ह्यासोबत
१८९५ साली जागतिक चित्रपटसृष्टीला रूढार्थाने सुरुवात झाली. ल्युमिएर बंधूंनी फ्रान्समध्ये त्या वर्षी त्यांनी तयार केलेल्या 'चित्रपटांचे' खेळ केले. अर्थात आजच्या मानाने ते चित्रपट अविश्वसनीयच होते. १७ मीटर लांबीची एक फिल्म, म्हणजे साधारण ४५-४६ सेकंदांचा 'चित्रपट'! भारतात पहिला चित्रपट लगेचच, म्हणजे १८९६ साली मुंबईत दाखवला गेला. हिंदुस्थानात त्याआधीच ऍनिमेशन चित्रपट तयार झाला होता. १८९२ सालचा महादेव पटवर्धनांचा शांबरिक खरोलिका (जादूचा कंदील हे त्याचे मराठीतील भाषांतर!). पण जागतिक चित्रपटांचा इतिहास नोंदताना का कोण जाणे, त्याची अधिकृतरीत्या नोंद घेतली गेली नाही. (शेवटी 'हा जय नावाचा इतिहास आहे' हेच खरे!)
या नोंदीनुसार १९९४ साली चित्रपटसृष्टी शंभरीत पदार्पण करती झाली. त्या काळात मी लघुपटांचा पटकथालेखक, सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक संकलक अशा टोप्या बदलत जगण्यापुरते कमावण्याचा प्रयत्न करीत होतो. सोबत काही समानधर्मी स्नेही होते. त्यांतील एक नावाजलेला आणि अनुभवी कॅमेरामन-दिग्दर्शक होता. तो फिल्म इन्स्टिट्यूट मधला नासिरुद्दीन शाह, सईद मिर्झा आदींचा सहाध्यायी. आम्हाला मिळणारी बहुतेक कामे त्याच्याच भरवशावर मिळत आणि पार पडत असत.
१९९२ साली मी USAID या संस्थेसाठी एक लघुपट (पटकथालेखन, दिग्दर्शन आणि संकलन) केल्याने मला खूप काही येते हे सिद्ध झालेच होते. बाकीच्या मंडळींचे पाय सुदैवाने जमिनीवर होते.
ही जागतिक सिनेमाची शंभरी आपण 'या टप्प्यावर भारतीय सिनेमा कुठे आहे' अशी टेलीफिल्म करून साजरी करावी याबद्दल आमचे एकमत झाले. आमचा मुख्य माहितीस्त्रोत म्हणजे नॅशनल फिल्म आर्काईव्हज या संस्थेचे जनक पी के नायर. हा महापुरुष 'चित्रपटवेडा' म्हणण्याच्याही पलिकडचा होता. त्यांच्या चित्रपटवेडांचे अनेक किस्से फिल्म इन्स्टीट्यूटमधल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध होते.
नमनाचे दोन घडे तेल झाले. आता जरा पुढे उडी मारतो. उपरनिर्दीष्ट टेलीफिल्म करण्यासाठी दूरदर्शनने आम्हाला अर्थसहाय्य करण्याचे कबूल केले. नायरबुवांनी पटकथा लिहीली. मुख्यत्त्वे भारताच्या वेगवेगळ्या भागातील चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या मुलाखती, आणि त्यांना एका सूत्रात जोडणारी नायरांची पटकथा आणि दीर्घ मुलाखत असा बेत जमला. यात माझ्याकडे दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीतील, विशेष करून मद्रास (चेन्नई झाले नव्हते) आणि त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम झाले होते का आठवत नाही) येथील, मुलाखतींचे काम आले. मुंबईतील कामाचा भार सर्वात जास्त असल्याने तिथे बाकीचे सगळे गेले.
चित्रपटसृष्टीतल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे हे काम 'परवा पूर्ण करून काल सुपूर्द करायला हवे' अशा हातघाईवर आल्यावरच मिळाले होते. त्यामुळे मद्रासला जाण्याचा बेत आखून तिकीट राखून ठेवणे असले नखरे करायला वेळ नव्हता. मिळेल त्या गाडीने जाणे एवढाच उपाय होता.
