एक प्रदीर्घ संवाद....( पुस्तक परीक्षण - अंतर्वती )कवी -किरण संघवई

 संवेदनेची विशुध्द अभिव्यक्ती हा चांगल्या कवितेचा सार्वकालीन निकष आहे.प्रत्यक्षात मात्र  या निकषावर अनेक कवी अयशस्वी होताना दिसून येतात,आणि यामुळेच बहुधा आजकाल सरावाने कविता लिहिणार्‍या कवींची संख्या बरीच असली , तरी चांगली कविता त्या मानाने कमी आढळून येते.मानवी मनाचे जटील व्यवहार समजून उमजून कविता लिहिणे , हा काहिसा कठीण भाग अनेकांना न साधल्याने , कवितेच्या नावाखाली पाडलेले शब्दांचे निर्जीव ढीगच आधिक्याने दिसून येतात्.या परिवेशात किरण संघवई यांचा 'अंतर्वती ' हा हिंदी कवितांचा संग्रह आपल्या वेगळेपणाने निश्चितच  उठून दिसतो.

'अंतर्वती हा मूलतः प्प्रेमकवितांचा संग्रह आहे.या संग्रहात ६५ स्वंतत्र अशा कविता असल्या तरी त्या एकाच प्रदीर्घ अनुभवाच्या निरनिराळ्या छटा भासतात्.या अर्थाने , ही एकच दीर्घ प्रेमकविता आहे , असेही म्हणता येईल्.'प्रेम ' या शाश्वत मानवी मूल्याच्या अधिष्ठाणांचा वेध घेऊ पाहणारी ही कविता एका संथ लईत निथळत जाते.या कवितेच्या अंतरातली लय , ही पाण्यावर वहात जाणार्‍या पणतीची लय आहे.प्रेमाच्या भौतिक्तेला स्पर्श करत करत , ही कविता याच लईत अभौतिकच्या कृष्णविवरांकडे सरकत जाते---

" विजित हुई ़़कई बार किंतु
आत्मा के गवक्षोंपर टंगे हैं
विवेक के कुछ उडते पर्दे..."

प्रेमातल्या असंख्य मनोदैहिक कल्लोळांना रूपित करताना , या कवीच्या मदतीला निसर्गही धाऊन येतो.आलोक , तमिस्त्रा,नदीतट्,पतझर ,प्रभंजन , आदित्य ,दोपहरी आदि प्रतिमा या मानसिक व्यवहारास शब्दरूप देतात्.पार्थिव आणि अपार्थिवच्या संबंधस्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडणार्‍या या प्रतिमा , या कवितेस अनेकदा संदिग्धतेच्या प्रदेशात नेऊन सोडतात..

" अखरता है मुझको सदा
इस नीले आकाश का एकाकीपन.."

ही कविता वाचताना , या कवितेवर एका अंतहीन विरहाची छाया पडलेली दिसून येते.पण हा विरह एखाद्या संयत वटवृक्षाच्या पानांच्या मध्यम लयीतील सळसळीसारखा आहे.स्वतःच्या मनोविश्वाकडे काहिसे दुरून आणि न्याहाळून बघणार्‍या आत्मरूपाचा हा आविष्कार म्हणूनच संतुलित आहे.

" तुम्हारे गमन के पश्चात के
अंतराल को
टटोलती हैं प्रवास की
पगडंडीयां.."

जीवन खरोखर प्रमेय आहे काय ? मानव्याच्या प्राचीन दु:खाचे मोजमाप करणे शक्य आहे काय ?कदाचित नाही. ही कविता मात्र या अप्रमेय आकाशाला ,कधी मोजू पहाते , तर कधी आपल्या कवेत घेऊ पहाते..

"न रहो तुम , तुम्हारा अस्तित्व भी
मुझे चलना है अभी , सभी दिशाओं में चलकर..."

अंतरात राहणार्‍या प्रेयसीशी बोललेल्या या कविता , खरेतर जीवनाशी केलेला एक प्रदीर्घ संवादच आहे.या संवादाची सुंदर भाषा,हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.या कवीची मातृभाषा मराठी आहे , या तथ्याचा वारंवार विसर पडावा अशा हिंदीत लिहिलेल्या या कवितेने , अर्जित भाषेतले सर्जन देखील , मातृभाषेतल्या लिखाणाइतकेच सशक्त असू शकते , हे तथ्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.भावकवितेच्या वाटेत अपरिहार्य असणार्‍या अडथळ्यांना  ही कविता क्वचित प्रसंगी ठेचाळत असली , तरी तिची प्रगल्भता लक्षणीय आहे.या कवितेचे आणि या कवितेचे हार्दिक स्वागत !!

"अंतर्वती"
हिंदी कविता संग्रह
कवी , प्रकाशक- किरण संघवई ( सिफर )
"शून्य प्रकाशन"
यशवंत नगर , नांदेड
संपर्क-९३७०५९३८००,९३२५६१०३६८

************** अनंत ढवळे , ७३, विश्वास अपार्ट. , वडगाव फाटा, वडगाव( बु) पुणे .‌संपर्क /९८२३०८९६७४