नियोजन

तर ठरले मग,  ह्या दसऱ्याच्या पुढच्या दिवसापासून रोज सकाळी बरोबर ६:३० लाच उठायचे. पण त्या साठी रात्री लवकर झोपले पाहिजे. चालेल ..! हिला सांगायचे की आता रात्री ९:३० च्या पुढे दूरदर्शन बंद. काहीही झाले तरी सकाळी उठलेच पाहिजे. बस झाले आता. खूप झोपून झाले. नंतर स्नान वगैरे आटोपून योगा, सुदर्शन क्रिया..७:३० पर्यंत. नंतर... हां..! चिऊ चा बॉडी मसाज..पण पण तो तर उठतच नाही. कारण.. मीच कधी उठत नाही. हे काही बरोबर नाही.चांगले संस्कार नको का घडवायला.. .. जाऊ देत..७:३० ते ८:०० वर्तमान पत्र...  ठीक ८.०० वाजता तुळशीची पाने टाकून एक प्याला दूध. ८:०० ते ८:५० "इतर कामे.. चिऊ ला स्नान वगैरे" ८:५० ते ९.३० सौ. ला कामात मदत (?),त्यातच जेवण पण  १०:०० ते ६:०० ऑफिस ...६.०० ते ६..३० चहा आणि चिऊ सौ बद्दलच्या व सौ च्या (शेजाऱ्या पाजाऱ्यां बद्दल च्या व) इतर तक्रारी ऐकणे...६.३० ते ७.०० ....चिंतन, आवडीचे गाणे..व इतर कामासाठी राखीव..७.०० ते ७.३० जेवण..(वेळेवर जेवण केल्याने तब्येत छान राहते. इति...आई)..७.३० ते ८.३० दूरदर्शन..किंवा राखीव (मित्रांसाठी)..८.३० ते ९.३० अभ्यास (नवीन गोष्टी शिकणे)  ९.३० ते १०.०० चिऊला सुरेल आवाजात(?) गाणे म्हणून झोपवणे.... लिहूनच काढू...

"अगं ~~~~~ ! माझी डायरी आणि पेन दे बरं !" ह्म्म्म.. अरे ह्यात तर १:०० जानेवारी चे वेळापत्रक आहेच की. त्याच्यातर थोडा बदल केला तर तो पण आपण वापरूच शकतो की. एक सुट्टीच्या दिवशीचे पण वेळापत्रक आहे ह्यात. दुपारची झोप रद्द करून 'प्रलंबित कामे' असे टाकून द्यावे. चला ठीक तर मग.. आता मात्र काहीही बदल नाही करायचा, आणि काहीही झाले तरी वेळापत्रकाप्रमाणेच झाले पाहिजे सर्व. एक वेळापत्रकाची सत्यप्रत आणून नेहमी खिशात ठेवावी. 

दसऱ्याचा दुसरा दिवस : अरे ! हे काय ? ८:०० ? अगं? छे ! अलार्म नाही वाजला वाटते ? नाही पण आताच तर वाजला होता. घड्याळ तर पुढे नाही ना ? अगं .ऽऽऽ वाजलेत किती?  कुठे आहेस ? तू अलार्म बंद का केलास? मी ? अगं मग उठवले का नाहीस.. छे ! आणि उशीखालचे वेळापत्रक कुठे गेले ? काय? देवघरात? कमाल आहे .. छे! पेपर कुठे आहे..? ए चिऊ ! चिऊऊऊऊउ ..ऊऊऊऊउठ्ठ ..ऊठ म्हटले ना.! तुझ्यामुळेच ..! आज क्षीरसागरांकडे जाऊनच येऊ.. त्यांच्या नियमितपणाचे रहस्य काढावेच लागेल.. उद्यापासून मात्र नक्की उठायचे...दोन अलार्म लावू..एक. सहाचा आणि दुसरा ६:१५ चा..काहीही झाले तरी ह्यात हयगय नाही होऊ द्यायची.. आज थोडे आरामशीरच करू आता.. नाहीतरी उशीर झालाच आहे...!