क्रेडिट-कार्ड, एटीएम-कार्ड वगैरेचा काळ अजून यायचा होता. म्हणजे, ही कार्डे बाळगण्याइतकी रक्कम खिशात असायचा काळ यायचा होता. त्यामुळे ट्रॅव्हलर चेक्स घेऊन जाणे भाग होते. तारीख २३ डिसेंबर, शुक्रवार. संध्याकाळच्या मद्रास मेल मध्ये बसवून देण्याचे एकाने कबूल केले. त्याचा भाऊ रेल्वेत काम करणाऱ्या एका खानसाम्याला ओळखत होता. आता खानसामा हा काही फार वरचा हुद्दा नाही हे आम्हाला कळत होते. पण हाती असलेल्या तुटपुंज्या वेळेत कोणी मोठा हुद्देदार नाही गाठता आला.
खानसाम्याने रेल्वेत एका आरक्षित बोगीत घुसवून तर दिले, पण आतमध्ये दोन पावले टेकून उभे रहायलाही जागा नव्हती. शेवटी मी स्वच्छतागृहाचा आसरा घेतला आणि सोलापूरपर्यंतचे पाच तास 'उभे रहाण्याच्या' आसनात प्रवीण झालो. त्या काळात स्वच्छतागृहात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची अडचण झाली असेल. पण सगळ्या जागा बळकावून त्यांनी माझी जी अडचण केली होती त्याचे काय?
सोलापूरला काहीतरी चमत्कार झाला आणि मला बाहेर एका बाकावर बूड टेकण्यापुरती जागा मिळाली. पण ते बाक नेमके दाराजवळ. पाठीवरच्या सॅकमध्ये पंचवीस हजारांचे ट्रॅव्हलर चेक्स. ते चोरीला गेले तर? या धसक्याने मी पाय पसरायची संधी मिळाली तरी सॅक आणि पाय (त्या क्रमाने) पोटाशी घेऊन बसून राहिलो. मद्रासला पोचेपर्यंत पार भुस्कट पडले होते.
मद्रास स्टेशनवर उतरल्या उतरल्या एक तरुण माझ्याकडे आला. "God will bless you. He is seeing you" मला काही कळले नाही. पण लगेच खुलासा झाला "Today is Christmas eve. Help me and God will help you tenfolds". त्याच्या आधी असल्या अनुभवांनी पुरेसे हात (आणि खिसा) पोळून घेतले होते त्यामुळे माझे मन अजिबात द्रवले नाही.
मी मद्रासमधल्या माझ्या गुरूबंधूच्या घरी जायच्या खटपटीस लागलो. अनुभवी कॅमेरामन-दिग्दर्शक हा आमच्या सगळ्या कंपूचा गुरू. चित्रपटसृष्टीत त्याने एव्हाना जवळजवळ वीस वर्षे काढली होती. त्यामुळे त्याचा शिष्यपरिवार भारताच्या कानाकोपऱ्यात पसरला होता. या गुरूबंधूचे नाव 'चंद्रा' (चंद्रशेखरचे लघुरूप) होते. चंद्राचा पत्ता हातात धरून बाहेर पडलो आणि रिक्षा करावी म्हणून रिक्षा शोधू लागलो. तेवढे पैसे होते. पण रिक्षा काही दिसेनात.
मद्रासवर मी त्याआधीही चारदोन वेळेला स्वारी केली होती. काहीही मदत हवी असल्यास सुस्थितीत दिसणाऱ्या एखाद्या वयस्क गृहस्थाला किंवा रजनीकांतप्रमाणे दिसणाऱ्या एखाद्या छाकट्या पोलिस इन्स्पेक्टरला इंग्लिशमध्ये आवाहन करणे हा मार्ग मला ठाऊक होता. त्याप्रमाणे मी एक 'रजनीकांत' इन्स्पेक्टर गाठला. त्याने तत्परतेने मोडता घातला. "नॉ नॉ, डॉंन्ट गो बाय (य पूर्ण) आअटो. दे चीट (ट पूर्ण). गो बाय बस नो?" पोलीस इन्स्पेक्टरनेच परिस्थितीचे असे यथातथ्य वर्णन केल्यावर रिक्षाने जाण्याचा अविचार सोडला.
