कवडसे...

१.

काळोखातही एक कवडसा... तुझ्या स्नेहाचा
काटेरी वाटेत एक भरवसा... तुझ्या शब्दांचा
खूप काही नको असते... दोनच थेंब आपुलकीचे
अन थोडे धागेही... जपलेल्या बांधिलकीचे !

२.

मन कधी तृप्त... अन कधी आसुसलेले
मन कधी शांत... अन कधी गहिवरलेले
मन भिरभिर होते... अन मागते काही
कधी होते कैकयी... कधी भिष्माची ग्वाही !

३.

हा रुसता कान्हा... मेघही थरकून ओले
अन गगनपक्षीही.... मौनीबाबा झाले
'मनवू कसे अन रिझवू कसे ?' ते म्हणती
कधी सरेल गूढ... दरवळेल सुगंध भवती !

४.

ह्या कातरवेळी... साजण घाली साद
त्या कळे कसे ना... देऊ कसा प्रतिसाद
तो दूर तिथे... परी मन रेंगाळून 'येथे'
मम श्वास... ध्यास... विश्वास मागुनी घेते !