थालीपीठ

  • थालीपिठाची भाजणी, हळद, हिंग, मीठ
  • कांदे, कोथिंबीर, तेल
१५ मिनिटे
लवचिक

जर आपल्याकडे भाजणीचे पीठ तयार असेलतर ऐन वेळेला पटकन करण्याचा हा चवीष्ट पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा आहे.

एका थालीपीठास अर्धी वाटी या प्रमाणांत पाहिजे तेव्हढे पीठ घेऊन त्यात थोडी हळद, मीठ आणि पाहिजे असल्यास हिंग घाला.  कांदा आणि कोथिंबीर चिरून ते पीठ पाण्यात घट्ट भिजवा.

उथळ पण थोडा खोलगट तवा मंद विस्तवावर ठेवा.  त्यावर सर्व पृष्ठभागावर तेलाचा पुसट थर द्या.  (लहानपणी आजी त्यासाठी नारळाची शेंडी वापरत असे.)  एका थालीपीठाच्या योग्य असा भिजवलेल्या पिठाचा गोळा घेऊन ते थालीपीठ हाताने थापा.  त्यास चिमट्याच्या दांड्याने किंवा तत्सम प्रकाराने ४-५ भोके पाडून त्या भोकात थोडे थोडे तेल घाला.  त्यावर एक झाकण ठेवा.  ३-४ मिनिटांनी एका बाजूने शिजल्यावर ते थालीपिठ उलटे करून त्या बाजूने झाकण न ठेवता भाजून घ्या.  या प्रकारे सर्व थलीपीठे तयार करा.

गरम गरम थालीपिठाबरोबर पांढर्‍या लोण्याचा गोळा, घट्ट साईचे दही, किंवा इकडे (अमेरिकेंत) मिळते ते क्रीम चीज़  खायला मस्तच लागते.

अभिजित, कसे वाटते ते सांग.

थालीपीठाची भाजणी हल्ली भारतीय दुकानात मिळते.  नाहीतर येणारा जाणारा ती पिठाची पुडी सहज आणू शकतो त्यामुळे आम्हाला (परदेशस्थ भारतीयांना) ती सहज मिळते.  भारतांत तर गृहवस्तू दुकानात ती ताजी मिळते.

आजी, आई, भार्या