रजनीकांतने एक सुब्रमण्यम अय्यर गाठला आणि माझी ब्याद त्याच्या गळ्यात अडकवली. उत्साहाने अय्यरसाहेबांनी मुंडू गुंडाळून खोचले आणि चांगली अर्धा किलोमीटर वरात काढली. पीटीसी (पल्लवन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन) च्या एका बसमध्ये मला व्यवस्थित बसवून, कंडक्टरला कुडकुडकुडच्या तमिळ चिपळ्या वाजवून दाखवून, "ही विला ट्टेल यू आं. डॉण्ट वरी, वोन्ली हाफान आवर" असा आशीर्वाद देऊन साहेब गेले.
बाकी 'पीएमटी' च्या मुलुखातून आलेल्या मला 'पीटीसी' मध्ये बसल्यावर रडू फुटायचेच बाकी होते. गाडीतील सर्व दिवे चालू? महिलांसाठी राखीव (तिथे महिलांसाठी राखीव बाक १९९४च्याही आधीपासूनच असत) बाकांवर फक्त महिलाच, आणि त्या रिकाम्या असल्या तरी इतर कुणी त्यावर बसायचा यत्नही करीत नाही? कंडक्टर सुट्टे पैसे देतो? प्रवासी जिथून चढतात आणि उतरतात त्या दोन्ही दारांच्या पायऱ्यांवर देखील चालू असलेले दिवे? फुटणारा हुंदका दाबत कसाबसा बसून राहिलो.
गंतव्य स्थळ आल्यावर कंडक्टरने मला जवळजवळ हाताला धरून उतरवले. आणि "हाच तो स्टॉप" अशा अर्थाची तमिळ वाक्यावली माझ्यावर फेकली. (हा माझा अंदाज हं. त्याने मला तमिळमध्ये मावशीवरून शिव्या दिल्या असत्या तरी मला काय कळणार होते म्हणा. पण एकंदर अनुभव पहाता "हाच तो स्टॉप" हेच वाक्य असावे). मी बेधडक "तुमचे लई उपकार जाले बगा" असे त्याला सुनावले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमलले आणि परत बसमध्ये चढून त्याने घंटा मारली.
चंद्राचे घर जवळच होते. चंद्रा आमच्यासारखाच 'भैकू' श्रेणीतला असल्याने त्याच्या घरातील व्यक्तींनी अर्थातच 'वाया गेलेला कारटा, चार पैसे मिळवेल तर शपथ, नशीब आपले' असे हात वर केले होते. चंद्राने जेव्हा त्याच्या थोरल्या भावाची ओळख करून दिली तेव्हा त्या भावाच्या नजरेत मला मूळ तमिळमधल्या संवादांची ही सगळी मराठी सबटायटल्स स्वच्छ दिसली. मात्र रात्रीच्या जेवणाला तिथेच थांबावे असा मनापासून आग्रह झाला. तिथे मी पहिल्यांदा शार्क (चंद्राच्या भाषेत शॉर्क) माशाची - ज्याला आपण मोरी मासा म्हणतो - सुकी चटणी खाल्ली. अप्रतिम होती.
तदनंतर आमची वरात प्रसाद स्टुडिओजवळच्या एका लॉजवर आली. तिथे माझी सोय करून, सकाळी येतो असे सांगून चंद्रा मावळला.
झोपायला अखंड गादी? हातपाय ताणता येतील तेवढे ताणून झोपलो!
सकाळी चंद्रा दोन सोबती बरोबर घेऊन हजर झाला. शूटिंगची काय आणि कसा बेत करावा याची चर्चा सुरू झाली.
