न चिकटणारा चघळगोंद

सिंगापुराबद्दल अलीकडेच माहिती मी मनोगतावर वाचली. ती वाचून सिंगापुरात चघळगोंदावर बंदी आहे असे कोणीतरी सांगितल्याचे आठवले. (मात्र तिथेही निकोटीन युक्त चघळगोंदावरची बंदी अलीकडेच उठवल्याचे येथे वाचले.)

चघळून थुंकलेला चघळगोंद रस्त्यावर चिकटतो आणि तो काढून टाकणे स्वच्छता कामगारांना अशक्यप्राय होते हे ह्या बंदीमागे कारण असावे, असा माझा अंदाज झाला होता. माझा अंदाज खरा असल्याचे मला टेलिग्राफच्या ह्या पानावरचा लेख वाचून समजले.

चघळगोंदाची उलाढाल दरवर्षी ३०० द.ल पौंड होते तर १५० द. ल. पौंड खर्च चिकटलेला चघळगोंद काढण्यास येतो! रसायनांची फवारणी, लांब दांड्याचे खरडझाडू, गोंद गोठवून तो ठिसूळ करणारी रसायने, उच्चदाबाने ऊष्ण पाण्याचा झोत ह्या सर्वांमुळे रस्त्याची नासधूस होण्याची शक्यता असते. जवळजवळ ९४००० ठिकाणी थुंकलेला चघळगोंद सापडला! लंडनमधील आकडेवारीप्रमाणे दर चौरस मीटरला २० चघळगोंद सापडतात. (चू. भू. द्या. घ्या.) चघळगोंदाच्या पाकिटावर त्याची विल्हेवाट कशी लावावी त्याचा संदेश छापला जावा अशीही मागणी आहे.

हे सगळे पाहिल्यावर 'माणूस चंद्रावर जातो आणि मंगळावर जाण्याच्या गप्पा करतो तर त्याला न चिकटणारा चघळगोंद निर्माण नकीच करता आला असता!' असे म्हटले गेले होते. ह्या पेचप्रसंगाचे महत्त्व इतके आहे की आयरिश पर्यावरण मंत्रालयाने जुलैमध्ये अशा प्रकारचा चघळगोंद निर्माण करण्याची स्पर्धा आयर्लंडच्या विद्यापीठांसाठी जाहीर करून विजेत्याला १ द. ल. युरो इतके पारितोषिक ठेवलेले आहे!

Professor Terence Cosgrove holding a piece of non-stick chewing<br />
gumमात्र अलीकडेच रिव्हॉलिमर नावाच्या ब्रिस्टॉल विद्यापीठातून वेगळ्या झालेल्या एका कंपनीने न चिकटणारा चघळगोंद विकसित केलेला आहे! तो पाण्यात विरघळतो. त्याभोवती पाण्याचे कवच सतत राहात असल्याने तो साध्या पाण्याने काढून टाकण्यास सोपा आहे. डोळे झाकून पदार्थांची परीक्षा करताना तोंडातला स्पर्श, चव, ह्याबाबतीत तो वरचढ असल्याचे दिसलेले आहे. शिवाय तोंडाची जळजळ वगैरे दुष्परिणाम दिसलेले नाहीत. बूट चपला, रस्ते, कपडे, केस इत्यादींपासून तो काढून टाकण्याचीही पडताळणी केलेली आहे. हा चघळगोंद विकसित करताना निर्मात्याच्या मुलीने त्याची परीक्षा आपल्या केसांवर केलेली आहे म्हणतात! प्रत्यक्ष पादचारी मार्गावर त्याची परीक्षा केल्यावर इतर चघळगोंद तसेच राहिलेले तर हा चघळगोंद चोवीस तासात नैसर्गिकरीत्या निघून गेल्याचे दिसले.

तरी अजून हे संशोधन पूर्णत्वास गेलेले नाही. कापडी आणि चामडी पादत्राणांपासून हा नवा चघळगोंद काढण्यात अद्याप अडचणी आहेत.

आता मात सिंगापूरकरांना चघळगोंदापासून वंचित फार काळ राहावे लागणार नाही असे दिसते!

अर्थात ह्यातले माझे स्वतःचे काहीच नाही बरे! मी हे सगळे आजच टेलिग्राफच्या ह्या पानावर  वाचले. चित्रेही टेलिग्राफच्या निरनिराळ्या पानांवरून जोडलेली आहेत.

आता मला एक सांगा, भारतात अशी बंदी आहे का? भारतात चघळगोंद रस्त्यावरून काढण्याची समस्या आहे का? आता ह्या नव्या चघळगोंदाने आपल्याला काही फरक पडेल का?