मराठी पुस्तकांचा तडाखेबंद खप

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून बरे वाटले. सर्वांना ती वाचून तिच्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्यासाठी ती येथे उतरवून ठेवत आहे. विचार करण्यासारख्या वाक्यांना अधोरेखित केलेले आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : कोण म्हणतं मराठी पुस्तकं खपत नाहीत?
(नीला शर्मा)
 
पुणे, ता. २१ - मराठी पुस्तकांचा तडाखेबंद खप होण्याचे सुखद चित्र सध्या शहरात दिसते आहे.
"सकाळ' आयोजित "शब्दरत्न ग्रंथ प्रदर्शना'ला भेट देणाऱ्या महाराष्ट्रभरच्या वाचकांची अलोट गर्दी पाहिली तर याची खात्रीच पटते! सध्या शहरात एकाच वेळी चार ग्रंथ प्रदर्शने सुरू असून, वाचकांना सुमारे २५० प्रकाशन संस्थांची ३५ हजारांच्या आसपास शीर्षकांची पुस्तके पुरवायला ती सज्ज आहेत.

शिवाजीनगर भागातील कृषी महाविद्यालय पटांगणावरील "सकाळ' आयोजित "ऍग्रोवन' प्रदर्शनात "ब्लू बर्ड' व मॅजेस्टिक प्रकाशनच्या सहकार्याने एक लाखाहून जास्त पुस्तकांचे वैविध्य वाचकांना खिळवून ठेवते आहे. "ब्रॅण्ड प्रमोशन' विभागाचे हेमंत वंदेकर म्हणाले, की तीन हजार चौरस फुटांच्या भव्य जागेत विविध विषयांनुरूप पुस्तकांची दालने आहेत. गुंतवणूक, बचत गट, स्पर्धापरीक्षा, उद्योजक होण्यासंबंधीच्या तंत्र व मंत्रांची माहिती असणारी पुस्तके हातोहात खपत आहेत. सटाणा, मालेगाव, यवतमाळ, नंदूरबार, सोलापूर, हुबळी व बेळगावसारख्या ठिकाणांहून कृषिप्रदर्शन बघायला आलेल्या अनेक जणांनी मोठी पुस्तकखरेदी केली आहे.

पाटील एन्टरप्रायजेसचे संतोष पाटील म्हणाले, की या प्रदर्शनात शेती, आरोग्य, ज्योतिष, शैक्षणिक व अनुवादित पुस्तकांचा प्रचंड खप होतो आहे. चरित्रविषयक पुस्तकांना भरपूर मागणी आहे. मराठी पुस्तकांची विक्री लाखो रुपयांमध्ये होताना बघून समाधान वाटते.

अत्रे सभागृहात "अक्षरधारा माय मराठी ग्रंथोत्सव' प्रदर्शनाचे राजहंस प्रकाशनाच्या सहयोगाने तब्बल ४७ दिवसांसाठी आयोजन करण्यात आले आहे. ""गेली बारा वर्षे महाराष्ट्रभर ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचा अनुभव लक्षात घेता मराठी पुस्तकांना दिवसेंदिवस चांगले दिवस येत आहेत, असा अनुभव संयोजक रमेश राठिवडेकर यांनी सांगितला. त्यांच्या मते, वाचकांना आता किंमत हा मुद्दा भेडसावत नाही. स्वतःचे भवितव्य चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडतात. भेट देण्यासाठी मुद्दाम घेतली जाणाऱ्या पुस्तकांमध्ये बालाजी तांबे यांच्या "गर्भसंस्कार' या पुस्तकाचा क्रमांक सर्वांत वर लागतो. वैयक्तिक संग्रहासाठी अनेकजण दर्जेदार पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदवून जातात. विशेष म्हणजे मराठी पुस्तके खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या बरीच मोठी आहे.

भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचे मोठे भांडारच सध्या बालगंधर्व कलादालनातील प्रदर्शनात खुले झाले आहे. संयोजक नितीन केळकर म्हणाले, ""सातत्याने दरवर्षी पुण्यात आम्ही भरवलेले हे चौथे प्रदर्शन. गेल्या वर्षीच्या दहा दिवसांतल्या विक्रीएवढा पल्ला या वर्षी पहिल्या दोन दिवसांतच गाठला गेल्यामुळे नव्याने पुस्तके मागवावी लागली. विनोबा, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या चरित्रांना तुफान मागणी आहे. नॅशनल म्युझियमतर्फे प्रकाशित मिनिएचर पेंटिंग चित्र संचांचाही खप भरपूर झाला. योजना, कुरुक्षेत्र व बालभारती (हिंदी) या मासिकांचे जुने अंक तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. ग. दि. माडगूळकर रचित "गीतरामायणा'ची अकरावी आवृत्ती अवघ्या ५० रुपयांत उपलब्ध आहे.''

टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीतील तळघरात कोळेकर एन्टरप्रायजेसतर्फे "साहित्य आनंद मेळावा' तीन महिन्यांच्या दीर्घ काळासाठी आयोजित करण्यात आला आहे. सतीश कोळेकर म्हणाले, ""विज्ञानाच्या पुस्तकांबरोबरच हलकीफुलकी पुस्तकेही आमच्याकडे खूप खपतात. सध्या कथा-कादंबऱ्यांची आवड वाचकांमध्ये कमी आढळते. परिषदेत निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी येणारे श्रोते प्रदर्शनाला नक्कीच भेट देऊन जातात. १५० शीर्षकांचे विविध विषयांवरचे दिवाळी अंक गेल्या दोन आठवड्यात विकले गेले. ते बघून मराठी साहित्याला फार मोठा वाचकवर्ग असल्याची खात्रीच पटते. आश्‍चर्य म्हणजे शहरातील पुस्तकांच्या दुकानांमध्येही भरपूर गर्दी दिसते आहे.

पुण्यात एकाच वेळी चार पुस्तक प्रदर्शने
* [float=font:samata;color:A53512;breadth:200;place:top;]पुण्यात सध्या एकाच वेळी चार प्रदर्शनांमधून मांडलेल्या विविध विषयांवरील मराठी पुस्तकांची तडाखेबंद विक्री.[/float]
* उद्योजक होण्यासाठीचे तंत्र व मंत्र, चरित्रे, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य व गुंतवणूक या विषयांवरील पुस्तकांचा प्रचंड खप.
* प्रदर्शनातील इंग्रजी व हिंदीतील पुस्तकांपेक्षाही मराठी पुस्तकांकडे तरुण मोठ्या संख्येने आकर्षित.


तरुण आकर्षित होण्याचे प्रमाण जास्त का असावे?

भाषांतरित पुस्तकांना जास्त तर कथा कादंबऱ्यांना मागणी कमी हे कशाचे लक्षण आहे?

एकाच वेळी चार प्रदर्शने भरवणे विक्रीला तारक की मारक?

बाहेरगावहून आलेल्या लोकांची मागणी जास्त असण्याचे कारण का? पुण्यात पुस्तके मिळतात पण इतरगावी मिळत नाहीत असे तर नाही?.

विक्रीचे आकडे जास्त दिसण्याचे कारण काय? विकलेल्या पुस्तकांची संख्या जास्त की प्रत्येक पुस्तकाची किंमत जास्त? की दोन्ही?

लोक पुस्तके विकत घेऊन काय करतात? दुसऱ्याला भेट देतात? की स्वतः आणि आप्तस्वकीय वाचतात? की त्यावर आपापसात चर्चा / विचारांची देवाणघेवाण वगैरेही करतात?

सध्या ग्रंथालयांची / वाचनालयांची अवस्था काय आहे? वाचनालयांच्या स्थितीचा पुस्तकविक्रीवर परिणाम होत असेल काय?