकांचे म्हणणे असे की असे सगळे का आणि कसे होते हे एक गूढच आहे. विवाहोत्सुक युवक युवतींच्या मेळाव्याचा अभ्यास आणि प्रयोग करताना हे लक्षात आलेले आहे. अशा गतिमान वधुवर संमेलनात केवळ चार मिनिटांत आपण समोरच्या/ची ला कितपत पसंत आहो हे तर कळतेच पण त्याहीपलीकडे जाऊन आपण समोरच्या/ची ला इतरांहून कितपत जास्त पसंत आहो हे ही कळते! हे सगळेच थक्क करणारे आहे.

ह्याचा अभ्यास करण्यासाठी ह्या मंडळींनी असे सात संमेलनाचे कार्यक्रम आखून इच्छुक वधुवरांकडून मागाहून उत्तरे मागवून, पुढील भेटीची इच्छा विचारून परस्परांना 'होकार' असलेल्या वधुवरांना एकमेकांशी संपर्क साधता येऊ दिला. त्यात ज्यांना सगळेच  आवडतात त्यांना मैत्रीत यश येत असले तरी प्रेमसंबंधांत वैफल्य पदरात पडायची शक्यता जास्त वाटली.

आपण इतरांहून वेगळे आणि विशेष आहो असे वाटण्याच्या गरजेतून अशा होकाराची प्रेरणा होत असावी, त्यामुळे आपण इतरांइतकेच आवडतो असे जेथे वाटेल तिथे प्रतिसाद नकारात्मक द्यावासा वाटत असावा.

हे सगळे वाचून 'प्रेम व्यक्त करणे हा प्रेम प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे' असे मला वाटायला लागले आहे  

तुम्ही काय म्हणता?

(आणखी काही युक्त्या मिळतात का ते पाहायला नॉर्थवेस्टर्नचे हे स्थळ जाऊन पाहिले; पण हा शोधनिबंध विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे दिसल्याने वाचता आला नाही.)