संथ वाहते कृष्णामाई

जेमतेम तीन मिनिटे आणि दहा-अकरा सेकंदांचे हे गाणे. चटक लागल्याप्रमाणे वारंवार ऐकले. शब्दांत संगीताचे वर्णन करणे म्हणजे दोन्ही माध्यमांवर अन्याय आहे हे मान्य आहे. पण उबळ आवरत नाही.

सुरुवातीलाच देवळातल्या (तेसुद्धा विरळ वस्तीच्या गावातील छोट्या देवळातल्या; त्या तीन सेकंदांच्या आवाजाने टक्क चित्र समोर उभे रहाते) घंटेने गाणे उघडते.

मग पाणी डहुळल्याचा आवाज.

मग अचानक जे वाद्य-संगीत येते ते 'झूम झूम ढलती रात' या गाण्याची आठवण किंचित जागवते.

मागोमाग सूचनेची वाटच पहात असल्यासारखा सुधीर फडकेंचा आवाज उमटतो. "संथ वाहते कृष्णामाई"

तबला जरा वरच्या पट्टीतला.

"तीरांवरल्या सुखदुःखांची" या शब्दांनंतर एक बासरीचा जीवतोड तुकडा.

"जाणीव तिजला" च्या 'ला'वर सूर वर चढतो. आणि 'नाही'ला मींड घेत खाली येतो.

मग बासरीचा तुकडा. पण आता तबला नाही. कधीकधी नुसत्या डग्ग्यावर ठेका धरला तर चामड्याच्या कडेवर टिचक्या मारल्या जातात तसा आवाज. थोडासा रसभंग करतो.

मग सतारीचा छोटासा तुकडा. 'झूम झूम ढलती रात' सारख्या वाटणाऱ्या संगीताचा एक छोटा तुकडा.

"कुणी नदीला म्हणती माता" या ओळींत फडक्यांचा अनुनासिक स्वर चांगलाच जाणवतो. पटकन ऐकले तर 'माता'ऐवजी 'माला' (दुसऱ्यांदा म्हणताना) वाटू शकते.

'नदीला' मधल्या 'दी'वर एक लोभस हरकत.

"कुणी मानितीपूज्य देवता" नंतर बासरी हलकेच स्वररचना पुढे करते.

"पाषाणाची घडवून मूर्ती" मध्ये 'पाषाणाची'ला आवाज वर चढतो.

सुधीर फडक्यांचा 'शुद्ध' बोलण्याचा आग्रह सर्वश्रुत आहेच. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'पाषाणाची' मधला 'ष' आणि 'घडवून' मधल्या 'घड'मध्ये आणलेली स्पष्टता.

"पूजीत कुणी राही" मध्ये 'राही' वर अगदी सुधीर फडके यांचा शिक्का असलेली लडिवाळ हरकत.

पहिल्या कडव्यानंतर परत तंतुवाद्य आणि 'टिचक्यांचा' आवाज. बासरीचा तुकडा. मग तारांचा टणत्कार.

'सतत वाहते उदंड पाणी' यातील 'सतत' अगदी सहज, एका सुरात येतो. फक्त द्विरुक्तीच्या वेळी 'उदंड' ऐवजी 'उदल्ड' ऐकू येऊ शकते.

"कुणी न वळवून" मधे परत अनुनासिक आवाज.

"आळशास ही व्हावी कैसी" मधल्या "आळशास"ला स्वर वर चढतो. "व्हावी कैसी"ला परत उतरतो.

"गंगा फलदायी" मधल्या "गंगा" शब्दावर खाली जाऊन "फलदायी"तल्या "फल"ला मध्य सप्तकात येऊन "दा"ला हरकत घेत आवाज परत वर. "यी"ला परत वेलांटी मारून खाली.

परत ध्रुवपदावर येताना "कृष्णामाई" मधल्या "ष्णा"ला उच्चाराच्या स्वच्छतेचे अजून एक प्रात्यक्षिक.

तबला जरा खालच्या सुरातला असता तर... असा विचार डोकावून जातो.

शब्द:

संथ वाहते कृष्णामाई

तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही ॥

कुणी नदीला म्हणती माता

कुणी मानिती पूज्य देवता

पाषाणाची घडवून मूर्ती

पूजीत कुणी राही ॥

सतत वाहते उदंड पाणी

कुणी न पळवुनी नेई रानी

आळशास ही व्हावी कैसी

गंगा फलदायी ॥