डुकराचा हिरवटपणा आता पुढच्या पिढीत

हल्लीची मुले जशी मुंगी हत्तीची गमतीशीर कोडी घालतात तसेच एक कोडे मी लहानपणी ऐकलेले होते, ते असे-

प्रश्न :  कुठल्या टांग्याला हिरवा घोडा असतो?

उत्तर : सगळ्याच टांग्यांना हिरवे घोडे असतात. ... ... भाजलेला घोडा कुठल्याच टांग्याला नसतो!

हे कोडे/विनोद आठवायचे मुख्य कारण म्हणजे आजच ही चकाकत्या हिरव्या डुकराची बातमी मी जालावर वाचलीः

ईशान्य चीनमधल्या शास्त्रज्ञांनी डुकरांच्या गर्भात चकाकते हिरवे प्रथिन सारून २००६ च्या डिसेंबरात तीन चकाकत्या हिरव्या डुकरांची पैदास केलेली होती. जंबुलातीत प्रकाशात (अल्ट्राव्हायोलेट लाइट) ही डुकरे चमकतात. झिन्हुआ वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

त्या तिघांपैकी एक म्हणजे सौ डुकरीण (सौ हे तिचे नाव). तिचा संकर न चमकणाऱ्या डुकराशी केल्यावर तिला जी अकरा पिले झाली, त्यातली दोन ही पिढीजात हिरवटपणा घेऊन जन्माला आलेली आहेत. ईशान्य कृषिविद्यापीठाच्या लिउ झाँगहू ह्या प्राध्यापकांनी ही माहिती दिल्याचे सांगतात.

"ह्या दोन पिलांची तोंडे, जिभा आणि पावले जंबुलातीत प्रकाशात चमकतात. पेशीकेंद्राच्या स्थलांतराद्वारे जनुकांतरित डुकरांची पैदास करण्याचे तंत्रज्ञान परिपक्व झाल्याचे हे निदर्शक आहे." असे लिउ म्हणतात.

तैवानातील शास्त्रज्ञांनी २००६ च्या जानेवारीत चमकदार डुकरांची पैदास केलेली होती; पण चमकत्या चिनी शूकरशावकांच्या जन्मामुळे असे बदल पुढच्या पिढीत आणता येतात हे सिद्ध झाले, त्यामुळे वैज्ञानिक आणि वैद्यकीय शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढतात असे लिउ सांगतात.

भविष्यात केवळ उत्कृष्ट जनुकांतरित डुकरांची पैदासच नव्हे तर मानवाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या अवयवांचा पुरवठा करण्यायोग्य विशेष डुकरांची पैदासही भविष्यात करता येण्याचे आश्वासन ह्यामुळे मिळते, असे ते म्हणतात.

प्राण्यांचे प्रतिजीव निर्माण करण्याचे कामी अमेरिकी, दक्षिण कोरियन आणि जपानी शास्त्रज्ञांनी ह्यापूर्वी वापरलेले शरीरातील पेशिकेंद्राच्या स्थलांतराचे तंत्रज्ञान लिऊ ह्यांच्या चमूने वापरल्याचे झिन्हुआ वृत्तसंस्था सांगते.

चीनमध्ये सरते वर्ष हे डुकराचे वर्ष म्हणून गणले जाते असे समजते. 


१. तैवानी शास्त्रज्ञांनी मानवी अवयवांचा अभ्यास करता येईल ह्या उद्देशाने ही पैदास केलेली होती.


अर्थात ही सर्व माहिती मी जालावर वाचलेली आहे. मुख्यत्वेकरून फिजऑर्ग, द एज, लाइव्ह सायन्स ह्या ठिकाणाहून ही माहिती आणि चित्रे जमा करून मी येथे जोडलेली आहेत.