गेल्याच शनीवारची गोष्ट. मी, पती व सूनबाई, मुलगी व जावई मथुरा उपहारगृहात जेवायला गेलो होतो. मुलगी व जावई स्कूटीवर, आणि आम्ही तिघे रिक्षाने मथुराला गेलो होतो. जेवण झाल्यावर जावयाने नॅचरल्स मध्ये आईसक्रिम खायला जाण्याचे सुचवले. आम्ही गेलो. थोडी गर्दी होती म्हणून मुलगी म्हणाली की आई, तू दोन खुर्च्या धर आम्ही आईसक्रिम घेऊन येतो. मी एका खुर्चीवर माझी पर्स आणि दुसरीवर प्लॅस्टीकची कॅरीबॅग ठेवली. आईसक्रिम घेऊन ते दोघे आल्यावर पर्स उचलली आणि शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवली.
हसत, गप्पा मारत आईसक्रिम खाऊन थंड व तृप्त झाल्यावर मुलगी व जावई स्कूटीवरुन घरी गेले. आणि आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो. घरी आल्यावर पैसे काढायला कॅरीबॅगमध्ये हात घातला तर काय, पर्स नाहीच! मी फार घाबरले. सुनेने लगेच कार काढली. आणि आम्ही परत नॅचरल आईसक्रिमच्या रस्त्याला लागलो. मी फार अस्वस्थ होते. पर्समध्ये बऱ्यापैकी पैसे,घराच्या किल्ल्या आणि मोबाईल. आमचे हे घरीच थांबले होते.कारमध्ये मी उदास बसलेली असतानाच त्यांचा फोन आला की 'पर्स सुखरुप आहे' असा नॅचरल्स मधून फोन आला होता. एकदम हायसे वाटले.
आम्ही तिथे पोहचलो आणि कावऱ्याबावऱ्या नजरेने आम्ही बसलेल्या खुर्ची कडे पाहिले तर एका तरुण सद्गृहस्थांनी माझी पर्स पुढे केली. आम्ही आभार मानले. तेवढ्यात सूनबाई आत दुकानात गेली. मला आधी वाटले होते की ती काऊंटरवरच्या माणसाचे आभार मानायला गेली. म्हणून मी पण दुकानात शिरले. तर ती त्या सद्गृहस्थांना आईसक्रिमचा फॅमिली पॅक घेऊन द्यायला गेली होती. घेऊन आम्ही बाहेर आलो तर ते गृहस्थ गायब. आम्ही इकडे तिकडे पाहिले पण नाहीच दिसले. घरी माझ्या अहोंना मोबाईलवरुन फोन त्यांनीच केला होता. आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी घेत आहोत याचा त्यांना अंदाज आला व ते सटकले. त्यावेळे मलावाटले की जगात देव आणि देवमाणसे अजून शिल्लक आहेत. अर्थात त्यांचा फोन नंबर अहोंच्या मोबाईलवर आल्याने आम्ही परत फोन करुन त्यांचे आभार मानले. चहाच्या आमंत्रणांची देवघेव झाली इ. त्या सदगृहस्थांचे नाव भावेश शहा आणि त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
(शु चि चालत नाही त्यामुळे चुकांसाठी क्षमस्व.)