तीन प्रवासी

विंदा करंदीकरांच्या 'धॄपद' या काव्यसंग्रहातली काही दिवसांपूवी वाचलेली कविता अर्थ नीट न समजल्याने मनात राहिली आहे.

तीन प्रवासी


विमान आले डुंबत डुंबत
अंधारातुन
आणि उतरले तीन प्रवासी
चिंचेच्या अर्ध्या पानावर

एक म्हणाला ,
'आज विसरलो नाक घरी मी'
नंतर दुसरा.
'परवा माझे असेच झाले
स्वस्थ झोपलो डोळे उघडुन
आणि भावली पळून गेली'

तिसरा वदला,
'अता दुधाचा प्रश्न न उरला
काल नवी मधमाशी व्याली'

इतक्यामध्ये
अंधाराच्या नाकावरती
एक काजवा येऊन बसला
त्याला पाहुन ते म्हातारे
परस्परांच्या धरुनी शेंड्या
इतके हसले,

इतके चळले,
उरलेल्या अर्ध्या पानातिल
दवबिंदूतच ते विरघळले.

या कवितेत काय अर्थ दडला आहे? त्यांनी ५५ साली लिहिलेली ही कविता आहे. त्यामध्ये असणारे संदर्भ नक्की काय सुचवतात?