आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता भातुकलीच्या खेळामधली
तीन पत्तीच्या खेळाची ही माझी कर्म कहाणी
होते नव्हते सगळे गेले , वरती झाली देणी
'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी
खूप दिसांनी जमले सगळे, भरला कोरम सारा
कुणी म्हणाले वाटा पत्ते , वाजून गेले बारा
वाहत होती दारू आणिक जसे वाहावे पाणी
कुणी विचारी तेव्हा, "सांगा आज कसे खेळावे ?"
पत्ते पिसण्या आधी थोडे, नियम जरा बोलावे
बीना लिमिट ने खेळू ठरले, शुद्धीत नव्हते कोणी
हा दैवाने बघा आज मज डाव असा वाटावा
ज्या खेळीवर मी ही माझा प्राण पणा लावावा
हाती माझ्या आले होते, एक्का राजा राणी
का माझा हा श्वास कोंडला घोट एक घेताना?
का माझे हे फिरले डोळे ते पत्ते पाहताना ?
तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी !!