मर्ढेकरांच्या दोन कविता

कै. प्रा. म. वा. धोंड ह्यांनी ललितच्या २००७ च्या दिवाळी अंकात " 'कुठली सीता कुठला राघव' आणि कुठले रामराज्य" ह्या नावाचा एक प्रदीर्घ लेख लिहीला आहे. लेखात मुख्यत्वे करून मुंबईतील झोपडपट्ट्यांच्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत काय काय केले गेले (अथवा केले गेले नाही) ह्यावरचा आहे. त्यात मग  विविध योजना, बिल्डर्सची लॉबी अशा अनेक संबंधित तसेच कुठल्या कार्यालयाला आग लागून कागदपत्रे कशी भस्मसात झाली, वगैरे अनेकविध असंबधित विषयांचा भरणा आहे. लेख अत्यंत पसरट आहे. पण झोपडपटट्टीवासीयांच्या, कष्टकऱ्यांच्या हालअपेष्टा बघून प्रा. धोंडांना मर्ढेकरांच्या दोन कविता आठवल्या. त्या तर त्यांनी उर्धृत केल्या आहेतच, पण त्यांचे थोडेसे विश्लेषणही केलेले आहे. त्या कविता व प्रा. धोंडांच्या टिप्पण्या मी इथे थोडक्यात देत आहे.

पहिली कविता आहेः

जे अज्ञानांत जन्मले । आणि अज्ञानांत मेले,
त्यांस देवा तूं धरिलें । काय पोटीं? ॥

का, झालासी निष्ठुर? । दिलें तयांसी अंतर
जन्ममरणांही नंतर । विश्वगर्भीं ॥

देह साफल्य पावले । पृथ्वीवरी त्यांचे भलें;
आलें काम त्यांनी केलें । आणि गेले ॥

गळे अश्रूंवीण चरबी । तीच अज्ञानाची छबी;
झाले ते खत आणि बीं । तुझ्या मळां ॥

आम्ही ज्ञानवंत भागलों । ना पश्चातापें पोळलों;
नाहीं कधी हळहळलों । परदुःखें ॥

वेचिलें ज्ञान कण कण । जैसे की वालुका-गण;
झालों कोरडे पाषाण । बुद्धिरूपी ॥

आमुची संज्ञा ही दरड । रखरखीत देहापाड,
वरी अहंतेचा पहाड । लागलासे ॥

होतां तप्त ही जमीन । नाही अश्रू, नाही घाम;
वांझपोटीस इनाम । रूंक्ष काया ! ॥

प्रा. धोंडांनी  लिहीले आहे की मर्ढेकरांची ही कविता १९४३ च्या बंगालच्या दुष्काळाविषयी आहे. तेव्हा ते कलकत्त्याच्या आकाशवाणीचे केंद्राधिकारी होते. कविता जरी देवाला उद्देशून असली, तरी तिचा रोख स्वतःला 'ज्ञानवंत' समजणाऱ्या भद्र समाजावरच आहे. या समाजाची मनोवृत्ती रखरखीत प्रदेशासारखी ('देहापाड') आहे. 'देह' हा 'देश'चा अपभ्रंश आणि 'पाड' म्हणजे 'तुल्य'. या भद्र लोकांना श्रम करून घाम गाळायला नको की कुणाची करुणा येऊन आसवेही ढाळायला नकोत. देवा, तू तरी 'आले काम केलें आणि गेले' अशा या कर्मयोग्यांन मेल्यावर तरी पोटाशी धर, अशी यात प्रार्थना आहे.

प्रार्थना देव ऐको न ऐको, यातील निर्भत्सना तरी आपल्यासारख्या भद्र पांढरपेश्यांनी मनाला लावून घ्यावी, अशी मर्ढेकरांची अपेक्षा.

दुसरी कविताः

खप्पड बसली फिक्कट गाल
तळभिंतीवर घेउन जख्खड
मातीची ही जुनी झोपडी
आंबट मिनिटें चाखित रद्दड.

