जीवन एक तपस्या

मंथन होते गाढ दह्याचे तेव्हा मिळते लोणी

सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी

परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा

हे जीवन एक तपस्या

सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास

उदयाठायी विलय नांदतो अस्तित्वास प्रयास

अनुत्तरीत ती कधी जन्मली नाही कोण समस्या

हे जीवन एक तपस्या

कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती

सत्य अटळ परि का धावावे मन मिथ्याच्या पाठी

यशापयश हे तुझेच तरिही भीड कशी संघर्षा

हे जीवन एक तपस्या

जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे

कर्मभोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे

सुखदुःखांच्या काननातुनी मुक्तिचा कानोसा

हे जीवन एक तपस्या