सायकल चोर आणि उडती कासवे

मला चित्रपट बघण्याची हौस म्हणजे जबरदस्त. दर आठवड्या-पंधरवड्याला एक या दराने माझं चित्रपट बघणं व्हायचं. पुढे चित्रपटगृहांचे दर वाढले आणि आमचा हा दरही कमी झाला. अनेक पडद्यांवर अनेक चित्रपट एकावेळी दाखवून अनेकांकडून अनेकपटींनी जास्त पैसे घेण्याची शक्कल (की अक्कल?) चित्रपटगृहाच्या मालकांकडे आली आणि आमचा वेग मंदावला.
तसंही आतापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांच्यापलीकडे चित्रपट बघण्याचा योग क्वचितच! (नाही म्हणायला "रोजा" एकदा व्हिडियो कोच बस मध्ये तमिळमधून--तमिळच होतं ना हो ते?-- पहिला होता. पण त्याआधी तो हिंदीतून पाहिला असल्याने कळला). पण आता इथे न्यूयॉर्कमध्ये आलो आणि पहिलं काम लायब्ररी शोधण्याचं केलं. एन.वाय.पी.एल. (न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी) मध्ये गेलो. आणि तेथील ग्रंथसंपदा आणि विडियोंचा संग्रह बघून खात्री पटली आता फावल्या वेळेत काय हा प्रश्नच पडणं शक्यच नाही. वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं (अगदी मराठीसुद्धा), चित्रपट यांचा खजिनाच. आणि मुख्य म्हणजे हे सारं फुकट (हे खरं विशेष  !!). सुरवातीला माझे राहिलेले अनेक इंग्रजी चित्रपट पाहून घेतले. "सिंडरेला मॅन", "आइस एज", "मॅट्रिक्स३" इ. परवा लायब्ररीत गेलो तर कोणतीच खास डीव्हीडी दिसेना, तेव्हा सहज म्हणून (खरंतर काही हिंदी दिसतंय का) बघायला परभाषिक विभागात गेलो. तिथे इटालियन, फ्रेंच, चायनीज, जॅपनीज, कुर्दी, रशियन, जर्मन अश्या विविध भाषांमधील चित्रपटांचा खजिनाच होता. मी बघूया पाहून असा विचार केला, आणि, 'अवॉर्ड विनिंग' विभागातील एक इटालियन आणि एक कुर्दी अश्या दोन डीव्हीडी उचलल्या. त्या पाहिल्या आणि जाणवलं की आतापर्यंत मी एका छान दुनियेला मुकलो होतो.

इटालियन चित्रपटाचं नाव होतं "ladri di biciclette", "द बायसिकल थीफ"- १९४८ मध्ये प्रकाशित झालेला एक मनस्वी कृष्णधवल चित्रपट! चित्रपटाला पार्श्वभुमी आहे ती महायुद्धाची. रोममध्येही परिस्थिती इतर जगाप्रमाणे बिकटच होती. चित्रपटाला सुरवात शासकीय रोजगार मंडळापासून होते (एंप्लॉयमेंट एजन्सी) . ह्या मंडळाकडे एका रिक्त जागेसाठी एका माणसाची गरज आहे असं पत्र आलं असतं. ही जागा पोस्टर चिकटवणाऱ्यासाठी असते. ऍंटोनिओ रिची (Ricci) ह्याची मंडळा कडून शिफारस होते. अट एकच असते, त्या व्यक्तीकडे स्वतःची सायकल असणं! रिचीचा नोकरी मिळाल्याच्या आनंद निघून जातो नी सायकल मिळवायची कशी ह्या विचारांनी तो हैराण होतो. त्याची बायको शक्कल लढवते आणि घरातील सगळे, पडदे, चादरी इ.सामान विकून एकदाची नवी कोरी सायकल घरात येते. ती सायकल घरात येते आणि घरी एक उत्साहाचं वातावरण पसरतं. ऍन्टोनिओचा ७-८ वर्षांचा मुलगा तर फारच खूश असतो. कारण उद्या त्याला 'कामावर' सायकल ने जायला मिळणार असतं (तो शाळेत जातो की नाही हे मात्र कळलं नाही). बाप आणि त्याचा मुलगा एकदम टेचात तयार होतात. (मुलगा एकदम ऐटीत मफलर वगैरे अडकवून तय्यार होतो. एकदम गोड पोरगा घेतला आहे) ऍंन्टोनिओ मुलाला सोडून पुढे कामाला लागतो. पोस्टर लावण्याचं काम चालू करतो.

