समंध

समंध

पाय लावुनी नभास जेव्हा.. रोज पहाते माणसे उलटी
उलटे जग  नि त्याच्या रिती 
कायम भीती मनात असते.. आपण उलटे आहोत याची....

प्रदक्षिणा ज्यांची स्वार्थाभोवती . ..प्रार्थना करती सत्तेसाठी
लांगुलचालन धर्म तयांचा
येताजाता पाया पडती ...चिरडून शरीरे कित्येकांची

घातला कापूस  कानामधुनी... तरीही येतो  कानावरती
गोंगाट मुक्या माणसांचा
मनात माझ्या समंध आहे....पटते पुन्हा खात्री त्याची

एकामध्ये एक गुंफूनीया ... त्या गोंगाटाच्या भेंडोळ्याला
वाढू लागती आवर्तने ...
अंधाराच्या पोटामधुनी .. किरकिरणाऱ्या रातकिड्यांची

वाजू   लागते  घंटा तेव्हा  घुमू लागतो पिंपळपार
देव  राऊळी   बंदिवान 
साधी इच्छा अपूर्ण राहे ... न्यायासाठी  येणाऱ्यांची
...................................................................

कधी दिसता माणूस कोणी ...हळहळणारा दुसऱ्यासाठी
डोक्यामध्ये घालून सोटा
टांगावे  त्या उलटा करुनी .  ... समंधाच्याच रांगेसाठी 

-सोनाली जोशी