तूच नव्याने घडशील काय

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे साऱ्यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोस
नव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय

-ऋषिकेश दाभोळकर

सर्व मनोगतींना, प्रशासकांना व साऱ्यांच्या कुटुंबीयांना हे नववर्ष आनंदाचं, आरोग्यपूर्ण आणि प्रगतीचे जावो हीच सदिच्छा!!