आवरलेही असते मी वाऱ्याचे सरभैर पसारे...
पण मग.. दवभिजला गुलमोहर मनभर सांडायचा कसा ?
घातल्याही असत्या शपथा मी मेघांना अवेळी न दाटण्याच्या
पण मग.. सात रंगांचा खेळ आकाशात मांडायचा कसा ?
शोधलाही असता मी मनाचा नकाशा कुठल्याशा पुस्तकात
पण मग.. रानभुलीचा मोहक शाप भोगायचा कसा ?
घेतलंही असतं मी वागणं आखून-मापून सगळं
पण मग.. चुकार कवितांचा संसार थाटायचा कसा ?
धाडल्याही असत्या मी सगळ्या तुझ्या आठवणी वेशीपार
पण मग.. चंद्र माझ्या पापण्यांखाली भिजायचा कसा ?