आगन्तुक-एक आनंदयात्रा

नुकतीच माझ्या वाचनांत एक सर्वांगसुंदर अनुवादित कादंबरी आली.मनाची पूर्ण पकड घेणाऱ्या या कादंबरीचे रसास्वादांत मनोगत चे सदस्यांना सहभागी करून घ्यावे अशी तीव्र इच्छा झाली म्हणून हा लेखप्रपंच.

कादंबरीच्या मूळ लेखिका धीरुबहेन पटेल या गुजराथी भाषिक.या व्यापारी भाषेंत इतकं सरस लिहिणारे लेखक असावेंत यांच सुखद आश्चर्य या कादंबरीच्या वाचनानंतर वाटलं. १९९५ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीस २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. कादंबरीचं अत्यंत सुरेख मराठी रूपांतर सुषमा सरोगल यांनी केलेलं आहे.

कादंबरीचा तरूण नायक हा एका सुप्रतिष्ठित गुजराथी घरामधील तीन भावांमधील धाकटा. अध्यात्माच्या ओढींने तो उत्तरकाशीमध्यें एका थोर सत्पुरुषाच्या सन्निध्यांत येतो, दीक्षा घेऊन संन्यासी होतो,आणि उच्चकोटीचा योगी होतो‌. सद्गुरुंच्या महासमाधीनंतर गुरुबंधू आश्रमव्यवस्था बघण्यास उत्सुक आहे असे दिसतांच हा आश्रम सोडून जाण्याचा निर्णय घेतो, इतकंच नव्हे तर गुरुबंधुला अडचण नको म्हणून संन्यासी वृत्तीचा त्याग करतो आणि मुंबईस भावाच्या घरी येतो.

भावाच्या समृद्ध घरांत प्रवेश करण्यापासून तें पुनश्च ध्यानधारणेसाठी वृंदावनांस प्रस्थानापर्यंतचा नायकाचा अतिशय थोड्या कालावधीचा वावर हा कादंबरीचा विषय आहे.

या वाटचालींत त्याच्या दोन्ही भावांच्या संसारांत उठलेलं काहूर,भावांमधील हेवेदावे,जावांची शीत युद्धें, नोकरांसह घरांतील सर्वांचे दृष्टिकोन,मुलांची सुरवातीची अलिप्तता,हेटाळणी, आणि नंतर भावलेली त्याची सहजवृत्ती व आध्यात्मिक उच्चता,तसंच नायकांस लिफ्टंमध्यें अचानक  भेटलेली पूर्वाश्रमीची साधिका, तिचे आगमनानंतर झालेले इतरांमधील स्वार्थी बदल, अशी अनेक स्वभावविश्वें अत्यंत सुंदरपणें येथें लेखिकेनें रेखाटलेली  आहेंत.

मानवाच्या शाश्वत सुखासाठी समर्थ रामदासांनी वर्णिलेला "आत्मबोध"हा  अनेकजागीं कादंबरींत वाऱ्याच्या शीतल झुळुकेप्रमाणे संवेदनाशील मनांस स्पर्शून जातो आणि मनांस अनुनभूत आनंद देतो.

कादंबरीची शब्दरचना अत्यंत ओघवती  आहे. मुंबईमधील वातावरणामुळे इंग्रजीमिश्रित मराठीचा वापर सुयोग्यपणे केलेला आहे.बोलपटाप्रमाणे सर्व कादंबरी वाचकाच्या मनोपटलावर दृष्यमान होते आणि परकायाप्रवेश केल्यासारखें आपण रममाण होतो--कादंबरी मनामध्यें दीर्घकाळ रेंगाळत रहाते.

कादंबरीचे प्रकाशक साहित्य अकादमी आहे. किंमत ७० रुपये आहे. प्रकाशन क्रमांक आहे--ISBN: 81-260-2036-9

सदानंद जोशी.