रेशमियाच्या गाण्यांनी

केशवसुमार यांचे 'रेशमाच्या बाबांनी' हे धमाल विडंबन आपण पूर्वी वाचलेच असेल. त्याच गाण्यावर मेल मधून आलेले हे अजून एक विडंबन!

रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण कसा माझा फोडिला
हात नका लावू त्याच्या सीडीला

नवी कोरी कॉपी सूफी साजाची
टोपी चढविली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला

गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर हाशमी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला

कृपा त्याच्यावर सल्लुमियाची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा आता, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला

एक बरे दिसे त्याच्या गाण्यात
गाढवही वाटे गाते सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा दूरदेशी धाडिला
हात नका लावू त्याच्या सीडीला॥

(फॉरवर्ड) n   असल्यामुळे मूळ कवीचे नांव समजले नाही.