तिढा प्रकाशित

तिढा प्रकाशित
दूरचित्रवाहिनीवर हेडलाईन्स झाल्या होत्या...
वृत्तनिवेदिका सांगत होती...
मांडणगाव जिल्ह्यातील आडगाव आणि परिसरात होणार्या पाचही फूड पार्क्ससाठी सरकारी जमिनीची मोजणी आणि निकडीने आवश्यक असलेल्या शेजारच्या जमिनीच्या संपादनाला आजपासून शांततेत प्रारंभ करण्यात आला... मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत त्या परिसरातील जमीन मालकांच्या नेत्या विदिशा सावंत आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने सरकारच्या या निर्णयाला सहमती दर्शवली आणि त्यानंतर प्रत्यक्ष आडगावात ही प्रक्रिया सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...आडगावात उभ्या राहणार्या पहिल्या फूड प्रोसेसिंग पार्कच्या क्षेत्रास राण्या नूरजी यांचे नाव दिले जाणार असल्याचे विदिशा सावंत यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी जमीन मोजणीविरोधी आंदोलनावेळी झालेल्या पोलीस गोळीबारात नूरजी यांचा मृत्यू झाला होता. त्या क्षेत्रात नूरजी यांचे स्मारक उभारण्यासाठी खासगी विकासकांनी एक लाख रुपये दिले असून, या स्मारकाचे पुढे समुदाय संशोधन केंद्रात रूपांतर करण्याचा विचार आपली संघटना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी दीड एकर जागा राखीव ठेवण्याचेही खासगी विकासकांनी मान्य केले आहे...
(कादंबरीच्या मलपृष्ठावरून)

पत्रकार आणि मनोगती सदस्य श्रावण मोडक यांनी लिहिलेली तिढा ही कादंबरी अनौपचारीकपणे प्रकाशित झाली आहे. लोकसंघटना, आर्थिक उदारीकरणाच्या परिणामी परिघीय जनसमुदायांवर होणारे परिणाम, त्यांच्यासमोरची आव्हाने, त्याचवेळी संघटनेत चालणारा भावविश्वाचा खेळ, नात्यांचा संघर्ष यांचा वेध घेणारी ही कादंबरी पुण्याच्या प्रतिमा प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.
तिढा
(कादंबरी)
पृष्ठसंख्या २९६. मूल्य २५० रुपये. प्रतिमा प्रकाशनतर्फे सध्या सवलतीत विक्री सुरू.
(प्रतिमा प्रकाशन, १३६२, औदुंबर अपार्टमेंट्स, नवाविष्णू चौक, ऑफ बाजीराव रोड, पुणे ४११०३०.
दूरध्वनी - ०२०-२४४७८९०८, ०२०-२४७८४४४
विरोप - दुवा क्र. १, दुवा क्र. २