शब्द माझा मंतरू दे दुःखितांसाठी...!

...................................................
शब्द माझा मंतरू दे दुःखितांसाठी...!
...................................................

जन्म हा माझा सरू दे दुःखितांसाठी !
रोज थोडा मी मरू दे दुःखितांसाठी !!

वंचितांच्या वेदना वाटून घेऊ दे
दुःख माझ्याही जरा वाट्यास येऊ दे
हे मला इतके करू दे दुःखितांसाठी !

काय कामाचे दिलासे कोरडे माझे ?
हे उमाळे अन् उसासे कोरडे माझे...
आसवे माझी झरू दे दुःखितांसाठी !

आटली ज्यांची उभारी; धीर मी त्यांचा
जीव जे सारे मुके; शाहीर मी त्यांचा
मी नवी आशा ठरू दे दुःखितांसाठी !

मी दिवा त्यांचा; तमाने घेरले ज्यांना
लोक ते माझे; कुणी अव्हेरले ज्यांना
प्राण माझे अंथरू दे दुःखितांसाठी !

का कवी नुसताच होऊ व्यर्थ शब्दांचा ?
जाणतो आधी स्वतः मी अर्थ शब्दांचा
शब्द माझा मंतरू दे दुःखितांसाठी !

(रचनाकाल ः १२ नोव्हेंबर २००५)

- प्रदीप कुलकर्णी