मराठी पाउल पडते पुढे !

महाराष्ट्र टाइम्स मधील खालील बातमी वाचून मराठी असल्याचा अभिमान वाटला


जगभर दबदबा असलेल्या 'सिटीग्रुप'चे नेतृत्व विक्रम पंडित या मराठमोळ्या माणसाकडे आले आणि इथे भारतात त्याच्या नातलगांमध्ये आनंदाची लाटच उसळली. वडील शंकरराव, वाशीत स्थायिक झालेले कार्डिऑलॉजिस्ट काका डॉ. रमेशराव, स्टेट बँकेतून निवृत्त झाल्यावर नागपुरात स्थायिक झालेले दुसरे काका सुरेशराव या साऱ्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना आपला आनंद व्यक्त केला आणि अनेक आठवणी सांगितल्या... या साऱ्या आनंदाला एक दु:खाची किनार आहे.. ती म्हणजे विक्रमच्या आई शैलजा यांचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले.

पंडित कुटुंब मुळात नागपूरचे. नंतर जगभर विखुरलेले. विक्रमची बहीण अलका श्रीखंडे याही टॉपर असून त्या अमेरिकेतच फायझर कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट आहेत. विक्रमची सासुरवाडी पुण्यात. 'हायड्रोग्राफर साठे' यांचा त्यांच्या विषयात दबदबा. विक्रमचा मुलगा राहुल व मुलगी माया. [float=font:dhruv;place:top;]विक्रम सहकुटुंब मॅनहटनमध्ये राहत असला तरी या कुटुंबाचे अस्सल मराठीपण कायमच आहे.[/float] काही काळापूर्वी मॅनहॅटन या न्यूयॉर्कच्या सर्वांत महाग एरियात विक्रमने तब्बल सात हजार चौरस फुटांचे घर घेतले तेव्हा अमेरिकेतही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

या घरातून मंगळवारी रात्री आनंदाची बातमी सांगणारा फोन वाशीत खणखणला. विक्रमचे वडील म्हणाले, 'मंगळवारी रात्री एक वाजून २० मिनिटांनी सुनेचा फोन आला. 'ही हॅज बिकेम सीईओ' हे तिचे शब्द ऐकले आणि फ्रॉस्टची न मळलेली वाट चोखाळा, असे सांगणारी कविता मला त्याच क्षणी आठवली.'

शंकरराव पंडित संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. दासबोध आणि मनाच्या श्लोकांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे. समर्थ रामदासांच्या 'दासबोधा'चे त्यांनी इंग्रजी भाषांतरही केले. मनाचे श्लोक तर पद्यमय केले. घरातला हा धार्मिकतेचा संस्कार विक्रम यांच्यावरही झाला आहे. साऱ्याच पंडित कुटुंबाची शेगावच्या गजानन महाराजांवर निस्सीम श्रद्धा आहे. विक्रम यांनी स्वत: शेगावमध्ये भव्य भक्तनिवास बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही श्रद्धा आणि मराठी मातीशी असणारे अतूट बंध यामुळेच विक्रम यांची दरवर्षी महाराष्ट्रात एकतरी फेरी होतेच!


श्री पंडित यांचे हार्दिक अभिनंदन !