कधी कधी वाटतं..
तुला नि मला सोबतच राहावा गर्भ...
तू बाळाला जन्म द्यावास...
... अन मी कवितेला..
तान्हुल्याचं हसू
जेवढं निरागस... निखळ...
तेवढेच आसुही तिचे
असावेत निष्पाप..
आणि इवल्याशा पिलाच्या
टकमक हसऱ्या डोळ्यांनी..
बघावं दोघांनी जगाकडं.
त्याचं गोडगोजिरं अंग तसं
तिच्या शब्दाशब्दाला बाळसं यावं..
दोघांच्या किलबिल कलकलीनं
भरावं घर.. अंगण... आभाळही...
आणि त्याला दुडूदुडू चालताना
सावरावंस तू...
...मला तिला आवरणं कठीण व्हावं...
मग त्याच्या गोलगोबऱ्या गालांचे
मटामटा घ्यावेत मुके..
शब्दांना तिच्या तूही ओठांनी टिपावं.
... त्याचे ओठ तू चुंबताना..
कवितेनं त्याच्या ओठी यावं...
------------------------------
.... कधीतरी शब्द माझे
सोडतीलच श्वासांना... आणि ओठांनाही..
तेव्हा त्याच्या ओठांनी
माझी कविता गावं..