येथे थोडीशी तांत्रिक माहिती देतो. आम्ही हे सर्व Hi-band U-matic नावाच्या व्हिडिओ-टेपवर चित्रित करणार होतो. VHS (घरात बघितली जाणारी व्हिडिओ कॅसेट), Low-band U-matic (दूरदर्शनवरील बहुतेक कार्यक्रमांना वापरली जाणारी कॅसेट) आणि Hi-band U-matic (अधिक चांगल्या दर्जाची) अशा पायऱ्या होत्या. त्यावरची Betacam अजून प्रचलित झाली नव्हती, आणि झाली असती तरीही एकंदरीत आमच्या बजेटाच्या बाहेर होती. या शूटिंगसाठी कॅमेरा, कॅमेरामन, सहाय्यक कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट, लाईटस, लाईटबॉय आदी सामग्री आणि मंडळी दिवसाच्या भाड्यावर उपलब्ध होत. सगळे सर्व मिळून दिवसाला सहा ते आठ हजारापर्यंत बसवावे अशा मला सूचना होत्या. आठ हजारांच्या वरती जाणेच शक्य नव्हते, कारण हातातल्या पैशात मला तीन दिवसांचे शूटिंग करायचे होते. दोन दिवस मद्रास आणि एक दिवस त्रिवेंद्रम. आणि शूटिंगच्या तयारीसाठी (हिंडणे, फोन, माझे रहाणे-जेवणे आदि) काही रक्कम खर्चायला लागणार होतीच.
आता ज्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यांचे काय? तर आम्ही आमच्या परीने तीन महिन्यांपूर्वीपासूनच पत्रापत्रीला सुरुवात केली होती. पण फारसा कुणाचा प्रतिसाद नव्हता. दोष त्यांचा नव्हता. दूरदर्शनकडून काम मिळेल याची खात्री नसल्याने आम्ही थेट तारखा मागण्याचे धाडस केले नव्हते. त्यामुळे "असे नि असे काम करू पहातो आहोत, तुमचे सहकार्य मिळेल अशी आशा आहे" या आमच्या मोघम पत्रांना "सहकार्य मिळेल, येण्याआधी कळवून मुलाखतीची वेळ ठरवावी" अशी मोघम उत्तरे आली होती. त्यात मणीरत्नम, चारु हसन अशा थोरामोठ्यांचा समावेश होता. आता सर्व मंडळींना ऐन वेळेला गाठून दोन दिवसांत मुलाखतीची वेळ द्यावी अशी याचना करणे आले.
बेत असा ठरला की २६ आणे २७ तारखेला सगळ्यांना फोन करत आणि शक्य त्यांना भेटत हिंडणे. २८ आणि २९ ला शूटिंग करून त्रिवेंद्रमला रवाना. ३० तारखेला तिथल्या लोकांच्या पाया पडणे. ३१ तारखेला त्रिवेंद्रमचे शूटिंग.
चंद्रा एक ऍंम्बॅसिडरच ठरवून आला. कारण त्याच्याबरोबर अजून दोन मित्र होते. त्यातल्या एकाचे नाव आठवते - थिरु मारन. ('थिरु' म्हणजे आपल्या भाषेत 'श्री'. आपण 'श्री पवार' म्हणतो तसे ते 'थिरु चिदंबरम' म्हणतात. थोडक्यात त्याचे नाव मारन पण नावामागच्या उपाधीसकट सांगण्याची पद्धत आवडली. मग मीपण 'श्री संतोष' कसे वाटते हे म्हणून पाहिले. पुढे 'भुवन' जोडायचे राहिल्यासारखे वाटले! सोडून दिले) थिरु मारन फार गंभीर असल्याचा सतत आव आणत आणि तोंडघशी पडत. कारण गंभीरपणाचा आव आणायला आवाज जरा खर्जाकडे झुकणारा हवा. पण मारनपंतांचा आवाज जरा कुठे काही खळबळ माजली की लगेच चिरकायचा.
