डोळ्यांत लाल गायींचा
एक कळप आहे चरत.
पापणीत उतरताना एक बगळा
पंख फडफडवतो परत परत.
सिग्नलस् गातात अंगाई
ओळन ओळ पुन्हा चघळत.
वर्दळलेली गर्दी निवांत
झोपून असते कूस बदलत.
ऍरो,बोस,टीचर्स,मर्क
मेंदूत आहेत हीच गाणी.
चकचकीत भाज्या, सफरचंदे
गेला कुठे तो गणपत वाणी?
सपाट पृथ्वी, चौकोनी मन
- आदिवासी भलतेच हुषार.
तेही शिकतात ताबडतोब
-झाला मेकप की नाच तयार.
उलटा लटकतो डोक्यातून
पाठीवर वेताळ...पांढराफटक.
कानामध्ये पिठाची चक्की
दळण दळते - चटकफटक.
ऐक... वेताळाची बेताल कथा
"प्लीज, एंटर युअर टी-पिन नंबर".
गूढ कोडे अन् नाही उत्तर?
तुझेच पाय आणि शकले शंभर.
डोळ्यांत लाल गायींचा कळप
दमून जातो चरून-चरून.
पापणीत उतरणारा तो बगळा
पंख फडफडवत पडतो मरून.