तुझ्या सवे....

असे वाटते बागेमधुनी

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी कोवळ्या उन्हात न्हावे

कधी पावसा झेलावे ॥१॥

            

असे वाटते शांत मंदिरी

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी प्रेम हे कमी न व्हावे

हेची मागणे मागावे ॥२॥

    

असे वाटते रम्य किनारी

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी निश्चल अबोल व्हावे

कधी खूप बोलावे ॥३॥

        

असे वाटते डोंगर दरितुनी

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी निसर्गाच्या साथीने

गीत सुखाचे गावे  ॥४॥

                                   

असे वाटते ऐन दुपारी

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी तुजवर छत्र धरावे

कधी साऊली व्हावे ॥५॥

          

असे वाटते चांदण्या राती

कधी फिरावे तुझ्यासवे

कधी एखादे फुल घ्यावे

वेणितुनी गुंफावे ॥६॥

         

असे वाटते आयुष्याच्या

संध्येत फिरावे तुझ्यासवे

कधी न तुजला दुखवावे

इतुके इतुके सुख द्यावे ॥७॥

      

                   - श्रीयुत पंत