दुसऱ्याचे नाव आठवत नाही, पण तो दाढीदीक्षीत होता एवढे आठवते. आणि बोलायला वाघ होता. (याचा उपयोग मी त्याची 'एक प्रेक्षक' म्हणून मुलाखत घेऊन केला). तो सतत 'मुकाबला मुकाबला' या ए आर रहमानच्या त्यावेळी नुकत्याच आलेल्या गाण्याची तमिळ आवृत्ती गुणगुणत असे.
तर आम्ही चौघेजण त्या ऍंम्बॅसिडरमधून हिंडू लागलो. प्रथम प्रसाद स्टुडिओ गाठला. आमच्या गुरूचा 'बोस' नामक एक सहाध्यायी तिथे मोठ्या पदावर होता. त्याची आणि प्रसाद स्टुडिओच्या मालकाची मुलाखत घेण्यासाठी वेळ ठरवली. मग शूटिंगसाठी लागणारी सामग्री गोळा करायच्या मागे लागलो. आता मद्रासच्या कुठल्याकुठल्या उपनगरांतून हिंडलो ते आठवत नाही, पण बराच वेळ गेला एवढे खरे. अखेर सहा हजार रुपये दिवसाला या बोलीवर सगळे लोक ठरले. एक मेटॅडोरही ही सगळी सामुग्री नेण्यासाठी ठरवली.
मग ज्यांना ज्यांना मोघम पत्रे धाडली होती त्यांना त्यांना फोन करून वा प्रत्यक्ष भेटून वेळा ठरवल्या.
या सगळ्या लोकांच्या घरी फोन केला तर कुणीतरी नोकर उचले. आणि पहिल्या धारेच्या तमिळमध्ये संभाषण सुरू होई. इंग्रजीत (हिंदी बोलण्यात अर्थ नव्हताच) जरी अमुकतमुक आहे का असे विचारले तरी उत्तर तमिळमधून वाजे. त्यामुळे फोन करायलादेखील चंद्राची गरज पडे.
मणीरत्नमबुवांनी टोपी घातली. त्यांचीही चूक नाही म्हणा. एका मोघम पत्रावर जर ते मुलाखत देण्यासाठी कामधंदे सोडून बसले असते तर चित्रपट सोडाच, आमच्यासारखी एखादी टेलिफिल्मही करू शकले नसते.
एकदा 'करू प्रयत्न' म्हणून मी मणीरत्नम यांचा नंबर फिरवला, आणि चक्क त्यांनीच फोन उचलला. ते बोलताहेत हे कळल्यावर मी क्षणाचीही उसंत न देता गाडी मारली. "तुम्ही आम्हाला वेळ देण्याचे कबूल केले होते (आणि म्हणूनच मी इथपर्यंत आलो)" हे आणि असे आग्रही बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आणि शेवटी अत्यंत मृदू आवाजात माफी मागून ते म्हणाले, "माझा Bombay हा चित्रपट नुकताच पूर्ण झाला आहे. तो सेन्सॉरच्या लोकांना दाखवण्यासाठी मी चाललो आहे. काही सामान घेण्यासाठी म्हणून मी घरी आलो आहे. पण मला आता परत निघायला हवे. तुम्ही सुहासिनीशी बोला. तिला वेळ असेल तर ती जरून मुलाखत देईल". हिंदी चित्रपटसृष्टीतील सदतिसाव्या पायरीवर असणारे बनचुकेदेखील कशा उर्मटपणे बोलतात याचा अनुभव मुंबईत आला होता. त्या पार्श्वभूमीवर हे जास्त जाणवले.
पण चंद्राला त्याचे काहीच कौतुक नव्हते. मणीरत्नम पैसे घेऊन आणि पैसे मिळवण्यासाठी चित्रपट काढतात. यात सामान्य माणसांपेक्षा वेगळे असे ते काय करतात? आपण पैसे मिळवण्यासाठी या मुलाखती घेत हिंडतो, तसेच ते. असे त्याचे मत पडले. स्वमताच्या पुष्टीकरणासाठी त्याने किश्श्यांची पोतडी उघडली.
