गीत माझे

पाहिले मी तुला अन् शब्द ओठी धावले
साज चढवाया तयांना सूर तेही लावले
गाईलेले गीत माझे ते तुलाही भावले
बोल लावाया मला ‍परि जगाचे फावले.

यावया कक्षात तुझिया घोटाळती ही पावले
शृंखलांनी बद्ध ह्या,तरि बाहु मी फैलावले
असमर्थ,असहाय्य मी जरि बंध हे सैलावले
नयनद्वारि थकुन माझे  अश्रुही विसावले. 

हेच अंती पाहण्या का स्वप्न होते दाविले ?
जीवघेणे घाव देऊन अन् मला नादाविले ?
मान्य की हे वेड माझे मीच मजला लाविले,
सार्थकी त्यानेच पण आयुष्य माझे लाविले.....