.....................................................................
...मात्र भेटीचे ठरेना !!
.....................................................................
पैलतीराची कहाणी ऐलतीराला स्मरेना !
...अन् तरीही आठवांचा पूर काही ओसरेना !
मी जरी बाहेर आलो.. सोडला मी कोष माझा...
सूर कोठेही जुळेना...चूक माझी, दोष माझा
चित्र काळे-पांढरे हे...रंग कोणीही भरेना !
बंद झालेला पिसारा उघडतो आहे पुन्हा मी
आणि गेलेल्या क्षणांना पकडतो आहे पुन्हा मी
कोणता हा खेळ आहे ? जीत नाही; मी हरेना !
भोवती काळोखलाटा...वाट माझी नागमोडी
...राहिली आहे शिदोरी आणि आता खूप थोडी
या प्रवासाचा तरीही मोह काही आवरेना !
आंधळ्या गर्दीतले हे चेहरे सारेच कोरे
बोल मी कोणास लावू ? कोण काळे, कोण गोरे ?
शोधतो कोणास मी ? हा शोध का माझा सरेना !
केवढे दरम्यान पाणी या पुलाखालून गेले...
या प्रवाहाने कसे, कोणास कोठे दूर नेले...
नाव ही गर्तेतली कोणीच माझी सावरेना...!
एकदा येतीलही एकत्र हे दोन्ही किनारे
साठले आहे उरी, वाहून ते जाईल सारे
भेटणे होईलसुद्धा; मात्र भेटीचे ठरेना !!
- प्रदीप कुलकर्णी
.....................................................................
(रचनाकाल ः ८ सप्टेंबर १९९९)
.....................................................................