मुंबईहून आलेला एक सेकंड असिस्टंट कॅमेरामन एका चित्रीकरणात फोकस पुलिंग (मुख्य कॅमेरामन हा चित्रचौकट ठरवणे आणि त्यासाठी लागणारी प्रकाशयोजना करणे यात जास्त लक्ष घालतो. प्रत्यक्ष कॅमेरा धरणे, जर शॉटकरता कॅमेरा आडवा (पॅन) अथवा उभा (टिल्ट) हलणार असेल तर त्याप्रमाणे फोकस बदलणे (फोकस पुलिंग) या कामांसाठी बहुतेक वेळेला सहाय्यक असतात) करताना चुकला आणि जयाप्रदाला एका शॉटचा रीटेक द्यावा लागला. आपल्यामुळे मॅडमला त्रास झाला म्हणून हे ध्यान तिची माफी मागायला गेले. हे त्या चित्रपटाच्या निर्मात्यासमोर घडले. तो निर्माता भडकला. "माफी मागायचीच असेल तर मुख्य कॅमेरामनची माग. त्याची मान तुझ्यामुळे खाली झाली. हिची कशाला मागतोस? मी हिला पैसे मोजून आणले आहे. गरज असेल तर ती या एका शॉटचे पंधरा रिटेक देईल". आणि हे सर्व जयाप्रदाच्या पुढ्यात!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या कडक शिस्तीबद्दल ऐकून होतोच. या शिस्तीनुसार आपले शूटिंगही सुरळीत पार पडावे अशी मनात प्रार्थना करत बसलो.
एव्हाना संध्याकाळ होत आली होती. चित्रपटसृष्टीतल्या अलिखित रिवाजाप्रमाणे सायंकालीन 'बैठकी'ची तयारी सुरू झाली. चंद्राने मला एका गजबजलेल्या वस्तीत थिरु मारन याच्या कार्यालयात नेले. तिथले काम झाले की बैठकीला बसू अशी बोली होती.
थिरु मारनने मला इंग्रजी बरे येते या समजुतीत त्याने हाती घेतलेल्या प्रकल्पाची माहिती देण्यास सुरुवात केली. तो काळ तमिळनाडूमध्ये पुरात्ची थलैवार 'अम्मा'चा होता. पुरात्ची थलैवार (जयललिता) आणि कलाइंग्नार (करुणानिधी) यांचा अम्मल आलटून पालटून चालण्याची प्रथा एव्हाना पडली होती. आणि थिरु मारन अम्माचा भक्त होता. त्याचा प्रकल्प असा होता - 'अम्मा'चा (कितवा ते आठवत नाही) वाढदिवस जवळ येत होता, त्या निमित्त 'अम्मा'ला सोन्याच्या पत्र्यावर वाढदिवसाचे भेटपत्र द्यायचे. त्याला अर्थसहाय्य करण्यासाठी पार जपान-सिंगापूरपासून अनिवासी भारतीय मंडळी तयार होती (असे त्याचे म्हणणे होते). भेटपत्र तमिळ आणि इंग्रजीत असणार होते. त्याचा इंग्रजी तर्जुमा मी नजरेखालून घालावा असे त्याचे मत पडले. "We tamil peoples adores the revolutionary leader" या आणि असल्या वाक्यांनी भरलेले ते भेटपत्र वाचून माझ्या बाळबोध इंग्रजीला फेफरे आले. कशीबशी त्यातून सुटका करून घेतली.
'बैठक' माझ्या हॉटेलच्या खोलीतच बसली. फक्त नंतर जेवायला बाहेर गेलो. चंद्राने एका हातगाड्यांची फरड लागलेल्या रस्त्यावर आमचा मोर्चा नेला. पुण्यात हातगाडीवर वडापाव, भुर्जीपाव आदि पदार्थ खाल्ले होते. तिथे इडली आणि डोसे खाल्ले. तशा वाफाळत्या, लुसलुशीत इडल्या आणि कुरकुरीत डोसे परत नाही खाल्ले कधी.