सॉफ्टवेअर वापरात आता पुण्याचे झेंडे थेम्सपार!

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून अतिशय आनंद झाला. सर्वांना तिचा आस्वाद घेता यावा म्हणून ती येथे मुद्दाम उतरवून ठेवत आहेः

ईसकाळातली मूळ बातमी : पुणे महापालिकेने टाकले अमेरिकेलाही मागे!

पुणे, ता. ७ - बांधकाम नकाशे मंजुरीतील त्रुटी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेच्या नगर अभियंता खात्याने तयार केलेल्या संगणकीकृत प्रणालीला लंडन येथे झालेल्या वर्ल्ड लीडरशिप फोरमचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
अंतिम फेरीत लॉस एंजेलिस व नायजेरियातील लॅगॉस या शहरांना मागे टाकून पुणे महापालिकेने हा बहुमान पटकाविला.

लंडन येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये मंगळवारी पार पडलेल्या समारंभात फोरमचे माल्कम टनर यांच्या हस्ते महापौर राजलक्ष्मी भोसले व नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांनी हे पारितोषिक स्वीकारले. पालिकेच्या संगणकप्रणालीचा "आर्किटेक्‍चर ऍन्ड सिव्हिल इंजिनिअरिंग' या विभागात समावेश होता. पालिकेने २००५ मध्ये ही संगणकप्रणाली विकसित केली होती. "ऑटो डीसीआर' असे या प्रणालीचे नामकरण करण्यात आले होते.

या प्रणालीपूर्वी बांधकाम नकाशांची छाननी कनिष्ठ अभियंत्यांमार्फत होत होती. त्यामुळे नकाशे मान्य होण्यास जादा कालावधी लागत होता. तसेच विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदींचे विश्‍लेषण वेगवेगळ्या पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांच्या पातळीवर होत होते. त्यामुळे नकाशे मंजुरी करताना त्यात एकसूत्रतेचा अभाव होता. नकाशे मंजुरीत पारदर्शकता नव्हती. त्यामुळे मंजुरीनंतरही विविध प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते. या त्रुटी दूर करण्यासाठी नगर अभियंता विभागाने ही प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खात्यांतर्गत सखोल चर्चेसह वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिक यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. या प्रणालीच्या अंमलबाजवणीपासून आतापर्यंत ६३०० प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात सुमारे ८० लाख चौरस चौरस मीटर बांधकामांना मंजुरी दिली आहे. या प्रणालीमुळे नकाशे छाननीच्या प्रक्रियेत पारदर्शकता व एकसूत्रता आली आहे. या प्रणालीची माहिती घेऊन अन्य महापालिकांमध्ये अशी प्रणाली विकसित करण्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत


हे ऑटो डीसीआर कसल्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे, तांत्रिक तपशील काय आहे, ह्याची कुणाला काही कल्पना आहे का?

पालिकेने ही प्रणाली विकसित केली म्हणजे नेमके काय केले?

अशी काही स्पर्धा असते ह्याची कुणा सॉफ्टवेअर व्यावसायिकांना काही कल्पना आहे/होती का?

आता नकाशे छाननीच्या प्रक्रियेत पारदर्शकता व एकसूत्रता आल्याने नागरिकांचा काय फायदा होईल? पुण्याच्या नागरी जीवनात काय फरक पडेल?

सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन.