परिवर्तनाचे वारे...

"कुत्र्यासारखा मारीन बघ...!'

आमचा मालक अण्णा जोशानं हे वाक्‍य उच्चारलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. असे "प्राणि'वाचक उल्लेख मला अजिबात खपत नाहीत. वाटलं, एक कडकडून चावा घ्यावा आणि या जोशाला अज्ञातवासाच्या कोशात घालवावं. पण हल्लीच मला "अँटीरॅबीज' इंजेक्‍शन देऊन आणलंय मुडद्यानं ! वर स्वतःही घेतलंय. (फुकट होतं.) त्यामुळं चावणं म्हणजे नुसतंच "दात दाखवून अवलक्षण' झालं असतं. गप्प राहिलो.

आमच्या जातीचा असा उद्धार केलेला मला अजिबात खपत नाही. काही लोक तर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देतात. आमच्या शेजारचा रॉकी परवा म्हणे..."ट्रेकिंगला कुत्र्यासारखं चालावं लागतं.'

म्हणजे काय?

तुम्हाला आमच्यासारखं चार पायांवर चालावं लागतंय?
विजेचा खांब दिसला की तंगडं वर करता?
चांगले बूटबिट घालून जाता की तडमडायला तिकडे डोंगरांत!

आम्हाला इथे उन्हातान्हात पोटापाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतं. कुणी उकिरड्यावर टाकलेला शिळा भाकरतुकडा उचलावा लागतो. त्यातून पळवलेल्या भाकरीवर तूप वाढण्यासाठी आमच्या मागे पळणारे एकनाथ महाराजांसारखे संतही आता राहिले नाहीत. उलट, इथे आमच्याच तोंडातली भाकरी पळवण्यासाठी टपलेले भिकारी आहेत. नळावरच्या भांडणांसारखी तिथे उकिरड्यावर आमची भांडणं होतात. एकतर आमच्या जातभाईंमध्येच एकी नाही. शिळ्या भाकरीसाठी पण आमच्यात मारामाऱ्या.

..तशी, आमची (म्हणजे माझी!) स्थिती बरी आहे म्हणा. आम्ही "पाळीव प्राणी' या गटात मोडतो. सध्या तरी जोशांच्या घरी आपला डेरा आहे. पण हल्ली या जोशाचं काही खरं दिसत नाही. (खरं तर, अन्नदात्याचा असा उद्धार करणं माझ्या स्वभावात नाही. मी काय मालकाचा कृतघ्न कार्टा थोडाच आहे?)

जोशाची हल्ली सटारलेय. सारखा मला घालूनपाडून बोलत असतो. पदोपदी माझा अपमान. कुत्रा असलो म्हणून काय झालं, स्वाभिमान आहेच ना मला! तरी बरं, या जोशाला एकदा चोरांच्या, दोनदा पोलिसांच्या आणि तीनदा बायकोच्या तावडीतून मी सोडवलंय. "माडी'वर गेला असताना पोलिसांनी "रेड' घातली, तेव्हा काळाठिक्कर पाडला होता जोशाचा चेहरा. मी तेव्हा मधे आलो, म्हणून पळून तरी जाऊ शकला. नाहीतर पोलिसांनीच काळानिळा करून सोडला असता. मग "व्हाईट कॉलर' चांगलीच मातीत गेली असती. तरीही या उपकारांची जाणीव नाही त्याला. म्हणून आपला तर हल्ली जीवच उडालाय. परवा फुकटात मिळालेला त्याचा सामोसा मी हाणला म्हणून बदड बदड बदडलं मला त्यानं. मीच आपला गरीब, म्हणून राहिलोय इथे.

पण आता मालक बदलायचा विचार चाललाय. कुत्र्याचं इमान वगैरे राहू द्या. इथे शिळंपाकं खावं लागतंय, वर बोनस म्हणून मारही. बघू. संधी मिळाली, तर ही "कुतरओढ' थांबवायचा विचार आहे. तोपर्यंत आपलं मन मोकळं करण्यासाठी या डायरीचाच आधार...!