अरेरे! पण ते काम चालू असताना त्याच्या डोळ्यादेखत एक चोर त्याची सायकल घेऊन पळून जातो. पुढे हा बाप आणि त्याचा मुलगा याने सायकलशोधासाठी केलेली वणवण म्हणजे 'दि बायसिकल थीफ' हा चित्रपट. या चित्रपटात एका वेगळ्याच रोमचं दर्शन घडतं. रोम म्हटलं की कसं पुरातन वास्तू, ऍम्फिबियम इ. डोळ्या समोर येतं, पण ह्या चित्रपटात रोमच्या युद्धकाळातील स्थानिक वस्तीचं चित्रण येतं. रोममधील चाळी सदृश घरं, तेथील बायकांची नळावर लागलेली रांग (तिथेही?!!!?), त्यांच्यातील भांडण इथपासून ते रोमचा चोर बाजार, तिथे घरातल्या वस्तू विकण्यासाठी लागलेल्या मोठ्या मोठ्या रांगा, रिकामी क्रीडांगणं आणि कामं करणारी मुलं, नोकऱ्यांसाठी वणवण फिरणारे नवरे, त्यांच्या कसंबसं घर चालवणाऱ्या बायका, ऍंन्टोनिओच्या बायकोचं एका भविष्य सांगणाऱ्या बाईवर श्रद्धा असणं, पुढे सायकल चोरिला गेल्यावर त्याचं स्वतःचंही त्याच बाई कडे जाण अश्या बऱ्याच गोष्टी युद्धकाळाच्या समाजावरच्या परिणामांना अधोरेखित करतात. पण या सगळ्याच्या वर बाप आणि मुलाचं नातं फारच मनस्वीपणे टिपलं आहे. मुलाचा आत्मसन्मान जपण्यासाठी धडपडणारा बाप, त्याच्यावर चिडणारा बाप, त्याच्यावर संकट आलं आहे ह्या भीतीने वेडापिसा होणारा बाप, मुलाला जपणारा बाप, मुलाला हॉटेलमध्ये हवं ते न देऊ शकणारा हतबुद्ध बाप अश्या अनेक छटा त्याने फारच सुरेख चितारल्या आहेत. ह्या चित्रपटाचा वास्तवदर्शी शेवट म्हणजे तर कळसच (अर्थात तुम्हीच चित्रपट पाहावा म्हणून इथे शेवट सांगणार नाही आहे.)

                                                                            

दुसरा कुर्दी चित्रपट म्हणजे अलीकडच्या काळातला. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला "Lakposhtha hâm parvaz mikonand" म्हणजे "टर्टल्स कॅन फ्लाय". हा ही युद्धग्रस्त समाजावरच आहे. पण यात केंद्रस्थानी आहेत मुलं आणि युद्ध आहे अमेरिका-इराक युद्ध. सद्दामच्या पाडावानंतर इराकच्या भूमीवर चित्रित झालेला पहिला चित्रपट! कोणत्याही युद्धात सर्वात जास्त भरडली जातात ती म्हणजे त्या देशातील मुलं, हे सत्य अधोरेखीत करणारा चित्रपट.हा चित्रपट युद्धावर थेट भाष्य करत नाही तरीही बरंच काही सांगून जातो. सोरान हा १३ वर्षाचा मुलगा चित्रपटाचा हिरो. तो इराक-टर्की बॉर्डर वरच्या गावचा लीडर असतो. इतक्याशा मुलाचं साऱ्या गावाने ऐकण्याचं कारण म्हणजे त्याचं "अँटेना" बसवायचं ज्ञान असतं. सद्दामच्या बातम्यांसाठी अँटेना सगळ्यात गरजेचा. आणि सोरानला तर काही इंग्रजी शब्द पण माहीत असतात. शिवाय त्या गावातला सुरुंग काढणारा प्रत्येक मुलगा त्याच्या शिवाय कोणाचाही हुकूम मानत नसतं ( अमेरिकेने इंचाइंचावर पेरलेल्या सुरुंगामुळे शेती करणं अशक्य होतं, त्यासाठी सुरुंग निकामी करायचं धोकादायक काम करायला गावातली मुलं उरतात शिवाय मुलांना मिळणारे पैसे त्यांच्यामनाने मजबूत असतात). सोरानच्या टोळी मध्ये खरंतर गावातील प्रत्येक मूल असतं. त्याची टोळी पाहिल्यावर लक्षात येतं की त्यातील ७०% मुलांना एकतर एक हात नाहीतर एक तरी पाय नाही आहे. काही जण दोन्ही हात/पाय गमावलेले आहेत. (त्यामुळेच त्याच्या टोळीतील मुलांना इतर गावांतूनही मागणी असते कारण त्याची टोळी सगळ्यात निर्भीड (!!?!!!) असते. )

सोरानचं असं व्यवस्थित चालू असताना गावातील आश्रय घेणाऱ्यांमध्ये एक मुलगी, तिचा दोन्ही हात नसलेला भाऊ आणि पाठुंगळीवर असलेलं छोटं मूल प्रवेश करतं आणि त्याची दुनिया बदलू लागते. तिच्या भावाला भविष्य दिसणं, तिच्या आणि भावातील लहान मुलावरून होणारे वाद, सोरानचा अपघात इ. हृदय पिळवटणाऱ्या घटना घडतात. एक कटु सत्य कोणतीही लेक्चरबाजी न करता हा चित्रपट ऐकवतो. शस्त्रांचा बाजार, रिकामी शाळा, विमनस्क मास्तर, धर्माचा पगडा सांभाळत वावरणारी जनता अश्या अनेक गोष्टी समोर येतात आणि आपल्याला सुन्न करून ठेवतात. पुढे काय होतं? भविष्य दिसणाऱ्या मुलाच्या मदतीने सोरान गावाला वाचवू शकतो का? गावत युद्ध होतं का?, ती मुलगी लहान बाळाचं काय करते? सोरानच पुढे काय होतं? नवीन इराक कसा बदलू लागतो अश्या अनेक चित्तवेधक घडामोडींसाठी हा चित्रपट स्वतःच बघा

का कोण जाणे पण हे चित्रपट पाहून "आय फॉर ऍन आय विल मेक वर्ल्ड ब्लाईंड" हे महात्मा गांधींचं वाक्य उगाचच मनात डोकावत होतं.
मला तरी हे चित्रपट फार भावले. म्हणून ही धावती ओळख. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर दोन्ही चित्रपट पाहाच ही शिफारस!