गोळा भात(खास वैदर्भीय बेत)

  • वासाचा तांदुळ
  • बेसन २ पाव
  • तेल (बेसन भिजवताना घालण्यासाठी)
  • लसुण ८-१० पाकळ्या
  • तिखट,मीठ,हळद,जीरा पावडर,ओवा चवीपुरते
  • फोडणी करिता तेल,मोहरी,हळद
३० मिनिटे
३-४ जणांसाठी

गोळे:

सर्वप्रथम बेसन कढईत भाजून घ्यावे. त्यानंतर एका पातेल्यात बेसन काढुन घ्यावे. लसुण मिक्सर मधुन बारिक करुन घ्यावा.आता बेसनात तिखट,मीठ,हळद,जीरा पावडर,ओवा,बारीक केलेला लसुण हे सर्व घालावे.तेल गरम करुन घालावे (तेलाचे मोहन घालावे अंदाजे ३-४ मोठे चमचे भरुन). हे सर्व व्यवस्थित एकजीव करावे.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.बेसनाचे गोळे होतील इतपत घट्ट भिजवावे.आता बेसनाचे गोळे बनवावेत. गोळे फार लहान असु नयेत.आता एका पातेल्यात पाणी घ्यावे.त्यावर स्टीलची चाळणी मावेल असेच पातेलं घ्यावं.पाणी अर्धे पातेलं भरेल इतके घ्यावे.पातेलं गॅसवर ठेवावे.त्यावर चाळणी ठेवावी व तयार केलेले गोळे चाळणीवर ठेवावेत.त्यावर झाकण ठेवावं.अशाप्रकारे हे गोळे वाफेवर शिजवावेत.

(गोळे शिजवण्याच्या पद्धती वेगळ्या असु शकतात.कुकर मध्ये सुद्धा शिजवता येतात.त्याचप्रमाणे भात शिजत आल्यावर देखील त्यामध्ये गोळे टाकुन शिजवता येतात)

भात:

तांदुळ स्वच्छ धुवावेत.कुकर मध्ये २ चमचे तेल गरम करावे.तेल झाल्यावर त्यात मोहरी,हळद घालावी.त्यानंतर तांदुळ घालुन थोडे परतून घ्यावे. त्यानंतर  पाणी घालावे व शिजु द्यावे. भात थोडा मोकळा होऊ द्यावा.

भातासोबतच गोळे शिजवायचे असल्यास कुकरची शिट्टी न लावता त्यावर ताटली झाकावी.भात थोडा शिजल्यावर त्यामध्ये गोळे टाकावेत व नंतर १  शिट्टी  होऊ द्यावी.

आता भातात गोळे बारिक करुन खावेत!

यासोबत चिंचेचा आंबट-गोड सार करतात. सोबत मिरच्या तळणे.मसाल्याच्या मिरच्या असल्यास उत्तम! गोळे बनवताना तिखट,जीरा पावडर थोडे जास्त टाकल्यास जरा चटकदार बनतील!

आई