हिरव्या मिरच्यांची भाजी

  • हिरव्या मिरच्या (लवंगी नव्हेत) - दीड सेमीचे अर्धी वाटी तुकडे
  • एक (स्वयंपाकघरातील; नारळाची नव्हे) वाटी खोवलेले खोबरे
  • अर्धी वाटी दाण्याचे कूट
  • एक चमचा तूप
  • जिरे, मीठ
३० मिनिटे
तोंडीलावणे

हिरव्या मिरच्या धुऊन त्यांचे दीड सेंटिमीटरचे तुकडे कापून घ्यावेत. लांब मिरच्या असल्या तर हे कात्रीने झकास होते.

तूप कढईत तापवून जिऱ्याची फोडणी करावी. त्यात लगेच कातरलेल्या मिरच्या टाकाव्यात (ठसका सांभाळावा) व ज्योत बारीक करावी. त्यात खोवलेले खोबरे घालून चांगले एकजीव करावे व खोबऱ्या-मिरच्यांच्या ओलाव्यावर पाच-दहा मिनिटे शिजू द्यावे. खाली लागते आहे असे वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. मिरच्यांवर जळकटल्याचे काळसर डाग पडायला नकोत.

मग दाण्याचे कूट आणि मीठ घालून एकजीव करावे. दोन मिनिटे हालवून ज्योत बंद करावी.

(१) ही मिरच्यांची 'चटणी' नसून भाजी का? तर तुपावर शिजवल्याने (आणि बरोबरच्या भारंभार खोबऱ्या-दाण्याने) मिरचीचा तिखटपणा चांगलाच ओसरतो, आणि हे जरा सढळ हाताने वाढले तरी खपते. 'तिऱ्हाईता'वर "कित्ती बाई तिखट खातो" असा भाव मारायचा असेल तर ते पोटाला न बिथरवता साध्य करण्यासाठी  उत्तर प्रकार.

(२) साबुदाण्याच्या खिचडीवर हे मिश्रण दोन चमचे आणि सायीचे दही....

(३) भिजवलेल्या साबुदाण्यात हे मिश्रण सैल हाताने घालून चांगले मळावे. मग प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याचा हात लावून त्याचे तुकडे थापावेत आणि तुपावर परतावेत. सोबत चटणीची गरज नाही.

स्वप्रयोग