मध्येच दचकुनि बघते वरती,
अष्टदिशांचा सासुरवास;
चंद्रमौळी परि बेढब शबरी
क्षण-बोरांची रचिते रास.

मातीवरती करीत मात;
मिनिटांमधुनी काढित व्याधि;
तपकिरि-पिवळ्या मउ सालीचें
बोर गवसतां जरा सुगंधी,

कुरवाळीत तें बोटांनी मउ
मिनिट सुवासिक हसते शबरी;
माणुसकीच्या दंडकांत अन्
गौऱ्या थापित वदे शर्वरीः

येइल का कधी सीतापति ग
चुकून तरी पण ह्या वाटेला?
घेइल का अन् रुजू करुनी
ह्या बोरांच्या नैवेद्याला?

कुठली सीता, कुठला राघव?
पुसे खडीचा रस्ता फक्कड;
आणि ठेविते गाल झोपडी
तळभिंतीवर फिरून खप्पड.

प्रा. धोंड लिहीतात की प्रस्तुत कविता ही झोपडपट्टी आणि तेथील कष्टकरी स्त्रिया, यांसंबंधी आहे. यातील 'शबरी' ही वृद्ध व मरणासन्न भाविक स्त्रीची प्रतिमा असून 'शर्वरी' ही तरूण, कष्टाळू, व्यवहारी स्त्रीची प्रतिमा आहे. ते पुढे लिहीतात "कवितेतील झोपडी ही तीन बाजूंनी मातीची, व वरून खाली उतरलेली झापांची पाखे असलेली अशी आहे. हीच ती तळभिंतीवर गाल घेउन बसलेली शबरी. ती 'क्षणबोरांची रास रचते आहे', म्हणजे रामाची वाट पाहता क्षण न् क्षण मोजते आहे. ह्यावरून तिचे मरण किती जवळ आलेले आहे, हे कळते. 'पिवळसर सालीचे मउ सुगंधी बोर' म्हणजे आशादायक क्षण. पण तो क्षण मिनीटभरच टिकतो. या जख्खड म्हातारीला आशा करण्यापलिकडे दुसरे काहीही शक्य नसल्यामुळे, ती रामराज्याची सुगंधी स्वप्नेच पाहत उर्वरित आयुष्य कंठते आहे, हे स्वाभाविकच आहे. पण हातपाय चालताहेत तोपर्यंत इतरांना असे स्वप्नरंजन परवडत नाही. त्या पुढील दिवसांचे इंधन म्हणून झोपी जाण्यापूर्वी गवऱ्या थापीत आहेत. जणू त्या शबरीला म्हणत आहेत ' अग म्हातारे, रावणाला मारून सीतेला घेऊन जो राम अयोध्येला गेला आहे तो या दंडकारण्यात परत कशाला येईल? तो इथे आला होता तो सीतेकरता. त्याला ती मिळाल्यानंतर परत कशाला तो भलती यातायात करेल?'- आपल्या विवंचना आपल्यालाच निस्तरायला नको का?"

'फक्कड  रस्ता' ह्यावर प्रा. धोंडांनी सविस्तर लिहीले आहे. त्याचा मतितार्थ असा की ब्रिटिशांच्या अमदानीत मुंबईमध्ये ज्या रस्त्यावरून गव्हर्नर अथवा त्याचे गोरे सहाय्यक, नाविक दलातील अधिकारी ह्यांचे जाणेयेणे असे, ते चांगले नीट खडीचे बांधलेले असत. इतर सर्व रस्ते तेव्हा मातीचे आसत. त्या फक्कड रस्त्याला आपल्यावरून काय प्रतिचे लोक जाताहेत ह्याची कल्पना आहे. त्यात कुणीही सीतेच्या वा रामाच्या तोडीचा असण्याची सुतराम शक्यता नाही. 'कुठली सीता, कुठला राघव' हे तीव्र निराशा दर्शवणारे प्रश्न आहेत.